Maharashtra Rain LIVE Update : राज्यात अनेक ठिकाणी पाऊस, वाचा पावसासंबंधी प्रत्येक अपडेट
Maharashtra Rain Update : हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. सर्वदूर पावसाने हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
LIVE
Background
Maharashtra Rain Update : हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. सर्वदूर पावसाने हजेरी लावल्यानं पेरणी झाल्यानंतर आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात पुढील पाच दिवस दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा सर्वत्र चांगला पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
मराठवाड्यात सर्वत्र पावसाची हजेरी
मागच्या 24 तासात मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झालाय.परभणी,नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालाय, उस्मानाबादमध्ये ही जोरदार पाऊस झालाय तर बीड,लातूर,औरंगाबादमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस झालाय. ज्यामुळे अनेक पिकांना मात्र जीवदान मिळाले असले तरी नांदेड आणि परभणी शहराची अवस्था मात्र फार वाईट झाली होती. सतत पडत असलेल्या पावसाने अनेक ठिकाणी रस्त्यावर आणि सखल भागात पाणीच पाणी झाले होते.परभणीत भीम नगर,क्रांती नगर,इंदिरा गांधी नगर,रामकृष्ण नगर मधील काही घरात पाणी शिरले तर रेल्वेस्थानक, बस स्थानक पूर्ण पाण्यात गेले होते.नांदेडमध्येही हीच परिस्थिती पाहायला मिळालीय.
उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वदूर संततधार
काल रात्री उशीरापर्यंत उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वदूर संततधार झाली. उस्मानाबाद शहरासह जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. सतत चार तासाच्या पावसाने शहरातील रस्ते पाण्याखाली गेले होते. उस्मानाबादेत नव्याने तयार करण्यात आलेल्या मुख्य रस्त्यांवर अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहनधारकांची तारांबळ उडाली. बसवेश्वर चौक ते जिजाऊ चौकादरम्यानच्या अर्धवट काम असणाऱ्या पुलांवर पाणी साठले होते. बसस्थानक परिसर तसेच संजीवन हॉस्पिटल जवळ पाणी साचल्याने वाहनधारकांना मार्ग काढताना कसरत करावी लागली. ग्रामीण भागापेक्षा शहर आणि परिसरात पावसाचा जोर होता. पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी..
पावसाळ्याच्या तोंडावर धो-धो बरसणाऱ्या पावसाने पेरणीनंतर उघडीप दिली होती. त्यामुळे बीड जिल्ह्यातील काही भागात पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. मात्र मागच्या दोन दिवसापासून बीड जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने दुबार पेरणीचे संकट टळले आहे. काल दुपारपासून बीड जिल्ह्यात पुन्हा दमदार पावसाने सुरुवात केली आहे. बीड शहरामध्ये मध्यम स्वरूपाचा तर अंबाजोगाई तालुक्यात परळी आणि माजलगाव परिसरामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे
नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस
गेल्या महिनाभर दडी मारलेल्या पावसाने कालपासून नांदेड शहरासह जिल्हाभरात दमदार हजेरी लावलीय. काल दुपारनंतर झालेल्या जोरदार पावसामुळे नांदेड शहर मात्र जलमय झालेय.नांदेड शहरातील भाग्यनगर, आनंद नगर, तरोडा नाका, भावसारचौक ,महावीर चौक ,वाजीराबाद चौकातील सखल भागात पाणी साचून पुरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन शहर तुंबल्याची स्थिती निर्माण झालीय. नांदेड शहरातील ड्रेनेज व नाल्यांचे पाणी रस्त्यावर येऊन शहरातील सर्व रस्ते मात्र जलमय झालेत. परंतु पहिल्याच पावसात शहरातील रस्ते तुंबल्यामुळे नांदेड वाघाळा शहर महापालिकेच्या नाले सफाई मोहिमेचे मात्र पितळ उघडे झालेय. या मुसळधार पावसामुळे नांदेड शहरातील तरोडा नाका, गोकुळ नगर, लेबर कॉलनी परिसरातील नागरिकांच्या घरात व दुकानात पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झालेय. महापालिकेने मान्सूनपूर्व नाले सफाईच्या कामात केलेला ढिसाळपणा यामुळे मात्र उघड झालाय.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू
सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सतत पावसामुळं जिल्ह्यातील नद्याच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. कुडाळ, कणकवली, वेंगुर्ले, सावंतवाडी, दोडामार्गमध्ये मुसळधार तर देवगड, वैभववाडीत संततधार पाऊस सुरू आहे. रात्रीपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण सरासरी 1323.91 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात रविवारी दुपारनंतर पाऊस
रत्नागिरी जिल्ह्यात रविवारी दुपारनंतर चांगलाच पाऊस बरसत आहे. सद्यस्थितीत पावसानं जिल्ह्याच्या दक्षिण भागात काहीशी उसंत घेतली आहे. पण, उत्तर भागात मात्र पावसाच्या सरी बरसत आहेत. दरम्यान, मुसळधार कोसळणाऱ्या पावसानं संगमेश्वरमधील माखजन बाजारपेठेत पाणी शिरलं आहे. बावनदी, सोनवी आणि शास्त्री या नद्यांच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे. पुढील 2 दिवस दक्षिण कोकणात अर्थात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील चांगलाच पाऊस बरसत असून नद्यांच्या पाणी पातळीत देखील वाढ होत आहे. अशीच स्थिती पावसाची कायम राहिल्यास नद्यांना पुराची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण, जवळपास 10 दिवसानंतर पावसाचं आगमन झाल्यानं बळीराजा मात्र सुखावला असून शेतीची कामं उरकण्याकडे त्याचा कल दिसून येत आहे.
बुलढाणा : जिल्ह्यात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील अनेक नदी-नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे पूर्णा नदीची पातळी वाढली असून सातत्याने नदीच्या पातळीत वाढ होत आहे. रात्री तीन तास झालेल्या मुसळधार पावसाने शेतकरी मात्र सुखावला आहे.
अकोला: जिल्ह्यात काल रात्रीपर्यंत मुसळधार पावसानं सर्वच तालुक्यांत पूर परिस्थिती होती. 10 जुलैच्या मध्यरात्रीपासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू होती. यामुळे जिल्ह्यातील मुख्य नदी असलेल्या काटेपुर्णा नदीसह पठार, मन, बोर्डी नदीला पूर आले होते. अकोला आणि अकोटला जोडणाऱ्या गांधीग्राम येथील पुलापर्यंत पुराचे पाणी आले होते. आता मात्र, पाणी पातळी कमी झाल्याने अकोला- अकोट मार्ग बंद पडण्याची परिस्थिती तुर्तास टळलीय. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पुरामूळे शेतं खरडून गेली आहे. या सर्वदुर झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील रखडलेल्या पेरणीच्या कामांना मात्र वेग आलाय.
सिंधुदुर्ग : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांच्या शेतीच्या कामाला वेग
सिंधुदुर्ग : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांच्या शेतीच्या कामाला वेग,
सुखनदी, निर्मला, तिलारी, तेरेखोल नदी दुथडी भरून वाहत असून नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे,
वाघोटन नदी इशारा पातळीजवळ किनाऱ्यावरील गावांना सतर्कतेचा इशारा,
जिल्ह्यात १३ ते १६ जुलै पर्यत ऑरेंज अलर्ट असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे प्रशासनाने निर्देश
मुसळधार पावसामुळे बिदर -नांदेड राज्य महामार्गावरील निर्माणाधीन पूल गेला वाहून
नांदेड : कंधार तालुक्यातील फुलवळ येथील बिदर-नांदेड राज्य महामार्गावरील पुलाचे काम सुरू होते .कालच्या अचानक सुरू झालेल्या ढग फुटी सदृश्य मुसळधार पावसाच्या पाण्याने निर्माणाधीन पुल व पुलाच्या कामावरील सर्व साहित्य वाहून गेलंय, तर यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीय.
नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे सहस्रकुंडचा धबधबा दुसऱ्यांदा झाला प्रवाहित
मराठवाड्यात सीमेवरून वाहणारा पैनगंगा नदीवरील सहस्रकुंड धबधबा काल पासून चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे यावर्षी दुसऱ्यांदा ओसंडून प्रवाहित झालाय. नुकत्याच झालेल्या दमदार पावसाने सळसळ करत वाहू लागला आहे. हि बातमी समजताच पर्यटकांनि सहस्रकुंडची वाट धरली आहे. मागील वर्षी कोरोनामुळे पर्यटकांना या ठिकाणी जात आले नव्हते यंदा मात्र नांदेड जिल्हा अनलॉक झाल्याने पर्यटक सहस्त्रकुंड धबधब्याचे विहंगम दृश्य पाहण्यास जात आहेत.
रस्त्यावरून पाणी वाहत असताना एसटी चालकाने बस पाण्यातून काढली
गेल्या दोन दिवसांपासून पावसाने रायगड जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली आहे . त्यातच रविवारी दिवसभर रायगड जिल्ह्यातील मुरूड , श्रीवर्धन, रोहा, माणगाव, महाड, पोलादपूर भागात पावसाने धुवादार हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. याचदरम्यान, महाड तालुक्यातील विन्हेरे गावाकडे जाणाऱ्या मार्गावरील रेवतळे फाटा येथील रस्त्यावरून पाणी वाहत असताना एसटी चालकाने बस पाण्यातून मार्ग काढत नेली असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. रेवतळे नजीकच्या या मार्गावर पाण्याचा मोठा प्रवाह वाहताना दिसत असून एसटी चालकाने केलेल्या या अतिउत्साहामुळे प्रवाशांच्या जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु, केवळ सुदैवाने ही एसटी बस रस्त्याच्या पलीकडे गेल्याचे दिसत आहे.
गेल्या 24 तासात रायगड जिल्ह्यात सरासरी 139.57 मिमी पावसाची नोंद
रायगड : गेल्या 24 तासात रायगड जिल्ह्यात सरासरी 139.57 मिमी पावसाची नोंद.... तळा येथे सर्वाधिक 239, मुरूड 204, माणगाव 197, माथेरान 175.40 मिमी पावसाची नोंद, पोलादपूर येथे 168 , सुधागड 150 , रोहा 150 मिमी पावसाची नोंद...