Maharashtra Political Crisis : संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीस यांना सल्ला, म्हणाले...
Maharashtra Political Crisis : राज्यात सध्या तयार झालेल्या डबक्यात देवेंद्र फडवणवीस यांनी उतरू नये असा सल्ला शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे.
Maharashtra Political Crisis : राज्यात सध्या राजकारणात एक डबके तयार झाले आहे. या डबक्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उतरू नये. अन्यथा त्यांची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अप्रतिष्ठा होईल असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले. शिवसेनेच्या बंडखोरीनंतर राज्यात भाजपकडून सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना हा सल्ला दिला आहे.
संजय राऊत यांनी मुंबईत आज माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी म्हटले की, सुप्रीम कोर्टाने सोमवारच्या सुनावणीत दिलेले निर्देश महत्त्वाचे आहेत. बंडखोरांना 11 जुलैपर्यंत आराम करू द्या असा टोलाही राऊतांनी लगावला. एकनाथ शिंदे आज मुंबईत येणार असल्याची चर्चा आहे. त्याबाबत राऊत यांना विचारले असता, त्यांनी सांगितले. एकनाथ शिंदे हे आमचे सहकारी आहेत. ते आताही मुंबईत येऊ शकतात. शिवसेनेच्या कार्यकारणीवर शिंदे अजूनही आहेत, असेही त्यांनी म्हटले.
आम्ही त्यांना बंडखोर मानत नाही
शिवसेना बंडखोर आमदारांबाबत संजय राऊत यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. गुवाहाटीमध्ये असलेल्या सगळ्याच आमदारांना आम्ही बंडखोर मानायला तयार नसल्याचे त्यांनी सांगितले. गुवाहाटीमधील काही आमदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या संपर्कात आहेत. काही आमदारांचे कुटुंबीय संपर्कात आहेत. यातील बऱ्याच आमदारांना फसवून नेले असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईत हे बंडखोर आमदार आल्यास त्यातील निम्मे आमदार पुन्हा आमच्याकडे येतील असेही राऊत यांनी सांगितले.
ईडीच्या चौकशीचे काय?
ईडी चौकशीबाबत राऊत यांनी म्हटले की, याआधीपासून पक्षाचे काही कार्यक्रम ठरवण्यात आले आहेत. पक्षाच्या या बैठका, कार्यक्रमानंतर ईडी चौकशीसाठी जाणापर असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. मी कायद्याला मानणारा माणूस आहे. ईडीला वाटत असेल त्यांनी अटकही करावी. मला अटक केली तरी त्याची चिंता नसल्याचेही त्यांनी म्हटले. देशात स्वातंत्र्याचा दुसरा लढा सुरू असल्याचे राऊत यांनी सांगितले.