Professors Strike: सहायक प्राध्यापक पदभरती सुरू करण्यासाठी प्राध्यापकाचे चार दिवसांपासून कुटुंबासह अन्नत्याग आंदोलन
नांदेड येथील तासिका तत्वावर अध्यापन करणाऱ्या सहायक प्राध्यापकाचे चार दिवसांपासून कुटुंबासह अन्नत्याग आंदोलन. सरकारने प्राध्यापक पदभरती तात्काळ सुरू करावी ही मागणी करत अन्नत्याग.
नांदेड : सहायक प्राध्यापक पदांची भरती सुरू करण्यासाठी डॉ. परमेश्वर पौळ या तासिका तत्वावर अध्यापन करणाऱ्या प्राध्यापकाने गुरुवारपासून नांदेड येथील राहत्या घरी कुटुंबासह अन्नत्याग आंदोलन सुरू केलय. सतत पाठपुरावा करुनही दुर्लक्ष केल्यामुळे राज्य सरकार, उच्च शिक्षण विभागाच्या निषेधार्थ नेट-सेट पीएचडीधारक संघर्ष समितीच्या पदाधिकारी असणाऱ्या डॉ. परमेश्वर पौळ यांनी हे आंदोलन सुरु केलंय. गेल्या चार दिवसांपासून पोळ यांच्या घरची चूल अद्याप पेटली नाहीय. गेल्या चार दिवसांपासून आई वडिलांनी अन्नत्याग केल्यामुळे पोळ यांचा मुलगा आई वडिलांनी जेवण करावे यासाठी गयावया करतोय.
सदरील प्राध्यापक डॉ. परमेश्वर पौळ हे तासिका तत्त्वावर (सीएचबी) काम करणाऱ्या सहायक प्राध्यापकाचे नाव असून त्यांनी गुरुवारपासून अन्नत्याग केलं आहे. तसेच तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांना शासनाचे मिळणारे मानधनही अत्यल्प असून तेही वेळेवर मिळत नाहीय. त्यामुळे कुटुंबाचे भरणपोषण करणे अवघड झालंय. त्यात गेल्या दोन वर्षांपासून कोविडमुळे महाविद्यालये बंद असल्यामुळे तासिका प्राध्यापक बिनपगारी होऊन त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलीय. त्यामुळे प्राध्यापक पोळ यांनी समाजमाध्यमाद्वारे संदेश पाठवला आहे. त्यात असे म्हटले आहे की, माझ्या जीवाचे काही बरेवाईट झाल्यास उघड्या डोळ्यांनी आमचे शोषण करू पाहणारा उच्च व तंत्रशिक्षण विभाग जबाबदार असेल. राज्यभरातील सीएचबीधारकांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. आतापर्यंत सर्व जबाबदाऱ्या पार पाडत आहोत. परंतु, शासनातर्फे भरतीसंबंधी कोणताही सकारात्मक निर्णय होत नाही आणि भरतीबाबत शासन निर्णय घेत नसल्यामुळे अन्नत्याग करत असून आता हा शेवटचाच पर्याय आहे.
डॉ. परमेश्वर पोळ यांनी सहायक प्राध्यापक पद भरतीसाठी नेट-सेट पीएच.डी. संघर्ष समितीच्या माध्यमातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री, तसेच विविध मंत्री, आमदार, संचालक, सहसंचालक (उच्च शिक्षण) यांना प्रत्यक्ष निवेदन देऊन सहायक प्राध्यापक भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी प्रयत्न केलेत. पण आपल्या स्तरावर कोणत्याही प्रकारची कारवाई होताना दिसून न आल्याने शेवटी डॉ. परमेश्वर पोळ यांनी अन्नत्याग करण्याचा निर्णय घेतलाय.
शासन उच्चशिक्षित बेरोजगारांना पोकळ आश्वासन देऊन वेळ काढत असून अशा बेरोजगारांची फसवणूक करत आहे, असा आरोप प्राध्यापक पोळ यांनी केलाय. त्यामुळे मी सरकारचा निषेध करत अन्नत्याग सारखा निर्णय घ्यावा लागलाय. आई वडिलांनी अन्नत्याग केल्याचे पाहून प्रा. पोळ यांचा चिमुकला स्वराज यानेही अन्नत्याग आंदोलनात आपला सहभाग नोंदवलाय.