सांगलीत युवक काँग्रेसच्या निवडीवरुन विश्वजीत कदम-विशाल पाटील गटातील वाद उफाळला!
विशाल पाटील यांनी युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष आणि सांगली विधानसभा क्षेत्र अध्यक्षपदाची ऑनलाईन निवडणूक मॅनेज केल्याचा विश्वजीत कदम गटाकडून आरोप करण्यात आला आहे.
सांगली : सांगलीत युवक काँग्रेसच्या निवडीवरुन काँग्रेसअंतर्गत वाद उफाळला. कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांच्या गटातील वाद उफाळून आला आहे. विशाल पाटील यांनी युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष आणि सांगली विधानसभा क्षेत्र अध्यक्षपदाची ऑनलाईन निवडणूक मॅनेज केल्याचा कदम गटाकडून आरोप करण्यात आला आहे. ऑनलाईन मतदान आणि मतमोजणीत घोटाळा झाल्याचाही आरोप करण्यात आला असून प्रदेश आणि राष्ट्रीय काँगेसकडे तक्रार करणार असल्याचे युवक काँगेस शहर जिल्हाध्यक्ष स्पर्धेतील उमेदवार मंगेश चव्हाण यांनी सांगितलं.
सांगली मिरज विधानसभा मतदारसंघाच्या युवक काँग्रेस अध्यक्षपदासाठी विश्वजित कदम गटाचे मंगेश चव्हाण आणि विशाल पाटील गटाचे मनोज सरगर यांच्यात लढत झाली होती. यामध्ये मनोज सरगर यांनी बाजी मारली.
युवक काँग्रेस अध्यक्ष निवडीचा निकाल जाहीर होताच कदम गटाचे मंगेश चव्हाण समर्थक कार्यकर्ते नाराज झाले. विशाल पाटील यांनी ही निवडणूक मॅनेज केल्याचा मंगेश चव्हाण यांनी आरोप करत त्यांच्या कार्यकर्त्यांनी आंबेडकर रस्त्यावर एका एसटी बसवर दगडफेक केली, यात तिच्या काचा फुटल्या. याबाबतीत विशाल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा गैरसमज झाला असून ही निवडणूक जे नियम आहेत त्या नियमानुसार पार पडली आहे, असा असा दावा केला आहे.
मंगेश चव्हाण यांचा आरोप
"आम्ही 37, 000 युवकांची मते ॲपद्वारे नोंदवली होती पण प्रत्यक्षात आम्हाला 12, 000 मते मिळाली आहेत. आम्ही नोंद केलेली 25, 000 मते कुठे गेली," असा सवाल मंगेश चव्हाण यांनी केला. "मतमोजणी आणि त्याच्या पेमेंटचे सर्व पुरावे आमच्याकडे आहेत. प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी ही निवडणूक मॅनेज केली. त्यांच्या गटाने केवळ सोळा हजार मते नोंदवली होती. तर दोन हजार मतांची पेमेंट न केल्याने त्यांची नोंद झाली होती. या गटाच्या उमेदवाराला 20 हजार मते मिळाली. ज्यादाची सहा हजार मते आली कुठून हा प्रश्न आहे. यामुळे युवक अध्यक्ष पदासाठीच्या प्रक्रियेत बोगसगिरी झाल्याचे निष्पन्न झालं आहे," असं चव्हाण यांनी म्हटलं आहे. याबाबत आम्ही महाराष्ट्र प्रदेश व राष्ट्रीय कार्यकारणीकडेही पुराव्यासह तक्रार करणार असल्याचे आणि फेरमतमोजणी मागणी करणार असल्याचे मंगेश चव्हाण यांनी सांगितलं.