(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री म्हणतात, 'मुंबईत पाऊस जास्त झाला, त्यामुळे पंप निकामी ठरले'
मुंबईत पाऊस जास्त झाल्यानं जे पंप बसवले होते, तेही फारसे उपयोगी ठरले नसल्याचे वक्तव्य राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील (Minister Anil Patil) यांनी केलं.
Anil Patil on Maharashtra Mumbai Rain : राज्यात कालपासून जोरदार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. गेल्या 3 ते 4 तासात 300 मीमीपेक्षा जास्त पाऊस झालाय. मुंबईत पाऊस जास्त झाल्यानं जे पंप बसवले होते, तेही फारसे उपयोगी ठरले नसल्याचे वक्तव्य राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील (Minister Anil Patil) यांनी केलं. कुर्ला, चुनाभट्टी परिसरात अधिक समस्या आहे. मिठी नदीचं पाणीही वाढलं होतं. मात्र, प्रशासन कालपासूनच सज्ज होतं असही पाटील म्हणाले.
हळूहळू पाण्याचा निचरा होण्यास सुरुवात
दरम्यान, आता हळूहळू पाण्याचा निचरा होण्यास सुरुवात झाली आहे. शाळांना आज सुट्टी जाहीर केली आहे.पाऊस जास्त झाल्यानं जे पंप बसवले होते तेही फारसे उपयोगी ठरले नाहीत असे अनिल पाटील म्हणाले. पण सगळे पंप सुरु होते, नालेसफाई योग्य झाली आहे, म्हणून इतका पाऊस होऊनही पाणी इतक्या लवकर कमी झाल्याचे पाटील म्हणाले.
मुंबईच्या पावसाचा फटका आमदारांसह मंत्र्यांनाही
काल रात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळं मुंबईतील काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. रस्त्यांवर, रेल्वे ट्रकवर सर्वत्र पाणीच पाणी झालं आहे. याचा परिणाम वाहतुकीवर देखील झाला आहे. अनेक ठिकाणी रेल्वे गाड्या मध्येच अडकून पडल्या आहेत. याचा फटका मंत्री अनिल पाटील आणि आमदार अमोल मिटकरी यांना झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, ट्रेनमधून उतरुन रेल्वे ट्रकवरुन चालतानाचा एक व्हीडिओ समोर आला. यामध्ये मंत्री अनिल पाटील आणि आमदार मिटकरी चालताना दिसत आहेत. तसेच अमोल मिटकरी त्यांच्या परिस्थितीबाबत माहिती देताना दिसत आहेत. आणखी आठ ते दहा आमदार आम्ही असलेल्या एक्सप्रेस ट्रेनमध्ये अडकून पडले आहेत. पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे आज आम्ही वेगळा अनुभव घेतोय. राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाचा अंतिम आठवडा आहे. रेल्वेची वाहतूक लवकर सुरळीत होईल, अशी अपेक्षा असल्याचे अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.
आजही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा
दरम्यान, आज मुंबईस राज्यातील इतरही भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी नदी नाले दुथडी भरुन वाहत आहे. त्यामुळं काही भागात वाहतुकीवर परिणाम झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
महत्वाच्या बातम्या: