सांगली : सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठवल्यानंतर राज्यातली पहिली अधिकृत शर्यत सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे गावात पार पडली आहे.  नांगोळे गावातल्या ग्रामस्थांनी  सूर्योदयापूर्वी दारात गुढ्या उभारुन शर्यतीसाठी येणाऱ्या बैलजोड्यांचे स्वागत केलं आहे.  यावेळी सर्व बैलगाड्यांची पूजाही करण्यात आली. सांगलीच्या जिल्हाधिकार्‍यांची परवानगी घेऊन आणि कोरोना नियम पाळून होणाऱ्या या शर्यतीमुळे नांगोळे ग्रामस्थांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.


कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे गावी  आज शर्यतीवरचे निर्बध उठल्यानंतरची अधिकृत बैलगाडी शर्यत पार पडली आहे. कोरोनाच्या निर्बधामुळे बैलगाडी शर्यत प्रेमींनी शर्यत पाहण्यासाठी मैदानांवर गर्दी न करता ऑनलाईन शर्यत पाहण्याचे आवाहन आयोजकांनी केले होते.  मात्र तरीही शर्यत पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली आहे.तसेच बैलगाडा शर्यत संयोजकांनी नियमानुसार फक्त पन्नास प्रेक्षकांना गावांमध्ये आणि शर्यतीसाठी प्रवेश देऊन शर्यत घेण्याचे नियोजन केलंय. तसेच या शर्यतीसाठी 49 बैलजोडींची नोंदणी  करण्यात आली आहे. तीन फेऱ्यात ही शर्यत पार पडणार असून पहिले बक्षीस 1 लाख, दुसरे 75 लाख आणि तिसरे बक्षीस 50 हजार जाहीर करण्यात आले आहे. 


बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी राज्य सरकारनं दाखल केलेल्या याचिकेवर 16 डिसेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टानं महत्वाचा निर्णय देत बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवली होती. राज्यात बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी देण्यात आली होती. या निर्णयामुळं राज्यातील बैलगाडा मालकांना दिलासा मिळाला आहे.  2017 साली मुंबई हायकोर्टानं बैलगाडा शर्यतींवर बंदी घातली होती. याला राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. आता या शर्यतींना सशर्त परवानगी देण्यात आली आहे. सात वर्षांनंतर या निर्णयामुळं बैलगाडा शर्यत पुन्हा राज्यात सुरु होणार आहे. 



महत्त्वाच्या बातम्या: