(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ST Workers News: एसटी कर्मचाऱ्यांच्या पदरी प्रतीक्षाच; वेतनाबाबत राज्य सरकारकडून फसवणूक सुरू असल्याचा आरोप
ST Workers News: या महिन्याची 10 तारीख होऊन गेली तरी एसटी कर्मचाऱ्यांचा पगार झाला नाही. राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक सुरू असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे.
ST Workers News: पगार वाढ आणि इतर कारणांसाठी संपावर गेलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या (ST Workers) पदरी पगाराच्या ऐवजी प्रतिक्षा असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (MSRTC Workers) कर्मचारी आणि अधिकारी यांना दहा तारीख उलटली तरी वेतन (Salary) मिळाले नाही. त्यामुळे एसटी कर्मचारी हतबल झाले असल्याचे दिसून येत आहे. सरकारने फक्त 165 कोटी रुपयांचा सवलत मूल्य रक्कमेच्या परताव्याचा निधी देणे, सदर निधी एसटीच्या खात्यावर जमा न होणे ही शुद्ध फसवणूक असून याला राज्य सरकारचा भोंगळ कारभार जबाबदार असल्याचा आरोप एसटी कर्मचाऱ्यांनी केला आहे. राज्य सरकार हे संप काळात दिलेल्या आश्वासनाकडे डोळेझाक करीत असून त्यामुळे कर्मचाऱ्याना वेळेवर वेतन मिळत नाही. हे आता नित्याचेच झाले असून ही कर्मचाऱ्यांची थट्टा सुरू आहे, असा आरोप महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.
एसटी महामंडळाला वेतनासाठी दर महिन्याला 360 कोटी रुपये इतक्या निधीची निधीची गरज आहे. मात्र, 165 कोटी इतकी कमी रक्कम महामंडळाला देणे आणि ती सुध्दा सवलत मूल्य रक्कमेतून देणे ही शुद्ध फसवणूक असल्याचे एसटी कर्मचारी काँग्रेसने म्हटले आहे. वेतनाला लागणारी पूर्ण रक्कम बजेट मध्ये तरतूद करून देण्याचे आश्वासन सरकारने संप काळात दिले होते. त्याकरिता स्वतंत्र वेगळा निधी देणे गरजेचे असताना त्याचा विसर सरकारला पडला आहे. काही दिवसांपूर्वी शासनाच्या परिपत्रकात जाहीर केलेली, 165 कोटी रुपये ही रक्कम वेतनासाठी अपुरी असून ही रक्कम एसटीच्या खात्यावर अद्यापि वर्ग झालेली नाही. या मुळे कर्मचाऱ्यांना या महिन्यात सुद्धा वेतन वेळेवर मिळालेले नसून, निधी देण्याच्या बनवाबनवी मुळे या पुढे महामंडळ आर्थिक सक्षम होणार नाही. या पुढे कुठलीही विकासकाने होणार नाहीत. कदाचित डिझल अभावी गाड्या उभ्या राहतील अशीच परिस्थिती असल्याचे एस. टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी म्हटले.
सरकारकडून 165 कोटी रुपये इतकी रक्कम एसटीच्या खात्यावर वर्ग झाली तरी या रकमेमध्ये नक्त वेतन (पीएफ, ग्रॅज्युएटी वगळून) सुद्धा देता येणार नाही असे बरगे यांनी म्हटले. नक्त वेतनासाठी 205 कोटी रुपये इतका निधी लागत आहे. संप काळात उच्च न्यायालयात सरकारने वेतनासाठी लागणारी पूर्ण रक्कम एसटी महामंडळाला दिली जाईल असे सांगितले होते. तसे शपथपत्र सरकारच्या वतीने त्रिसदस्यीय समितीने न्यायालयात दिले आहे. मात्र पूर्ण रक्कम देण्यात येत नाही. नवे सरकार आल्यापासून तर एकदाही पूर्ण रक्कम देण्यात आलेली नसून हे सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार करत असल्याचा आरोप, बरगे यांनी केला आहे. शिंदे-फडणवीस सरकार हे इतिहासातील सर्वात फसवे सरकार असून एसटीला व कर्मचाऱ्यांना मदत करण्याच्या फक्त गप्पा मारल्या जातात. प्रत्यक्षात मात्र तोंडाला पाने पुसली जात आहेत असा आरोपही बरगे यांनी केला आहे.