(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Rain : राज्यात आजपासून अवकाळीचे 'ढग', शेतकरी चिंतेत, वाचा हवामान विभागाचा अंदाज
Maharashtra Rain : आजपासून राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) इशारा हवामान विभागाकडून (IMD) देण्यात आला आहे.
Maharashtra Rain : राज्यातील तापमानात (Temperature) सातत्याने चढ उतार होत आहे. आजपासून (14 मार्च) राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) इशारा हवामान विभागाकडून (IMD) देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात गारपिटीसह पावसाची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रात 15 आणि 16 मार्चला अवकाळी पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भात 16 आणि 17 मार्चला काही ठिकाणी गारपिटीसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरसह, जालना, बीड आणि परभणीत पावसाचा अंदाज
गेल्या आठवड्यात राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. अशातच आता पुन्हा हवामान विभागाने आजपासून पावसाचा अंदाज वर्तवल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आज मराठवाड्यातही अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक राहून हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
गव्हासह फळपिकांना मोठा फटका
दरम्यान, 5 ते 7 मार्चदरम्यान मराठवाड्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होते. काढणीला आलेला गव्हाचं पीक अक्षरशः आडवं झालं होतं. सोबतच उन्हाळी पिकासह फळ भागांना देखील या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळे आधी अतिवृष्टी आणि आता अवकाळी पावसामुळे यावर्षी दोन्ही हंगामात शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागला आहे.
कोकणातही हलक्या पावसाची शक्यता
कोकणात देखील काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. पालघर जिल्ह्यात पुढील दोन दिवस वादळी वारा, मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 14 ते 16 मार्च, दरम्यान पालघर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या: