Maharashtra Rain : पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, वाचा हवामान विभागाच अंदाज
Rain : राज्यात तुरळक ठिकाणी पावसानं (Maharashtra Rain) हजेरी लावली आहे. बहुतांश ठिकाणी पावसानं दडी मारल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
Maharashtra Rain : राज्यात तुरळक ठिकाणी पावसानं (Maharashtra Rain) हजेरी लावली आहे. बहुतांश ठिकाणी पावसानं दडी मारल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. जुलै महिन्याचा पंधरवाडा संपत आला तरी राज्यात अद्याप म्हणावा तसा पाऊस झाला नाही. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. शेतकरी पावसाची वाट बघत आहेत. दरम्यान, मुंबईसह उपनगरात पावसानं चांगली हजेरी लावली. त्याचबरोबर ठाणे, पालघर, वाशिम, यवतमाळ, नंदूरबार या जिल्ह्यातही पावसानं चांगली हजेरी लावली. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार, पुढचे चार ते पाच दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे.
या भागात पडणार पाऊस
सध्या राज्यात काही ठिकाणीच पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना पावसाची गरज आहे. मात्र, पावसानं चांगलीच दडी मारल्याचं चित्र दिसत आहे. काही ठिकाणी मात्र, जोरदार पाऊस पडत आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील पाच दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मराठवाड्यासह इतर काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
वाशिम जिल्ह्यात मुसळधार पाऊस
वाशिम जिल्ह्यात सर्वत्र पुन्हा मुसळधार पाऊस बरसला आहे. त्यामुळं आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. रिसोड तालुक्यातील कोयाळी भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. अनेक भागात चांगला पाऊस बरसल्यामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पेरणी केल्यानंतर दमदार पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागली होती.
यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस, शेती पिकांचं मोठं नुकसान
यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळला आहे. गेल्या तीस वर्षात इतका पाऊस गावात पडला नव्हता. इकडे शेतकऱ्यांनी जमिनीत स्वप्न पेरले होते. मात्र तो साखर झोपेत असतानाच त्याचे हे स्वप्न या पावसाने पुरते वाहून नेले. ज्या मातीच्या आधारे हे स्वप्न वर येते त्या मातीसहित या स्वप्नांचा चिखल झालाय. शेतात उरले फक्त दगड अन् खड्डे. मुसळधार कोसळलेल्या पावसाने सावरगाव, गोळेगाव , ब्राह्मनवाडा, शिरजगाव,पांढरी, पिंपळगाव काळे शिवारातील जवळपास 114 हेक्टर जमिनीवरील पिके पूर्णतः उध्वस्त झाल्याचा अंदाज आहे. एका पावसाने शेतकरी उघड्यावर पडले आहे. उद्ध्वस्त शेतशिवार अन् बांधा वरील हतबल बळीराजा हे दृश्य काळजाच्या ठिकऱ्या उडवणारे आहे.
पालघर जिल्ह्यात जोरदार पाऊस
पालघर जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे. जिल्ह्यातील सर्वात जास्त क्षमता असलेल्या सूर्या प्रकल्पातील धामणी धरणामध्ये तब्बल 50 टक्के पाणीसाठा झाला आहे. तसंच या धरणाच्या खाली असलेलं कवडास धरण ओव्हरफ्लो झालं आहे. धरण क्षेत्रामध्ये एकजून पासून आतापर्यंत एकूण एक हजार 739 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तसंच पालघर जिल्ह्यातील इतर लहान धरणांमध्येही चांगला पाणीसाठा जमा झाला आहे. या धरणांमधून पालघर जिल्ह्यातील प्रमुख शहरं आणि लगतच्या वसई विरार आणि मीरा-भाईंदर महापालिकांना पाणीपुरवठा होतो.
नंदुरबार जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु
नंदुरबार जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून पावसाची संततधार सुरु आहे. सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये मुसळधार पाऊस सुरु असल्याने जिल्ह्यातील नदी नाल्यांना पूर आले आहेत. त्याच्यासोबत मध्य प्रदेश मध्ये तापी नदीच्या उगम स्थळावर झालेल्या पावसामुळे हातनुर धरणांमधील पाण्याची पातळी वाढली असून हातनूर धरणाचे दहा दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले आहेत. त्यातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यातही जोरदार पाऊस असल्याने अनेक छोट्या मोठ्या नदी नाल्यांना पूर आले आहेत. त्यातून तापी नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्ह्यातील तापी नदी काठावरील नागरिकांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
Akola Rain Updates: अकोल्यात धुवांधार पाऊस; पुरात वाहून गेलेल्या चिमुकल्याचा मृतदेह तब्बल तेरा तासांनी सापडला