(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Rain Live Updates :कोयना धरणाच्या विद्युत प्रकल्पातून 2,100 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू
Maharashtra Rain Live : राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे.
LIVE
Background
Maharashtra Rain Live Updates : राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. मुंबईसह परिसरात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. तसेच राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पाऊस पडत आहेत. काही ठिकाणी नद्यांना पूर आल्यामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
नागपूर पाऊस
नागपूर जिल्ह्यात देखील जोरदार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळं नदी नाल्यांना पूर आला आहे. पोहरा नदीला पूर आल्यामुळं त्याचे विहीर गावात शिरलं आहे. या गावाच्या परिसरातील काही जण पुराच्या पाण्यात अडकले होते. त्यांना NDRF च्या मदतीने रेस्क्यू करण्यात आले आहे. या पावसामुळं वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.
कोल्हापूर पाऊस
कोल्हापूर शहरामध्ये देखील जोरदार पाऊस कोसळत आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसाने नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ सुरुच आहे. राधानगरी धरणाचे आतापर्यंत स्वयंचलित चार दरवाजे उघडले आहेत. धरणाचे एकूण 4 दरवाजे (3,4,5,6 ) उघडले गेले आहेत. गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने पंचगंगा नदीने मोसमात प्रथमच इशारा पातळी गाठली आहे. या पावसामुळं कोकणात जाणारे दोन्ही मार्ग बंद करण्यात आले होते.
Koyana Dam : कोयना धरणाच्या विद्युत प्रकल्पातून 2100 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू
सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाच्या विद्युत प्रकल्पातून 2100 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील वर्धा नदीला पूर, उकणी गावात शिरलं पुराचे पाणी
यवतमाळ जिल्ह्यातील वर्धा नदीला पूर आला आहे. उकणी गावात पुराचे पाणी शिरले आहे. अप्पर वर्धा आणि लोअर वर्धा धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्हयातील वणी तालुक्यातून वाहणाऱ्या वर्धा नदीला पूर स्थिती निर्माण झाली असून उकनी गावात पाणी शिरले आहे. काही घरात सुद्धा पाणी गेल्याची माहिती आहे. त्यामुळं गावातील संपूर्ण रस्ते जलमय झाले. नागरिकांनी 2 ते 3 फूट पाण्यातून चालत जाऊन मार्ग काढावा लागत आहे. जनावरांच्या गोठ्यात पाणी असल्याने चारा सुद्धा नष्ट झाला. ऐका महिन्यात दुसऱ्यांदा या गावाला पुराच्या पाण्याचा तडाखा सहन करावा लागला. या भागातील शेतात ही मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने पिकांचे ही नुकसान झाले.
अकोला जिल्ह्यातील पुर्णा नदीला मोठा पूर, अकोला-अकोट रस्ता बंद
Akola Rain : अकोला जिल्ह्यातील पुर्णा नदीला मोठा पूर आला आहे. या पुरामुळे जिल्ह्यातील गांधीग्राम येथील पुर्णा नदीच्या पुलावर पाच फुट पाणी आहे. यामुळं अकोला-अकोट रस्ता बंद झाला आहे. या परिस्थिमुळे अकोटच्या जिल्हा मुख्यालयासोबतचा संपर्क तुटला आहे. यासोबतच अकोटला लागून असलेल्या मध्य प्रदेशातील खंडवा, बर्हाणपुर, अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जीचा अकोल्यासोबतचा संपर्कही तुटला आहे. जिल्ह्यात आजही पावसाची रिपरिप सुरु आहे. यामुळं पूर परिस्थित वाढ होण्याची शक्यता आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासून संततधार, मच्छीमारांना मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचं आवाहन
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासून संततधार पाऊस पडत आहे. जिल्ह्यात सर्वत्र भागात संततधार पाऊस कोसळत असून समुद्र खवळलेला असून मच्छीमारांना मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असे आवाहन केले आहे. देवगड बंदरात मुंबई आणि गुजरातमधील 61 बोटी समुद्रात उधाण असल्याने गेल्या तीन दिवसांपासून आश्रयाला आहेत. जिल्ह्यातील तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 377.995 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 84.49 टक्के भरले आहे. सध्या या धरणातून एकूण 6 हजार 278 क्युसेक्स विसर्ग सुरु आहे. जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
NDRF च्या जवानांना कोल्हापुरातील महिलांनी बांधली राखी, अनोखा रक्षाबंधन सोहळा
Kolhapur Rain : पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यासाठी एनडीआरएफ जवानांच्या दोन टीम तैनात करण्यात आल्या आहेत. गेल्या महिनाभरापासून एनडीआरएफच्या या टीम कोल्हापूरमध्ये तळ ठोकून आहेत. आज रक्षाबंधन आहे. या पवित्र सणाच्या दिवशी आपल्या रक्षणासाठी आलेल्या एनडीआरएफ जवानांना कोल्हापुरातील महिला भगिनींनी राखी बांधून अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन सोहळा पार पाडला आहे. एनडीआरएफचे जवान हे आपलं रक्षण करण्यासाठीच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आले आहेत. त्यामुळं त्यांना राखी बांधून या जवानांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न कोल्हापुरातील महिलांनी केला आहे. एनडीआरएफच्या जवानांनी देखील या महिला भगिनींचे आभार मानून आमच्या सर्व जवानांना अशाच पद्धतीने प्रेम मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली.