Eknath Shinde : राज्यात शिवसैनिक आक्रमक, एकनाथ शिंदेंच्या फोटोला फासले काळे
शिवेसेनचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळं राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. त्यामुळं राज्यातील शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहे. काही ठिकाणी आंदोलने, मोर्चे निघत असल्याचं चित्र दिसत आहे

मुंबई : कल्याण, पुणे, पालघर, रायगड फक्त चार शहरं नाही तर राज्यात आज अनेक ठिकाणी शिवसैनिकांनी गुवाहाटीत गेलेल्या आमदारांच्या कार्यलयाची तोडफोड केली आहे. एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयावर दगडफेक केली आहे. शिवसेना कार्यकर्त्यांनी कार्यालयासमोर घोषणाबाजी आणि दगडफेक केली.
पुण्यात दोन-तीन ठिकाणी शिवसैनिकांनी तोडफोड केली. सदाशिव पेठेत शिंदे समर्थकांचं पोस्टर्सला काळं फासलं. तर कात्रजमध्ये तोडफोड करण्यात आली. आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यायलाच्या काचा फोडल्या तर त्यांच्या मतदारसंघातही कार्यलयाची तोडफोड केली.
नवी मुंबई
नवी मुंबईतही शिवसैनिकांनी आक्रमक आंदोलन केलं. एकनाथ शिंदेंचा पुतळा जाळला. तर शिवसेना कार्यालयावरील फलकावर असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या फोटोला काळे फासले. शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आंदोलन, घोषणाबाजी करण्यात आली.
अहमदनगर
अहमदनगरमध्येही शिवसैनिकांनी जोरदार निदर्शनं केली. एकनाथ शिंदेंविरोधात घोषणाबाजी करत आहे . शिवसैनिकांनी मुख्यमंत्र्यांना आपलं समर्थन दिलं..
परभणी
परभणीतही बंडखोर आमदारांविरोधात शिवसेनिकांनी घोषणाबाजी केली. तिथं एकनाथ शिंदे अन गुलाबराव पाटलांच्या प्रतिमेची गाढवावरून धिंड काढली.
पालघर
बोईसरमध्ये आधी एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ बॅनर्स लागले. पण, आज त्या बॅनर्सला काळ फासलंय.
नागपूर
नागपुरात युवासेनेनं विरोध प्रदर्शन केलं. सीए रोडवर एकनाथ शिंदेंचे बॅनर्स फाडण्यात आले.
भुमरेंच्या फोटोला काळे फासले
एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारत 35 पेक्षा अधिक शिवसेना आमदारांना सोबत नेले आहे. ज्यात काही मंत्र्यांचा सुद्धा समावेश असून, पैठण तालुक्याचे आमदार तथा रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र भुमरे यांच्या याच बंडामुळे आता शिवसैनिक आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. भुमरे यांच्या गारखेडा परिसरात असलेल्या कार्यालयाच्या परिसरात लावण्यात आलेल्या होर्डींगला संतप्त तरुणांनी काळे फासले आहे.
पोलीस बंदोबस्त वाढवला...
अनेक शिवसेनेच्या आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात शामिल होऊन बंड केले आहे. त्यांच्या याच बंडामुळे शिवसैनिक आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे पोलिसांनी बंड करणाऱ्या आमदारांच्या घरावर आणि कार्यालयावर पोलीस बंदोबस्त लावला आहे. तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नयेत म्हणून सर्वच पोलीस ठाण्यांना लक्ष ठेवण्याचे आदेश सुद्धा वरिष्ठांकडून देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राज्यात हे आंदोलनं, विरोध प्रदर्शनं म्हणजे फक्त सुरुवात आहे, असं म्हणत संजय राऊतांनी मोठ्या विरोध प्रदर्शनाचा इशारा दिला.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
