Aurangabad Renaming : औरंगाबाद नामांतरावरून आघाडीत धुसफूस, शिवसेनेच्या प्रस्तावाला काँग्रेसचा विरोध!
Aurangabad Renaming As Sambhajinagar: औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्याच्या शिवसेनेच्या प्रस्तावाला काँग्रेस विरोध करणार असल्याचे म्हटले जात आहे.
Aurangabad Renaming As Sambhajinagar: महाविकास आघाडी सरकार संकटात आले असताना दुसरीकडे औरगांबाद जिल्ह्याच्या नामांतरावरून आघाडीत धुसफूस सुरू झाले असल्याचे समोर आले आहे. मंगळवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत शिवसेनेच्या अनिल परब यांनी औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावावर काँग्रेस नाराज असल्याचे वृत्त आहे. आज सकाळी सिल्वर ओकवर झालेल्या बैठकीत काँग्रेसने आपली नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती आहे.
आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 'सिल्वर ओक' या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते सहभागी झाले होते. मात्र, शिवसेनेचा एकही प्रतिनिधी सहभागी झाला नाही. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव शिवसेनेचे अनिल परब यांनी मंगळवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत मांडला होता. त्याच प्रस्तावावर आज सिल्व्हर ओक या निवासस्थानी बैठक झाली. काँग्रेसकडून शिवसेनेनं घेतलेल्या नामकरणाच्या मुद्द्यावर नाराजी व्यक्त करण्यात आली. आज संध्याकाळी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत प्रस्ताव आल्यास काँग्रेसकडून प्रस्तावाला विरोध करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राष्ट्रवादी- काँग्रेसच्या बैठकीनंतर काँग्रेसची देखील वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत नामकरणाला विरोध करण्याचा एकमुखी निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शिवसेनेत बंड केलेले आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटाकडूनही औरंगाबादच्या नामांतरावर प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. शिवसेनेकडून दीर्घकाळ याची मागणी करण्यात येत होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर या नामांतराचा मुद्दा भाजप, मनसेकडून उपस्थित करण्यात येत होता.
दरम्यान, राज्यात आता 7 हजार 231 पदांची पोलीस भरती होणार आहे.पोलीस भरतीला मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. या भरती संबंधिची प्रक्रिया तात्काळ राबवण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
या भरतीसाठी OMR आधारित लेखी परीक्षा प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती आहे. राज्ायतील पोलीस भरती ही दोन टप्प्यामध्ये करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील पाच हजार पोलीस भरती ही पूर्ण झाली असून दुसऱ्या टप्प्यातील सात हजार 231 पदांसाठीची ही भरती आता करण्यात येणार आहे. काही नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली असून त्यानुसार दुसऱ्या टप्प्यातील या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता या संबंधी प्रक्रिया त्वरीत सुरू करण्यात येणार असून तसे आदेश राज्याच्या पोलीस महासंचालकांना देण्यात आल्याचं दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं.