Maharashtra Heat Wave : वाढत्या तापमानामुळे 21 एप्रिलपासून राज्यातील सर्व शाळांना सुट्ट्या जाहीर, राज्य शासनाचा निर्णय
Maharashtra School: वाढत्या उष्णतेच्या लाटांच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. वाढत्या उष्णतेमुळे मे महिन्याच्या सुट्ट्या आता एप्रिलमध्येच देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला.
Maharashtra School Vacation: वाढत्या तापमानामुळे राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांना 21 एप्रिल म्हणजे उद्यापासून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाकडून तसा शासन निर्णय जारी करण्यात आलाय. राज्यातील इतर मंडळाच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्यास विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावा असे आदेश देण्यात आले आहेत.
शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी शैक्षणिक वर्ष पूर्ण झालेल्या शाळांचा अहवाल मागवला होता. त्यानुसार वाढत्या उष्णतेच्या लाटांच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. वाढत्या उष्णतेमुळे मे महिन्याच्या सुट्ट्या आता एप्रिलमध्येच देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला.
शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी वाढत्या उष्णतेमुळे मुलांना काळजी घेण्याचे आवाहन केलं आहे. राज्यातील ज्या शाळांची परीक्षा संपली आहे त्यांना सुट्टी मिळणार आहे. राज्यातील शाळांना 21 एप्रिलपासून सुट्टी सुरू होऊन ती 15 जूनपर्यंत असेल. विदर्भातील उष्णतेची तीव्रता लक्षात घेता विदर्भातील शाळा या 30 जून पर्यंत बंद राहतील असं राज्य शासनाने जाहीर केलं आहे.
राज्यातील वाढत्या तापमानामुळे पालक वर्ग चिंतेत होते. सीबीएसई आणि इतर केंद्रीय बोर्डाच्या शाळा या सकाळच्या सत्रात भरवण्याची शाळा प्रशासन आणि शालेय शिक्षण मंत्र्यांकडे मागणी करण्यात येत होती. खारघरमध्ये उष्माघाताने झालेल्या मृत्यूच्या घटनेनंतर नवी मुंबई पालक संघटना आणि त्यासोबत राज्यातील इतर पालक संघटनांनी सीबीएसई व इतर केंद्रीय बोर्डाच्या शाळा या फक्त सकाळच्या सत्रात सुरू ठेवाव्यात, अशी मागणी केली होती.
राज्यातील शाळा 15 जूनपासून सुरू
राज्यातील शाळा यंदा 15 जून रोजी सुरू होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी दिली आहे. तर विदर्भात उन्हाची तीव्रता जास्त असल्याने त्या ठिकाणी 30 जून रोजी शाळा सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मुलांना आपल्या सुट्या व्यवस्थित प्लान करता याव्यात यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती दिपक केसरकर यांनी दिली.
दिपक केसरकर म्हणाले, केंद्राचा नवभारत साक्षरता कार्यक्रम घेतला जाणार आहे. यापुढे शासकिय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये पहिली ते आठवी मुलांचे शाळेचे कपडे, वह्या, शूज आणि सॉक्स हे शासनातर्फे मोफत दिले जाणार आहेत. तसेच प्रत्येक धड्यानंतर आता एक पान कोरे ठेवले जाणार आहे.
ही बातमी वाचा: