कधी लागणार सत्तासंघर्षाचा निकाल? आता तर वसंत ऋुतूही संपला...कोण कोकीळ, कोण कावळा कधी कळणार?
Maharashtra Political Crisis: सध्या महाराष्ट्रात ज्या राजकीय घडामोडी घडतायत त्या सगळ्याच्या केंद्रस्थानी सुप्रीम कोर्टाचा संभाव्य निकाल आहे. कारण काय होऊ शकतं याच आधारावर हे सगळे डावपेच रचले जात आहेत.
मुंबई: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल नेमका लागणार तरी कधी? सध्या जिकडेतिकडे याच गोष्टीची चर्चा सुरु आहे. या प्रकरणाच्या ऐतिहासिक सुनावणीत तर ठाकरे गटाच्या वकीलांनी वसंत ऋुतुचं आगमन झालं की कोकीळ कोण आणि कावळा कोण हे कळेल असं म्हणत शेवट केला होता. आज त्या वसंत ऋुतुचीही सांगता होतेय. त्यामुळे निकाल नेमका कधी लागणार, कर्नाटकची रणधुमाळी सुरु असताना लागणार का याची चर्चा सुरु आहे.
सत्तासंघर्षाचा निकाल नेमका लागणार तरी कधी या एकाच प्रश्नाची उत्सुकता सध्या तमाम महाराष्ट्राला आहे. अगदी ज्या संस्कृत सुभाषितानं या ऐतिहासिक सुनावणीचा शेवट झाला, त्यातल्या वसंत ऋुतुचीही आता सांगता होतेय. ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत म्हणत होते कोण कावळा, कोण कोकीळ याचा फैसला वसंत ऋतुत होईलच. पण आता वसंत संपून उद्यापासून ग्रीष्म ऋतु सुरु होतोय, निकाल मात्र अजून नाहीय.
महाराष्ट्राच्या ऐतिहासिक सत्तासंघर्षाच्या सुनावणीचा शेवट या संस्कृत सुभाषितानं झाला होता. कधीकधी कावळाही कोकिळ असल्याचं नाटक करतो. पण वसंत ऋतूचं आगमन झालं की पितळ उघडं पडतं. कारण कोकिळ गाते आणि कावळा कावकाव करतो. वसंत ऋतुत निकाल आला की कुठली शिवसेना खरी याचा फैसला होईलच असं त्यांनी युक्तिवादाच्या शेवटी म्हटलं होतं.
सध्या महाराष्ट्रात ज्या राजकीय घडामोडी घडतायत त्या सगळ्याच्या केंद्रस्थानी सुप्रीम कोर्टाचा हा संभाव्य निकाल आहे. कारण काय होऊ शकतं याच आधारावर हे सगळे डावपेच रचले जातायत. त्यात जर निकाल विरोधात असेल तर सध्या कर्नाटकच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्या दरम्यान तो येणार का याचीही उत्सुकता आहे.
एकतर नक्की आहे की महाराष्ट्राच्या केसचा निकाल 15 मे च्या आधी लागणार. कारण ज्या घटनापीठासमोर ही सुनावणी झाली, त्यातले एक न्यायमूर्ती एम आर शाह हे 15 मे रोजी निवृत्त होत आहेत. निकाल काय असणार कुणालाच माहिती नाही, पण सध्या कर्नाटकची रणधुमाळी सुरु आहे. 10 मे रोजी मतदान होणार आहे, त्या आधीच निकाल आला तर त्याचाही राजकीय परिणाम दिसू शकत. प्रश्न 16 आमदारांच्या अपात्रतेचा आहे, ज्यातले एक महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही आहेत. त्यामुळे काय नेमकं होणार महाराष्ट्राच्या स्थिरता-अस्थिरतेची दिशा अवलंबून आहे
सुप्रीम कोर्टात एखाद्या प्रकरणाचा निकाल कधी येणार हे आदल्या दिवशीच कळतं. कोर्टाच्या कामकाजात एक दिवस आधी निकालाची ही तारीख येते. त्यामुळे महाराष्ट्राच्या केसचा निकाल जेव्हा असेल त्याच्या एक दिवस आधी ही तारीख कळेल. सोमवारी असेल तर फक्त एक दिवस जास्त म्हणजे शनिवारी कळू शकेल. ही तारीख नेमकी काय असणार याची उत्सुकता आहे.
जून 2022 ला महाराष्ट्रात जे सत्तांतराचं नाट्य घडलं, तेव्हापासून हे सगळं प्रकरण सुप्रीम कोर्टात सुरु आहे. आधी व्हेकेशन बेंच, नंतर त्रिसदस्यीय पीठ आणि नंतर पाच न्यायमूर्तींचं घटनापीठ अशा तीन वेगवेगळ्या बेंचसमोर ही सुनावणी झाली. 14 फेब्रुवारीपासून सलग कामकाजाला सुरुवात झाली आणि 16 मार्च रोजी ही सुनावणी पूर्ण होऊन निकाल राखीव ठेवला गेला. या एका निकालावर महाराष्ट्राच्या राजकारणची सगळी दिशा ठरणार आहे. त्यामुळे तो काय असणार, कधी लागणार याची उत्सुकता आहे.