Maharashtra Monsoon Rain LIVE : मुंबईसह परिसरात पहाटेपासूनचं पावसाला सुरुवात, कोकणसह मध्य महाराष्ट्रात जोर वाढणार 

पहाटेपासूनचं मुंबई आणि परिसरात पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळं हवेत चांगलाच गारवा निर्माण झाला आहे. उकाड्यापासून मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 19 Jun 2022 03:28 PM
Aurangabad: औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागात पावसाची दमदार हजेरी

Aurangabad Rain Update: औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण रविवारी अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. वैजापूर तालुक्यातील पोखरी गावात पावसाने हजेरी लावली आहे. तर पैठणमध्ये सुद्धा जोरदार पाऊस पडत आहे.

पालघर जिल्ह्यात वीज पडून दोन वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू



पालघर जिल्ह्यातील मनोर जवळील येंबुर (टोकेपाडा) गावात वीज पडून दोन वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली.  यश सचिन घाटाल अस मृत मुलाचं नाव आहे. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास यश घरासमोरील अंगणात खेळत असताना कोसळलेल्या विजेचा त्याला झटका लागला. त्यानंतर मनोर येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले होते. दरम्यान डॉक्टरांनी यश मृत पावल्याच सांगितलं.

 




 
पहाटेपासून रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पाऊस, शेतकऱ्यांमध्ये आनंद

Ratnagiri Rain : हवामान विभागाने जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यानंतर आज पहाटेपासून रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत. यंदा पावसाचे आगमन उशिरा झाले. त्यानंतर मात्र पावसाची प्रगती अपेक्षित अशी दिसत नव्हती. सध्या कोसळत असलेला पाऊस हा शेतीसाठी पूरक असणार आहे. आणखी काही दिवसानंतर कोकणातील भात शेतीच्या लावणीला सुरुवात होणार असून आता कोसळत असलेल्या पावसामुळं शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.


 
औरंगाबाद जिल्ह्यात पावसाला सुरुवात, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

औरंगाबाद जिल्ह्यात पावसाला सुरुवात जाली आहे. पैठण तालुक्यातील काही भागात जोरदार पाऊस सुरु आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

चेंबूरमध्ये दरड कोसळून 2 जण जखमी
आज पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास  चेंबूरच्या आरसीएफ न्यू भारतनगर या डोंगराळ झोपडपट्टीमध्ये दरड कोसळल्याची घटना घडली. एक भला मोठा दगड एका झोपडीवर कोसळला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या झोपडीमध्ये रहाणारे अरविंद प्रजापती आणि आशिष प्रजापती हे जखमी झाले आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणत डोंगराळ भागात झोपड्या आहेत. दरवर्षी इथे पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात. त्यामुळं इथल्या नागरिकांना स्थलांतरित होण्याच्या नोटीस पालिका देत असते. मात्र, इथले नागरिक जाणार तरी कुठे? असा प्रश्न असल्याने मनसेतर्फे विचारण्यात आला आहे. इथल्या नागरिकांना सरकारने तात्पुरता निवारा देण्याची मागणी केली आहे.

 
ठाण्यात जोरदार पावसाला सुरूवात

ठाण्यात जोरदार पावसाला सुरूवात



मुंबईतील दादर परिसरात जोरदार पावसाला सुरुवात

मुंबईतील दादर परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. 

हिंगोलीसह नांदेड जिल्ह्यात ढगाळ वातावरण...

हिंगोली जिल्ह्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. परंतू पाऊस पडला नाही. पेरणीसाठी शेतकरी पावसाची वाट बघत आहेत. तसेच नांदेड जिल्ह्यातही सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे.

