शिर्डी : साईबाबा मंदिर (Sai Baba Mandir) परिसरात साईबाबांच्या समकालीन भक्तांच्या समाधी आहेत. इतर समाधीवर जमा होणारा पैसा साई संस्थानकडे जमा होतो तर अब्दुलबाबा समाधीवर जमा होणारा पैसा त्यांचे वंशज परस्पर घरी नेत असल्याचा आरोप सध्या केला जात आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी यावर आक्षेप घेतला आहे. हा सगळा प्रकार बेकायदेशीर असून समाधीवर जमा होणारा पैसा सरकार जमा व्हावा, अशी मागणी संग्राम जगताप यांनी केली आहे. संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी दर्ग्याबाबत आक्षेप व्यक्त केल्यानंतर आता मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनने (Muslim Welfare Association) संग्राम जगताप यांना खरमरीत पत्र लिहिले आहे. त्यामुळे शिर्डी मंदिर परिसरातील हाजी अब्दुल बाबा दर्गा वाद वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


आमदार संग्राम जगताप हे हाजी अब्दुल बाबा यांच्या दर्ग्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करून जाणीवपूर्वक धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप पत्रातून करण्यात आलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकीकडे शिव, शाहू, फुले, आंबेडकर विचारधारा मानत असल्याचे म्हणत असताना दुसरीकडे मात्र त्यांच्याच पक्षाचे आमदार धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.   


...तर संग्राम जगताप जबाबदार


शिर्डी संस्थान आणि स्थानिक नागरिक हाजी अब्दुल बाबा दर्ग्याबाबत योग्य ते निर्णय घेतील. आपण जाणीवपूर्वक वाद निर्माण होईल, अशा कृती करू नका, असे आवाहन मुस्लिम विल्फेअर असोसिएशनचे प्रमुख सलीम सारंग यांनी संग्राम जगताप यांना केले आहे. जर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याची पूर्णपणे जबाबदारी संग्राम जगताप यांची राहील, अशी भूमिका सलीम सारंग यांनी पत्रातून व्यक्त केली आहे. आता यावर संग्राम जगताप काय प्रतिक्रिया देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 


संग्राम जगताप यांनी उद्ध्वस्त केले अतिक्रमण 


दरम्यान, अष्टविनायकांपैकी एक असलेल्या सिद्धटेक येथील सिद्धिविनायक मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ अतिक्रमण करून उभारलेले थडगेसदृश बांधकाम आमदार संग्राम जगताप यांच्यासह श्रीराम प्रतिष्ठानचे राज्य अध्यक्ष सागर बेग आणि कार्यकर्त्यांनी काही दिवसांपूर्वी जमीनदोस्त केले होते. सिद्धटेक येथील सिद्धिविनायक मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या जवळच अनधिकृतरीत्या थडगेसदृश बांधकाम करण्यात आले होते. त्याच्या आधारे काही जण प्रशासनाला वेठीस धरत असल्याचाही आरोप होत होता. त्यामुळे ते बांधकाम तेथून हटवावे, अशी मागणी सकल हिंदू समाजातर्फे जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून करण्यात आली होती. मात्र प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नव्हती. त्यामुळे  सिद्धटेक येथील अतिक्रमण संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली जमीनदोस्त करण्यात आले. 


आणखी वाचा 


Jalgaon Train Accident: सून मृत सासूला सावरत असताना चोरट्यांची हातसफाई; जळगावमध्ये नेपाळच्या महिलेसोबत काय घडलं?