Maharashtra Samruddhi Mahamarg : सरकारकडून तारीख पे तारीख! आता डेडलाईन 31 मार्चची, समृद्धी महामार्ग सुरु होणार कधी?
Maharashtra Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गासाठी सरकारकडून तारीख पे तारीख! आता डेडलाईन 31 मार्चची! समृद्धी महामार्ग सुरु होणार कधी?
Maharashtra Samruddhi Mahamarg : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचं काम (Samruddhi Mahamarg) अंतिम टप्प्यात असल्याचं बोललं जातं आहे. सरकारकडून वारंवार हा महामार्ग सुरू करण्यासंबंधी तारखाही घोषित करण्यात आल्या आहेत. यापूर्वी ऑक्टोबर 2021, 31 डिसेंबर 2021 आणि आता 31 मार्च 2022 ही तारीख देण्यात आली आहे. पण अजूनही समृद्धी महामार्गाचं काम अपूर्ण असल्यानं पहिल्या टप्यातील नागपूर शिर्डी महामार्ग सुरू होऊ शकणार नसल्याची माहिती एबीपी माझाला मिळाली आहे. त्यामुळे आता सरकार काय अजून डेडलाईन देणार का? वारंवार तारखा देऊनही का सुरू होऊ शकत नाही समृद्धी महामार्ग?
नागपूर (Nagpur)-मुंबई (Mumbai) दरम्यान रहदारी सुलभ व्हावी या उद्देशानं 31 जुलै 2015 रोजी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी 701 किलोमीटरच्या 'समृद्धी महामार्गाची' घोषणा विधानसभेत केली. प्रत्यक्षात राज्याच्या 10 जिल्ह्यातून जरी हा महामार्ग जात असला तरी एकूण 24 जिल्ह्यांना याचा फायदा होणार आहे. या महामार्गाच्या बांधकामाच्या सुरुवातीला अनेक अडचणी आल्यात आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. त्यावेळी हा महामार्ग पूर्ण सुरू होण्याची प्रस्तावित तारीख ही ऑक्टोबर 2021 अशी ठरविण्यात आली होती. पण मध्यंतरी जमीन अधिग्रहण, कोरोनामुळे लॉकडाऊन अशा अनेक अडचणींना सामोरं जात सरकारनं हा महामार्ग जवळपास पूर्णत्वाला नेला आहे. मात्र समृद्धी महामार्ग सुरू करण्यासंबंधी सरकारनं अनेकदा तारीख घोषित केली, गेल्या वर्षी 31 डिसेंबर ही तारीख देण्यात आली होती. त्यानंतर अनेक ठिकाणी कामं अपूर्ण असल्यानं 31 मार्च 2022 पर्यंत नागपूर शिर्डी हा पहिला टप्पा सुरू करणार असं सरकारकडून सांगण्यात आलं होतं. पण अजूनही समृद्धी महामार्गाचं काम हे नागपूर जिल्ह्यातील पेकेज 1 चं काम उशिरा सुरू झाल्यानं तर, बुलढाणा जिल्ह्यातील पेकेज 7 मध्ये खडकपूर्णा नदीवरील पुलाचं काम अपूर्ण असल्यानं आणि औरंगाबाद जिल्ह्यातील पेकेज 9 मधील काही ठिकाणी घाट सेक्शनचं काम अपूर्ण असल्यानं अजूनही 31 मार्चपर्यंत हा महामार्ग सुरू होण्याची शक्यता कमीच असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे वारंवार सरकारकडून तारखा जाहीर झाल्यावरही समृद्धी महमार्ग का सुरू होऊ शकत नाही? असा प्रश्न आता उपस्थित राहत आहे. याबाबत मात्र अधिकारी सरकार स्तरावरून यासंबंधी तारीख जाहीर होईल, असं सांगत असले तरी मात्र महामार्गाचं अजूनही राहिलेलं काम बघता नागपूर-शिर्डी या टप्प्याला पुढील तीन महिने सुरू करण्यास लागतील असं चित्र आहे.
सरकारने जाहीर केल्याप्रमाणे 31 मार्च 2022 पर्यंत नागपूर-शिर्डी या पहिल्या टप्यातील मार्ग सुरू न होऊ शकण्याची काय कारणं?
- महामार्गाच्या सुरुवातीलाच नागपूर शहराजवळील पेकेज 1 चं काम सुरुवातीलाच उशिरा सुरू झालंय
- कोरोना आणि लॉकडाऊनमुळे काम बंद पडलं होत
- बुलढाणा जिल्ह्यातील पॅकेज 7 मधील खडकपूर्णा नदीवरील पूलाचं काम अजूनही अपूर्णच
- औरंगाबाद जिल्ह्यातील पेकेज 9 मधील काही ठिकाणी घाट सेक्शनमधील काम अपूर्ण
दरम्यान, एकूण 16 टप्प्यांत या महामार्गाचं बांधकाम सुरू असून एकंदरीत नागपूर मुंबई या 701 किलोमीटरच्या महमार्गात एकूण 1699 ठिकाणी छोटी मोठी बांधकामं असून यातील जवळपास 1400 च्यावर बांधकामं पूर्ण झाली असून उरलेली बांधकामं अजून तरी जवळपास एक वर्षांचा कालावधी घेतील, अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे आता सरकारनं उद्घाटन तारीख जाहीर न करता प्रत्यक्ष काम कधी पूर्ण होईल यावर लक्षं देणं गरजेचं आहे.