Devendra Fadanvis : मैं समंदर हूँ, लौटकर वापस आऊंगा; जिद्द, संयम, डावपेच... देवेंद्र फडणवीस पुन्हा कसे आले? Inside Story
Maharashtra Political Crisis : 'अकेला देवेंद्र क्या करेगा' असा प्रश्न विचारला जायचा. या एकट्या देवेंद्रने आता तीन पक्षांचं सरकार पाडलं आणि पुन्हा सत्तेच्या मार्गावर येण्याची किमया केलीय.
मुंबई: मी पुन्हा येईन... मी पुन्हा येईन असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, पण शरद पवारांनी महाविकास आघाडीचा प्रयोग केला आणि देवेंद्र फडणवीसांचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपद मिळवण्याचं स्वप्न धुळीला मिळालं. या अडीच वर्षाच्या काळात सरकार पडेल असं वाटत असताना ते तरलं. पण अंतर्गत बंडाळीने घात केला आणि जे व्हायचं ते झालं, उद्धव ठाकरे सरकार पडलं. 'अकेला देवेंद्र क्या करेगा' असा प्रश्न विचारला जायचा. या एकट्या देवेंद्रने आता तीन पक्षांचं सरकार पाडलं आणि पुन्हा सत्तेच्या मार्गावर येण्याची किमया केलीय. आता देवेंद्र फडणवीस पुन्हा येतायत.
अडीच वर्षात काय केलं देवेनभाऊंनी?
या अडीच वर्षांच्या काळात भाजप नेते चंद्रकात पाटील आणि नारायण राणे, तसेच अनेक भाजप नेत्यानी हे सरकार आता पडेल, मग पडेल, चार दिवसात पडेल, येत्या पंधरा दिवसात पडेल असा अंदाज सातत्याने व्यक्त केला. पण सरकार काही पडलं नाही. याच काळात देवेंद्र फडणवीस यांनी मात्र एकदाही तसं म्हटलं नाही. हे सरकार अंतर्गत बंडाळीमुळे पडेल असंच ते म्हणत राहिले. काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना या वेगवेगळ्या विचारधारेच्या पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेलं सरकार हे जास्त दिवस टिकणार नाही असं ते सातत्याने म्हणत राहिले.
मी पुन्हा येईन असं म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी मात्र हे सरकार पाडण्याचा काही जास्त प्रयत्न केला नाही. अजित पवार यांच्यासोबत पहाटेच्या शपथविधीचा फज्जा उडाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे अधिक सजग झाले आणि त्यांनी ताकही फुंकून प्यायला सुरुवात केली. त्यांनी या काळात सरकार पाडण्यासाठी त्यांनी कधीच सक्रिय भूमिका घेतली नाही.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर दुर्दैवाने राज्यावर कोरोनाचे संकट आले. या काळात उद्धव ठाकरे यांनी राज्याचे प्रमुख म्हणून चांगलं काम केल्याचं दिसतंय. पण याच काळात दुसऱ्या बाजूने देवेंद्र फडणवीस यांनी अनेक दौरे केले, जनतेमध्ये थेट जायला प्राधान्य दिलं. याची चर्चा जरी जास्त झाली नसली तरी देवेंद्र फडणवीसांनी आपलं काम सोडलं नाही.
अंतर्गत बंडाळीमुळे हे सरकार पडेल
राज्यातील सरकार भाजप पाडणार नाही, हे सरकार अंतर्गत बंडाळीमुळे पडेल असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं होतं. तशीच संधी ते शोधत होते आणि ती संधी मिळाली ती राज्यसभेच्या आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीमुळे. या दोन्ही निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी आपले अतिरिक्त उमेदवार सहज निवडून आणले तेही महाविकास आघाडीच्या आमदारांना फोडून.
विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडी सरकार कोसळणार हे त्यांना चांगलंच माहिती होतं. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी त्याचा फायदा घेतला आणि महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम केला. शिवसेनेला तर त्यांच्या गोटातील नेते फोडून जबरदस्त उत्तर दिलं.
देवेंद्र फडणवीसांनी अनेकांना आपलंसं केलं, शरद पवार यांचं वक्तव्य
राज्यसभेच्या निवडणुकीनंतर शरद पवार प्रतिक्रिया देताना म्हणाले होते की, देवेंद्र फडणवीसांनी अनेकांना आपलंसं केलं, अनेक लोकांशी जोडून घेतलं. शरद पवारांनी कौतुक केल्यानंतर काय मेसेज जायचा तो गेला. पण खरंच, गेल्या अडीच वर्षामध्ये देवेंद्र फडणवीसांनी विरोधी पक्षनेते म्हणून जे काम केलं त्याला तोड नाही. कुणाच्या स्वप्नातही आलं नाही असं तीन पक्षांचं सरकार अडीच वर्षे चाललं, हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी एक प्रकारचा बोनसच होता. पण या काळात कधीही हताश न होता देवेंद्र फडणवीसांनी आपलं काम सुरूच ठेवलं. इतर भाजप नेत्यांप्रमाणे उतावीळपणा न दाखवता त्यांनी संयमाने काम केलं.
आता ते पुन्हा येतायत... देवेनभाऊंना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची संधी मिळणार हे नक्की... त्यांचं एकहाती नेतृत्व पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार हे नक्की.