सहा खासदार सोबत असल्याचा ठाकरे गटाचा दावा, शपथपत्र मात्र चारच; मग 'ते' 2 खासदार कोण?
Maharashtra Political Crisis : ठाकरे गटाचा निवडणूक आयोगाकडे 6 खासदार बाजूने असल्याचा दावा. मात्र प्रत्यक्षात 4 खासदारांचीच शपथपत्र निवडणूक आयोगाकडे सादर. त्यामुळे शपथपत्र न देणारे ते दोन खासदार कोण? असा प्रश्न सध्या विचारला जातोय.
Maharashtra Political Crisis : ठाकरे गटाकडून (Uddhav Thackeray Group) केंद्रीय निवडणूक आयोगाकडे (Central Election Commission) आपल्या बाजूने 6 खासदार असल्याचा दावा केला जात आहे. मात्र प्रत्यक्षात 4 खासदारांचीच शपथपत्र निवडणूक आयोगाकडे सादर झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे शपथपत्र न देणारे ते दोन खासदार कोण? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. राज्यसभेतल्या (Rajya Sabha) तीनही खासदारांनी शपथपत्र दिलं असेल तर मग शपथपत्र (Affidavit) न देणारे दोन खासदार लोकसभेतीलच (Lok Sabha) होते का? असे तर्कवितर्क सध्या लढवले जात आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगाने ज्या आकडेवारीच्या आधारे धनुष्यबाणासंदर्भात निर्णय सुनावला, त्या आकडेवारीत असं नमूद करण्यात आलं आहे की, लोकसभेतील एकूण 19 खासदारांपैकी 13 खासदार शिंदे गटाच्या बाजूने होते. त्यांची शपथपत्र शिंदे गटाकडून (Shinde Group) निवडणूक आयोगात सादर करण्यात आली आहेत. तर ठाकरे गटाच्या (Uddhav Thackeray) बाजूने लोकसभेचे सहा खासदार असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र लोकसभेतील केवळ चारच खासदारांची शपथपत्र निवडणूक आयोगासमोर सादर झाली आहेत. राज्यसभेत शिवसेनेचे तीन खासदार असून त्या तीनही खासदारांची शपथपत्र ठाकरे गटाकडून सादर करण्यात आली आहेत.
राज्यसभा आणि लोकसभा मिळून सात खासदारांचीच प्रतिज्ञापत्रे निवडणूक आयोगासमोर सादर
राज्यसभा आणि लोकसभा मिळून एकूण नऊ खासदार आपल्या बाजूने असल्याचा दावा ठाकरे गटाने केलेला असला तरी प्रत्यक्षात मात्र ठाकरे गटाकडून केवळ सातच शपथपत्र निवडणूक आयोगासमोर सादर करण्यात आल्याचं निवडणूक आयोगाचा निकाल सांगतो. त्यामुळे ठाकरे गटाकडून कोणत्या दोन लोकसभा खासदारांची शपथपत्र सादर झालेली नाहीत? याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोरदार सुरु आहे.
पाहा व्हिडीओ : Maharashtra Politics : शपथपत्र न देणारे ठाकरे गटाचे 2 खासदार कोण? आयोगाकडे 4 खासदारांचीच शपथपत्र
ठाकरेंच्या अडचणी वाढणार? मशाल चिन्हावरही समता पार्टीचा दावा
शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदेंकडे गेलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. अशातच आता निवडणूक चिन्हासंदर्भात आता ठाकरे गटाच्या अडचणी आणखी वाढणार की, काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. उद्धव ठाकरेंकडून मशाल चिन्ह काढून घेण्याची मागणी सातत्याने समता पार्टीकडून केली जात आहे. यासंदर्भात समता पार्टी केंद्रीय निवडणूक आयोगातही जाणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच, मशाल चिन्ह समता पार्टीचं असल्याचा दावा पार्टीच्या कार्यकारणीकडून सातत्याने केला जात आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :