छगन भुजबळ ओबीसींचा मोठा चेहरा, फडणवीस आणि भुजबळ दोघे भूमिका जाहीर करतील, मंत्री शेलारांचं वक्तव्य
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीवर माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार (Minister Ashish Shelar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Ashish Shelar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीवर राज्याचे माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार (Minister Ashish Shelar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भुजबळांनी फडणविसांना भेटणं हे प्रासंगिक आहे. भुजबळ ओबीसींचा मोठा चेहरा आहेत. फडणवीस आणि भुजबळ दोघेही योग्य भूमीका स्पष्ट करतील असेही शेलार म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रीमंडळात संधी न दिल्यामुळं ते नाराज आहेत. मंत्रीमंडळाचा विस्तार झाल्यावर भुजबळांनी हिवाळी अधिवेशन सोडून थेट नाशिक गाठलं होतं. दोन दिवसा त्यांनी पदाधिकाऱ्यांशी कार्यकर्त्यांशी चर्चा बैठका घेतल्या होत्या. तसेच नाशिकमध्ये ओबीसींचा मेळावा देखील घेतला होता. त्यानंतर भुजबळ मुंबईत आले आहेत. अशातच आज छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुंबईतील सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळांमध्ये चर्चा झाली. महत्त्वाचं म्हणजे अजित पवारांना भेटण्याआधी भुजबळांनी फडणवीसांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. यावर शेलार यांनी प्रतिक्रिया देताना सावध पवित्रा घेतला आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस आणि भुजबळ दोघेही योग्य भूमीका स्पष्ट करतील असे शेलार म्हणाले.
चक्रीय पद्धतीनं चित्ररथांसाठी राज्यांना संधी मिळेल
26 जानेवारी 2025 रोजी राजपथ म्हणजेच कर्तव्यपथावरील प्रतिष्ठेच्या संचलनासाठी यंदा 15 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे चित्ररथ निवडण्यात आले. मात्र या यादीत महाराष्ट्राला तूर्तास स्थान मिळालेले नाही.याबाबत देखील शलार यांनी प्रतिक्रिया दिली. मी खात्याचा चार्ज घेतलेला नाही, मात्र मी माहिती घेतली आहे. 5 वेळा महाराष्ट्राला संधी मिळाली आहे. इथुन पुढेही मिळेल. चक्रीय पद्धतीनं चित्ररथांसाठी राज्यांना संधी मिळेल असे शेलार म्हणाले. प्रस्ताव पाठवायचा राहुन गेला का? याबाबतची मी चौकशी करेन. पण, प्रस्ताव वगैरे राहुन गेला असं काही नाही. महाराष्ट्राचा योग्य सन्मान केला जाईल असे शेलार म्हणाले.
राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांवरचे आरोप बिनबुडाचे
राहुल गांधी लोकशाही पद्धतीनं मत मांडू शकतात. मात्र, सर्वंकश माहितीच्या अनुशंगानं मत मांडणं गरजेचं आहे. सरकारनं कायदा-सुव्यवस्थेची योग्य काळजी घेतली आहे. राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांवरचे आरोप बिनबुडाचे आहेत. त्यांनी माहिती घ्यावी. सरकारच्या वतीनं उचित उत्तर दिले जाईल असेही शेलार म्हणाले.
मुंबईच्या पालकमंत्रीपदाबाबत काय म्हणाले शेलार?
मुंबईच्या पालकमंत्रीपदाबाबत देखील शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील. महायुतीचाच पालकमंत्री होईल. महापालिका निवडणुकांना महायुती म्हणून सामोरे जाणार आहे. त्यामुळं पालकमंत्री महायुतीचाच असेल तो कुणीही असो असेही शेलार म्हणाले.