Maharashtra Rains : राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाचा कहर, पिकांचं नुकसान, शेतकरी हवालदिल
Maharashtra Rains : राज्यात आता अवकाळी पावसाचं संकट समोर उभं राहिलं आहे. मराठवाड्यातील काही भागात अवकाळी पावसानं विजांच्या कटकडाटासह हजेरी लावली. यामुळं पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
Maharashtra Rains : राज्यात एकीकडे कोरोनाचं संकट वाढत चाललं असताना दुसरीकडे अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे. काल विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यासह राज्यातील अन्य काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे या भागातील पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. यामुळं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. पिकांचं नुकसान झाल्यानं बळीराजा हवालदिल झाला आहे. आज देखील राज्यातील विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही भागात आणखी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत अजून भर पडली आहे.
अमरावती जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतीचं नुकसान
अमरावती जिल्ह्यातील अनेक तालुक्यात काल सलग चौथ्या दिवशीही अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतीचं खूप नुकसान झालं आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यासह अमरावती शहरात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. काल दुपारी विदर्भाचं नंदनवन असलेल्या चिखलदरा येथे गारपीटीसह मुसळधार पाऊस झाला.
मावळ तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी
पुण्याच्या मावळ तालुक्यात ही अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी गारपीटही झाली. मावळ तालुका हा पर्यटनासाठी ओळखला जातो. त्यात काल सुट्टीचा दिवस असल्याने या गारपिटीचा पर्यटकांनी आनंद घेतला. गेली अनेक दिवस नागरिक उकाड्याने त्रस्त आहेत, या गारपिटीने मात्र ते सुखावले आहेत. यामुळं शेतकऱ्यांचं मात्र नुकसान होण्याची शक्यता आहे.
बुलडाणा जिल्ह्यामध्ये काल रात्री पुन्हा प्रचंड गारपिटीचा पाऊस कोसळला. यामध्ये जिल्ह्यातील संग्रामपूर तसेच खामगाव अनेक ठिकाणी फळबागासह गहू, हरबरा, उन्हाळी भुईमुग, मका,ज्वारी, आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
वाशीम जिल्ह्यात गारपीटीमुळे 4880 हेक्टर पिकाचं नुकसान
वाशीम जिल्ह्यात दोन दिवसांअगोदर झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. त्यात वाशीम तालुक्यात 1693 हेक्टर, रिसोड तालुक्यात 1473, हेक्टर, मालेगाव तालुक्यात 1132, मानोरा तालुक्यात 531 हेक्टर तर मंगरूळपीर तालुक्यात 50 हेक्टरवर कांदा, भाजीपाला, कडधान्य, फळ बाग, गहू, हरभरा या पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. नुकसानीचे पंचनामे केल्यानंतर आकडा समोर येणार असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी होतं आहे.
धुळ्यात शेतकऱ्यांचा हाता तोंडाशी आलेला घास हिरावला
धुळे तालुक्यातील विविध ठिकाणी अचानक काल संध्याकाळी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून यामध्ये शेतकऱ्याच्या कांदा,शेवगा, हरभरे, गहू, बाजरी, तसेच टोमॅटो या काढणीला आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तालुक्यातील आर्णी शिवारात अवकाळी पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी पुन्हा हवालदिल झाला असून कृषी विभागाने लवकरात लवकर नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून केली जात आहे. तर दुसरीकडे धुळे तालुक्यातील उडाणे गोताने चौगाव या परिसरात गारपीट झाल्याने कांद्याच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, धुळे तालुक्यात शंभर हेक्टर हून अधिक परिसरात पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
गारपिटीमुळे शेकडो निष्पाप पोपटांचा झाला मृत्यू
अचानक झालेल्या अवकाळी गारपिटीमुळे डोणगाव परिसरामध्ये मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपिटीमुळे परिसरातील शेकडो पोपटांचा मृत्यू झाला आहे. या गारपीटीचा फटका या पोपटांना बसला असल्याचे दिसून आले आहे. यात असंख्य पक्षी मृत्युमुखी पडले आहे. डोणगाव बस स्टँडच्या बाजूला पिंपळाचे मोठे झाड असून त्यावर दररोज हजारोंच्या संख्येने पोपट बसतात मात्र रात्री झालेल्या गारपीटीमध्ये कित्येक पोपटांना गारीचा मार लागून मृत्यू पावले.
कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात मुसळधार पाऊस
कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात मुसळधार पाऊस झाला. गडहिंग्लज, नेसरी भागात मुसळधार पाऊस झाला आहे तर जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यांमध्ये ढगाळ वातावरण आहे. मुसळधार पावसाने नागरिकांची दाणादाण उडाली तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. शेतात असलेल्या रब्बी पिकांना पावसाचा मोठा फटका बसणार आहे. तसेच या पावसामुळं अनेक गावातल्या आठवडी बाजारांवर परिणाम झाला आहे.
सध्या राज्यातील विविध भागात शेतात ज्वारी, गहू , हरभरा, संत्रा, फळभाज्या अशी पीक आहेत. ज्वारी, गहू, हरभरा काढणीला आले आहेत. वादळ, पावसामुळं या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात काही जिल्ह्यात सध्या ढगाळ वातावरण असून शेतकऱ्यांमध्ये या वातावरणामुळे काळजी निर्माण झाली आहे. अनेक भागांमध्ये मागील दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. शेतकऱ्यांनी गहू, हरभरासह इतर पिकांची कापणी करून घेण्याचे कृषी विभागाने आवाहन केलं आहे.