आदित्य ठाकरेंवरील आक्षेपार्ह विधान नितेश राणेंना भोवण्याची शक्यता, शिवसेनेकडून निलंबनाची मागणी
ठाकरे विरुद्ध राणे हा राजकीय संघर्ष आता एकमेकांवरचा राग किंवा एकमेकांविषयीच्या मत्सराकडे झुकू लागल्याचं चित्र महाराष्ट्राच्या राजकारणात दिसू लागलंय का, असा प्रश्न जाणकारांना पडला आहे.
मुंबई : नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर केलेल्या आक्षेपार्ह टीकेचे पडसाद विधानसभेत उमटले आहेत. नितेश राणे यांच्या निलंबनाची शिवसेनेकडून मागणी करण्यात आली आहे. शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी ही मागणी केलीय, तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनीही नितेश राणेंचे कान टोचले आहेत, अशाप्रकारे कुणावर टीका करु नये अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी केली आहे तर याच मुद्द्यावरुन अजित पवारांनी देखील नितेश राणे यांच्या वक्तव्याचा समाचार घेत अशा विधानाची तपासणी करण्यासाठी आमदारांची समिती नेमायला कुणाचीही हरकत नाही असं अजित पवार म्हणाले आहेत.
नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर केलेल्या आक्षेपार्ह टीकेबाबत एक आमदारांची समिती नेमायला हवी, अशी मागणी भाजपा नेते सुधीर मुनगंटीवारांनी केलीय. असं होणं चुकीचं असून सतत अशा कृती घडत असल्याने कारवाई करणं गरजेचं आहे. असंही मुनगंटीवार म्हणाले.
सुनील प्रभू यांचा मुद्दा बरोबर आहे, असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनीही नितेश राणेंचे कान टोचले आहेत. अशाप्रकारे कुणावर टीका करु नये असा सल्ला फडणवीसांनी नितेश राणेंना दिला आहे.
सुधीर मुनगंटीवारांनी केलेली समितीची मागणी योग्य असून समिती नेमण्यासाठी हरकत नसल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलं आहे. सभागृहाच्या आत चुकीचं वर्तन केल्यास कारवाई केली जाते, असंही अजित पवार म्हणाले आहेत.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज विधिमंडळात दाखल झाले तेव्हा तिथल्या पायऱ्यांवर आंदोलन करणारे भाजप आमदार नितेश राणे यांनी 'म्याव-म्याव' असा मांजराचा आवाज काढून त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. स्वत:च्या या कृतीवर नितेश राणे खूश होऊन हसले, पण आदित्य ठाकरे यांनी नितेश राणे यांच्याकडे वळून पाहिलं नाही. नितेश राणे यांच्याकडून वेळोवेळी होणाऱ्या वैयक्तिक टीकेकडे दुर्लक्ष करण्याचा आदित्य यांचा प्रयत्न असतो. पण ठाकरे आणि राणे यांच्यामधला राजकीय संघर्ष पुढच्या पिढीमध्ये आणखी खालच्या पातळीवर जाणार का? तसंच विधीमंडळाच्या पायऱ्यांवरच्या नितेश राणे यांच्या या कृतीला भाजपचं समर्थन मिळत राहणार का? असा प्रश्न महाराष्ट्रातल्या सुसंस्कृत नागरिकांना पडला आहे.