Rohit Sharma fail Ranji Trophy : रणजी ट्रॉफीचा सहावा टप्पा सुरू झाला आहे. आज, म्हणजे गुरुवार 23 जानेवारीपासून अनेक संघांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सामने खेळले जात आहेत, ज्यामध्ये टीम इंडियाचे अनेक स्टार खेळाडू सहभागी होत आहेत. यामध्ये एक नाव भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचेही आहे. तो 3365 दिवसांनी रणजी ट्रॉफी सामना खेळत आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील मुंबईच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याचे नाव समाविष्ट आहे. रोहितने या स्पर्धेत शेवटचा सहभाग सुमारे 10 वर्षांपूर्वी 7 नोव्हेंबर 2015 रोजी उत्तर प्रदेशविरुद्ध घेतला होता. यावेळी तो जम्मू आणि काश्मीर विरुद्ध खेळत आहे.


रणजी ट्रॉफीच्या या हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात मुंबईचा सामना जम्मू आणि काश्मीरशी आहे तर पंजाबचा संघ कर्नाटकविरुद्ध खेळत आहे. जम्मू आणि काश्मीर विरुद्धच्या सामन्यात मुंबईकडून रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी डावाची सुरुवात केली, परंतु दोघेही चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरले. जैस्वाल 8 चेंडूत 4 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर एलबीडब्ल्यू झाला, तर रोहित शर्माने 19 चेंडूत 3 धावा केल्या.






दुसरीकडे, कर्नाटकविरुद्ध पंजाब संघाची कमान शुभमन गिलकडे सोपवण्यात आली, आणि या सामन्यात गिलने प्रभसिमरन सिंगसोबत डावाची सुरुवात केली, परंतु गिलचा खराब फॉर्म येथेही कायम राहिला आणि तो 8 चेंडूत 1 चौकारासह 4 धावा काढून बाद झाला. म्हणजेच, रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल, हे तिघेही दिग्गज खेळाडू या रणजी हंगामातील त्यांच्या पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात फेल ठरले.






आता सर्वांच्या नजरा दिल्लीकडून खेळणाऱ्या ऋषभ पंतवर आहेत. दिल्लीचा सौराष्ट्र विरुद्धचा सामना सुरू आहे. विराट कोहली आणि केएल राहुल सध्या देशांतर्गत सामन्यांपासून दूर आहेत. कोहलीला मानदुखीचा त्रास आहे तर राहुलला कोपरात दुखापत झाली आहे, परंतु हे दोन्ही खेळाडू 30 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या पुढील सामन्यासाठी उपलब्ध असतील अशी अपेक्षा आहे.


भारताला 6 फेब्रुवारीपासून इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळायची आहे, त्यामुळे 30 जानेवारीपासून सुरू होणारा रणजी सामना हा त्याच्यासाठी खेळण्याची शेवटची संधी असेल. 19 फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होत आहे.


हे ही वाचा -


Abhishek Sharma : अभिषेक शर्मावर अन्याय? टीम इंडियाच्या विजयात मोलाचा वाटा, तरी मिळाला नाही सामनावीर पुरस्कार