राज्यात पूर्ण क्षमतेने 11,443 पदांची भरती होणार, कोरोना काळातील 50 टक्के भरतीची मर्यादा शिथिल
Maharashtra Police Recruitment : पोलिस शिपाई संवर्गातील पोलिस शिपाई, पोलिस शिपाई चालक आणि सशस्त्र पोलिस शिपाई संवर्गात सुमारे 11,443 इतकी पदे भितीसाठी उपलब्ध होणार आहेत.
मुबई: पोलीस भरतीसाठी कोविड काळातील 50 टक्केची अट शिथिल केल्याचा शासन निर्णय जारी केलेला आहे. त्यामुळे राज्यात आता पूर्ण क्षमतेने 11,443 पोलिस भरती होणार आहे. कोरोना काळात ही 50 टक्के मर्यादेची अट घालण्यात आली होती.
कोरोना काळात राज्याची आर्थिक परिस्थिती डबघाईला आली होती. त्यामुळे त्या काळात कोणतीही शासन भरती करु नये असा आदेश काढण्यात आला होता. तोच निर्णय आतापर्यंत लागू होता. राज्य सरकारच्या गेल्या आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात 11 हजार 443 पोलिस पदांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासंबंधी आज 50 टक्क्यांची अट शिथिल झाल्याचं जारी करण्यात आलं आहे.
राज्याच्या पोलिस दलातील पोलिस शिपाई संवर्गातील सन 2021 मध्ये पोलिस शिपाई, पोलिस शिपाई चालक आणि सशस्त्र पोलिस शिपाई संवर्गात सुमारे 11,443 इतकी पदे भितीसाठी उपलब्ध होणार आहेत.
महिनाभरापूर्वी मुख्यमंत्र्यांकडून पोलिस भरतीची घोषणा
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिनाभरापूर्वी पोलिस भरतीची घोषणा केली होती. राज्यात साडेसात हजार पदांसाठी लवकरच पोलिस भरती प्रक्रिया राबवणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं. तसंच गृह विभागाचे सचिव आणि इतर अधिकाऱ्यांना तातडीने भरती प्रक्रिया राबवण्यासाठी सूचना दिल्याचंही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं होतं.
पहिल्यांदाच होणार शारीरिक चाचणी
शासनाने महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवाप्रवेश नियमामध्ये सुधारणा केली असून पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा शारीरिक चाचणी होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक चाचणी एकूण 50 गुणांची होणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी 1600 मीटर धावणे (20 गुण), 100 मीटर धावणे (15 गुण), गोळाफेक (15 गुण) असे एकूण 50 गुण तर महिला उमेदवार 800 मीटर धावणे (20 गुण). 100 मीटर धावणे (15 गुण), गोळाफेक (15 गुण) असे एकूण 50 गुण असणार आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई (पुरूष) पदासाठीशारीरिक चाचणी एकूण 100 गुणांची होणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी 5 कि.मी. धावणे (50 गुण), 100 मीटर धावणे (25गुण), गोळाफेक (25 गुण) असे एकूण 100 गुण असणार आहेत.
शारीरिक चाचणीमध्ये किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1:10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी पात्र असतील, लेखी चाचणीमध्ये अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुध्दीमत्ता चाचणी मराठी व्याकरण या विषयावर आधारीत प्रश्न असतील. लेखी चाचणी मध्ये विचारण्यात येणारे प्रश्न बहुपर्यायी प्रकारचे असतील. परीक्षामराठी भाषेत घेण्यात येईल. तसेच या लेखी चाचणीचा कालावधी 90 मिनिटे असेल. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40 टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये 40 टक्के पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील. सदरहू पोलीस भरतीमधील लेखी परिक्षा विशेष बाब म्हणून OMR (Optical Mark Recognition) पध्दतीने घेण्याबाबत शासनाने मान्यता दिलो आहे.