Pink Jacket Politics : निकालापर्यंत अजितदादांच्या, तर निकालानंतर फडणवीसांच्या अंगावर गुलाबी रंगाचा मुक्काम; महायुतीतली गोडी'गुलाबी' कायम राहणार?
Pink Jacket Politics Maharashtra : निकालापूर्वी अजितदादांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या नसानसात गुलाबी रंग मुरल्याचं दिसत होतं. आता त्याच गुलाबी रंगाने देवेंद्र फडणवीसांच्या अंगावर झेप घेतल्याचं दिसतंय.
मुंबई : महिना डिसेंबरचा आहे आणि वादळामुळं दूर पळालेली थंडीही राज्यात परतलीय. आता थंडी म्हटलं की एकच रंग आठवतो तो म्हणजे गुलाबी. पण आता हा रंग महाराष्ट्राच्या गरम राजकारणातही लक्ष वेधून घेतोय. विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवारांशी जोडला गेलेला हा गुलाबी रंग आता हळूहळू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या जॅकेटवर स्थिरावू लागल्याचं दिसतंय. निकालानंतरच्या पहिल्या पत्रकार परिषदेपासून ते शपथविधीपर्यंत आणि त्यानंतरही या गुलाबी रंगानं फडणवीसांच्या जॅकेटवरचा मुक्काम हलवलेला नाही. याच गुलाबी रंगाच्या राजकीय प्रवासाचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट.
महाराष्ट्राच्या राजकारणात गुलाबी रंगाची एवढी चर्चा कधीच नव्हती. गेली अनेक दशकं लाल, हिरवा, भगवा आणि निळा याच रंगांची राजकारणात मोनोपॉली होती. पण महाराष्ट्रातलं युती-आघाड्यांचं गणित जसं बदललं तसंच रंगांचंही गणित आता बदललंय.
दादांसोबत आता फडणवीसही गुलाबी
गुलाबी रंग महाराष्ट्रात आला तो अजितदादांच्या जॅकेटवर स्वार होऊन. रोखठोक स्वभावासाठी ओळखले जाणारे अजितदादा विधानसभा निवडणुकीपूर्वी असे गुलाबी झाले. केवळ दादांच्या जॅकेटवरच नाही, तर राष्ट्रवादीच्या नसानसात गुलाबी रंग मुरल्याचं चित्र होतं. पण विधानसभा निवडणुकीचे निकाल आले आणि या गुलाबी रंगानं अजितदादांच्या अंगाखांद्यावरून थेट फडणवीसांकडे झेप घेतली.
मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न जेव्हा पडतं, तेव्हा ते 'गुलाबी' असतं की नाही, हे पाहणाऱ्यांनाच माहीत. पण निकालापर्यंत अजित पवारांसोबत दिसणारा गुलाबी रंग निकालानंतर मात्र देवेंद्र फडणवीसांच्या जॅकेटवर दिसू लागला हे मात्र खरं.
सन 2019 मध्ये विधिमंडळातील शेवटच्या भाषणात देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेली 'मी पुन्हा येईन' ही कविता चांगलीच गाजली होती. त्यावेळी निळ्या जॅकेटमध्ये दिसलेले फडणवीस यंदाच्या शपथविधीला मात्र गुलाबी जॅकेटमध्येच दिसले.
निवडणुकीनंतर अजितदादांनी गुलाबी रंग असा काही 'सोडला' की आणखी काही दिवसांनी तो दादांचा 'एक्स कलर' म्हणूनही ओळखला जाईल. मात्र आपल्या या 'एक्स'ला कुणी काही बोललं, तर दादांना अजिबात सहन होत नाही, हेही तितकंच खरं.
फडणवीसांच्या गुलाबी जॅकेटवरून विरोधकांनी अजितदादांना चिमटा काढल्यानंतर दादांनी त्यांना रोखठोक सुनावलं. गुलाबी जॅकेट आज मुख्यमंत्र्यांना दिलंय. काय अडचण आहे? आता तुम्हाला कलरही कळत नाही. कलरही विसरायला लागले. काय करायचं काय? आम्ही कुठली जॅकेटं घालायची हे आम्ही ठरवू. तुम्हाला कुठली घालायची ते तुम्ही ठरवा असं अजितदादा म्हणाले.
गुलाबी हा रोमँटिक रंग म्हणून ओळखला जातो. जॅकेट घालणारे नेते रोमँटिक असोत किंवा नसोत, मात्र महाराष्ट्रातला तीन पक्षांचा सत्तेचा रोमान्स पुढची पाच वर्षं असाच गुलाबी राहतो की नवे रंग धारण करतो, याचीच काय ती उत्सुकता.
ही बातमी वाचा: