महसूल विभागातील सहा उपजिल्हाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होणार, कामावर रूजू न झाल्यानं कारवाईचा बडगा
कामावर रूजू न झाल्याने थेट निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे. मागील आठवड्यात 11 अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती.
मुंबई : बदली झाल्यानंतर कामाच्या ठिकाणी रूजू न होणाऱ्या अधिकाऱ्यांवर राज्य सरकारकडून कारवाई करण्यात येत आहे. एप्रिल महिन्यात बदली होऊनही कामाच्या ठिकाणी रूजू न झाल्याने महसूल विभागातील सहा उपजिल्हाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई (Maharashtra Revenue Department Officer Suspension) करण्यात येणार आहे. कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतरही कामावर रूजू न झाल्याने थेट निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे. मागील आठवड्यात 11 अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती.
अनेक अधिकारी हे बदलीनंतर आपल्या जागेवर रुजू न होता मनासारख्या ठिकाणी बदली मिळावी यासाठी विविध मार्गांनी प्रयत्न करत असतात.एप्रिल महिन्यात या अधिकाऱ्यांची बदली झाली होती. मात्र मनासारखी पोस्टिंग न मिळाल्याने हे अधिकारी अद्याप कामावर रुजू झालेले नाहीत. अनेक वेळा कारणे दाखवा नोटीस पाठवल्यानंतर ही हे अधिकारी रुजू न झाल्याने थेट निलंबनाची कारवाई करायला सुरुवात केली आहे. राज्य सराकारकडून या आठवड्यातील ही दुसरी कारवाई आहे.
बदलीचे नियम जर पाहिले तर जिल्ह्यात बदली झाली असेल तर तीन दिवसात आणि जिल्ह्याबाहेर बदली झाली असेल तर सात दिवसात बदलीच्या ठिकाणी रुजू व्हावे लागते. जर अधिकारी रुजू झाले नाही तर त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाते. पर्याप्त कारण असेल तर विभाग ते ग्राह्य धरते आणि पर्याप्त कारण नसेल तर कारवाई केली जाते. या नियमानुसार महसूल विभागाने अनेकदा या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसही पाठवली होती. परंतु पाच महिन्यात कोणतेही पर्याप्त कारण समोर न आल्याने हे पाऊल उचलण्यात आले आहे.
महसूल विभागातील अधिकाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले
नाण्याच्या दोन बाजू असतात तशा प्रत्येक घटनेला दोन बाजू असतात. त्यातील या घटनेतील एक बाजू म्हणजे जे अधिकारी कामावर रुजू झालेले नाही. त्यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई करून या विभागातील अधिकाऱ्यांना थेट इशारा दिलेला पाहायला मिळतोय. मात्र दुसरी बाजू म्हणाल तर ती ही तेवढीच महत्त्वाची आहे. विशिष्ट अधिकारी विशिष्ट क्रीम पोस्टिंगवरतीच वर्षानुवर्षे पाहायला मिळतात. त्याचा ही विचार कधी होणार का? हा ही प्रश्न तेवढाच ऐरणीवर आलेला पाहायला मिळतोय. एकाच आठवड्यात महसूल विभागाने या अधिकाऱ्यावर कारवाईचा चांगलाच बडगा उगारलेला पाहायला मिळतोय. बदली झाल्यानंतर तब्बल 18 अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. या सर्वांवर थेट निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे महसूल विभागातील अधिकाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणलेले पाहायला मिळत आहेत.
हे ही वाचा :