तळकोकणात पहाटेपासून रिमझिम पाऊस तर आंबोलीत दाट धुकं, जिल्ह्यात यलो अलर्ट

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहाटेपासून रिमझिम पाऊस सुरु झाला आहे. जिल्ह्यात सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, वैभववाडी, दोडामार्ग तालुक्यात सर्वत्र रिमझिम पाऊस पडला. दोन ते तीन तास रिमझिम पावसाने हजेरी लावली होती. हवामान खात्याने दक्षिण कोकणात काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. तर यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र, समाधानकारक पाऊस पडत नसल्याने बळीराजा मात्र चिंतेत आहे. महाराष्ट्राच्या चेरापुंजी म्हणजे आंबोलीत दाट धुकं पडलं आहे. वाहनचालकांना या धुक्यातुन घाटमार्गात वाहने चालवताना अडचणी येत आहेत. मात्र घाटातून ये जा करणारे पर्यटक या नजाऱ्याचा आनंद लुटत आहेत

पालघर जिल्ह्यात पहाटेपासूनच पावसाची हजेरी

Palghar rain : पालघर जिल्ह्यात आज ढगाळ वातावरण असून, किनारपट्टीच्या काही भागात पहाटेपासूनच पावसानं हजेरी लावली आहे. काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस सुरु आहे.

आसामच्या चिरांग जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर, हजारो लोक बाधित 

आसाममध्ये मुसळधार पावसानं पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी नद्यांना पूर आले आहेत. तेथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान, SDRF च्या पथकांनी 100 हून अधिक गावकऱ्यांची सुटका केली आहे. हे सर्वजण पुरात  अडकले होते. या सर्वांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.


 





पार्श्वभूमी

Maharashtra Monsoon Rain LIVE : आज पहाटेपासूनचं मुंबई आणि परिसरात पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळं हवेत चांगलाच गारवा निर्माण झाला आहे. उकाड्यापासून मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. मात्र, राज्याच्या इतर भागात अद्याप म्हणावा तसा पाऊस झाला नाही. राज्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे. शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरणीची तयारी केली आहे. मात्र, पावसानं दडी मारल्यानं शेतकरी चिंतेत आहेत.


हवामान विभागाचा अंदाज


दरम्यान, येत्या 4 दिवसात राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पुढील दोन दिवस राज्यातील विविध भागात वादळी वाऱ्याची शक्यता आहे. त्यानंतरच्या 3 दिवसांपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मुंबई ठाण्यातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


राज्याच्या काही भागात सुरुवातील पावसानं चांगली हजेरी लावली होती. या पवासामुळं शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. या पावसामुळं पेरणीपूर्व कामांना वेग आला आहे. मात्र, पावसानं पुन्हा दडी मारली आहे. पेरणीसाठी शेतकरी पावसाची वाट बघत आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांनी नेमकी पेरणी कधी करावी असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर कृषी विद्यापीठ आणि कृषी तज्ज्ञांनाकडून याबाबत सल्ला मिळाला आहे. 75 ते 100 मिलीमीटर पाऊस पडेपर्यंत शेतकऱ्यांना पेरणीची घाई करु नये असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. दुबार पेरणीची अडचण टाळण्यासाठी कृषी तज्ज्ञांनी हा सल्ला दिला आहे.  


पेरण्या रखडल्या


एकीकडे हवामान खात्याकडून भाकितांचा पाऊस पडतोय, तर दुसरीकडे राज्यभरात पावसाअभावी पेरणी रखडली आहे. मान्सूननं महाराष्ट्र व्यापल्याचं हवामान खात्यानं जाहीर केलं असलं तरी प्रत्यक्षात राज्यभरात पावसाची प्रतीक्षा आहे. जूनचा तिसरा आठवडा संपायला आलाय, तरी राज्यभरात केवळ 1 टक्का इतकीच पेरणी झाली आहे. राज्यातील खरीपाच्या दीड कोटी हेक्टर क्षेत्रापैकी 17 जूनपर्यंत केवळ एक लाख 47 हजार हेक्टरवर (एक टक्का) पेरणी झाली आहे. गतवर्षी 17 जूनपर्यंत पावणेपाच लाख हेक्टरवर पिकांची पेरणी झाली होती. पण, आता पावसानं दडी मारल्याने शेतकऱ्यांना पेरणीची तिफण गोठ्यातच ठेवावी लागली आहे. राज्यात खरीप हंगामातील तृण धान्याखालील क्षेत्र 36 लाख 37 हजार हेक्टरपर्यंत आहे. तर तेलबियांचे (भुईमूग, तीळ, कारळ, सुर्यफूल, सोयाबीन) क्षेत्र 41 लाख 58 हजार हेक्टर तर कापसाचं क्षेत्र जवळपास 42 लाख हेक्टरपर्यंत आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.