आता विठ्ठल मंदिरात श्वसनाचा त्रास होणार कमी, गाभाऱ्यात ऑक्सिजन कॉन्सट्रेटर बसविणार
Vitthal-Rukmini Temple : पुरेसा प्राणवायू न मिळाल्याने वृद्ध भाविक , लहान मुले आणि आजारी व्यक्तींना दर्शन रांगेत श्वसनाचे त्रास वारंवार जाणवत असल्याचे समोर आले. याची वारंवार तक्रार करण्यात आली.
Pandharpur Shri.Vitthal and Shri.Rukmini Temple : आता विठ्ठल मंदिरात श्वसनाचा त्रास कमी होणार आहे. व्हीआयपी मंडळींच्या तक्रारीनंतर आता सर्वसामान्य भाविकांचीही त्रासातून मुक्तता होणार आहे. मंदिराच्या गाभारा आणि चौखांबी येथे ऑक्सिजन कॉन्सट्रेटर बसवण्याचा निर्णय विठ्ठल मंदिर समितीने घेतला आहे. या निर्णायचे सर्वच स्थरावर कौतुक होत आहे.
विठ्ठल मंदिर हे अकराव्या शतकातील असल्याचे सांगितले जात असले, तरी इतिहास अभ्यासकांच्या मते हे त्याही पूर्वी असल्याचे सांगितले जाते. विठ्ठल मंदिरातील गाभारा आणि त्याच्या समोर असलेल्या चौखांबीमध्ये हवा फिरण्यास झरोके अथवा खिडक्या कमी आहेत. त्यामुळे येथे पुरेसा प्राणवायू न मिळाल्याने वृद्ध भाविक , लहान मुले आणि आजारी व्यक्तींना दर्शन रांगेत श्वसनाचे त्रास वारंवार जाणवत असल्याचे समोर आले. याची वारंवार तक्रार करण्यात आली.
गेल्या दोन वर्षांपासून देवाच्या पायावरच दर्शन बंद असल्याने सध्या भाविकांना या चौखांबी आणि गाभाऱ्यात जावेच लागत नाही . मात्र या दोन वर्षातील आषाढी आणि कार्तिकीच्या शासकीय महापूजेच्यावेळी अशाच पद्धतीचा श्वसनाचा त्रास काहीजणांना जाणवला. याबाबत मंदिर समितीकडे या व्हीआयपी लोकांनी सूचना दिल्याने समितीने तातडीने या ठिकाणी ऑक्सिजन कॉन्सट्रेटर बसविण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे व्हीआयपीन झालेल्या त्रासामुळे आता लाखो भाविकांची या त्रासातूनही सुटका होणार आहे.
याबाबत मंदिर समितीने बैठकीत ठराव करून ऑक्सिजन कॉन्सट्रेटर बसविण्याचा निर्णय घेतला आहे . यासाठी आयआयटी पवई यांच्याशी समितीने संपर्क साधला असून ऑक्सिजन कॉन्सट्रेटर बसविण्याबाबत डिटेल्स देण्याची विनंती केली आहे . हा ऑक्सिजन कॉन्सट्रेटर बसविल्यावर विठ्ठल गाभारा आणि चौखांबी येथील जागा आणि भाविकांच्या संख्येला लागणार प्राणवायू याबाबत अहवाल तद्न्य देतील. त्यानुसार या ठिकाणी एकावेळी किती भाविकांना थांबता येईल, याची माहिती देणारे इंडिकेटर येतील . त्यानुसार तेवढ्याच भाविकांना तेथे सोडले जाणार असून शासकीय महापूजेच्या वेळी देखील हाच नियम वापरला जाणार आहे . याशिवाय पुढच्या टप्प्यात गरजेनुसार ऑक्सिजनचा पुरवठा येथे करण्याची यंत्रणा देखील बसविली जाणार असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी सांगितले .