Sangli Crime : दोन खून आणि एका हाफ मर्डरने सांगली हादरली!
दोन खून आणि एका हाफ मर्डरने सांगली जिल्हा हादरला. हाफ मर्डर झालेल्या तरुणाचीही प्रकृती गंभीर आहे.
सांगली : सांगलीत पुन्हा खून, हाणामारीचे प्रकार वाढले आहेत. हरिपूरमधील सुरेश नांद्रेकर या आरटीओ एजंटच्या खुनाची आणि त्याच्या पत्नीला मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच सांगली शहरात सायंकाळी सातच्या सुमारास सिव्हिलकडून स्टॅंडकडे जाणाऱ्या रोडवरच रोहन नाईक या तरुणाची हत्या झाली. दुचाकीवरुन येऊन हल्लेखोरांनी पाठीवर वार करत आणि दगडाने रोहन नाईकचा खून केला. त्यानंतर रात्री नऊच्या सुमारास मिरजमध्ये किरकोळ कारणावरुन झालेल्या वादातून सारंग शिंदे या तरुणावर काही तरुणांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात तरुणाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
हरिपूरमध्ये पती-पत्नीवर हल्ला, पतीचा मृत्यू
सुरेश नांद्रेकर आणि त्यांच्या पत्नी संकष्टी सोडण्यापूर्वी बागेतील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी दुचाकीवरुन गेले होते. दर्शन घेऊन घरी परत येत असताना त्यांच्या घरापासून 50 फूट अंतरावर तीन हल्लेखोर दबा धरुन बसले होते. या तीन हल्लेखोरांनी शॉकप्सरने सुरेश यांच्यावर हल्ला केला. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या पत्नीवरही या हल्लेखोरांनी हल्ला केला. या हल्ल्यानंतर हे तिघे हल्लेखोर पळून गेले. त्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी तात्काळ या जखमी पती-पत्नीला वसंतदादा सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मंगळवारी (22 मार्च) पहाटे सुरेश नांद्रेकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर पत्नीवर उपचार सुरु आहेत. सुरेश नांद्रेकर यांच्या खून प्रकरणी पोलिसांनी तात्काळ चौघांना अटक केली आहे.
गुन्हेगारी क्षेत्राशी संबंधित तरुणाचा खून
सांगली शहरात गुन्हेगारी क्षेत्राशी संबंधित असलेल्या रोहन नाईक या तरुणाचा खून झाला. धारदार हत्याराने आणि दगडाने हल्ला करुन हा निर्घृण खून करण्यात आला. रोहन नाईक याचा दुसऱ्या गुन्हेगारी टोळीतील तरुणांशी झालेल्या वादातून खून झाल्याची प्राथमिक माहिती आहे. रोहन हा आई आणि दोन भावासह राहत होता. तो पेंटिंगचे काम करत होता. मंगळवारी (22 मार्च) संध्याकाळी पाच वाजता बिर्याणीसाठी साहित्य आणतो असं सांगून तो घराबाहेर पडला. त्यावेळी त्याच्या आजीने रंगपंचमी आहे, घराबाहेर जाऊ नको असे सांगितले. तरी तो घराबाहेर पडला. सिव्हिल हॉस्पिटल ते बस स्थानक रस्त्यावर एका हॉटेलमध्ये तो मित्रासह बसला होता. यावेळी त्याच हॉटेलमध्ये संशयित हल्लेखोरही बसले होते. हॉटेलबाहेर त्यांच्यात वाद झाला. हा वाद मिटला. वाद मिटल्याने रोहन हा त्याच्या मित्रासोबत निघाला होता यावेळी हल्लेखोरांनी पाठीमागून येऊन धारदार शस्त्राने हल्ला केला. यात रोहनचा मृत्यू झाला.
मिरजेत नशेखोराकडून तरुणावर हल्ला, प्रकृती गंभीर
मिरज शहरातील ढेरे गल्ली इथे किरकोळ कारणावरुन झालेल्या वादातून सारंग गोपाळ शिंदे या तरुणावर खुनी हल्ला करण्यात आला. तर अन्य दोघांना मारहाण करण्यात आली. तरुणाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर रुग्णाल्यात उपचार करण्यात येत आहेत. जखमींमध्ये वैभव अरुण माने आणि सदानंद अशोक सोंदकर यांचा समावेश आहे. सदानंद सोंदकर हा काल संध्याकाळी रंगपंचमी खेळून दुचाकीवरुन निघाला होता. यावेळी त्याला काही तरुणांनी अडवले. यावेळी संबंधित तरुणांनी आम्हाला ओळख दिला नाहीस, असे म्हणून मारहाण केली. यानंतर सदानंद याने सारंग आणि वैभव या दोघांना घटनास्थळी बोलावून घेतले. यावेळी वादावादी होऊन मारामारीची घटना घडली. यावेळी झालेल्या झटापटीत सारंग शिंदे याच्या पाठीत चाकू मारण्यात आला. यामुळे तो गंभीर जखमी झाला. तर वैभव माने यांच्या डोक्यात फारशीने मारहाण करण्यात आली. सारंग शिंदे हा गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान हल्लेखोर तरुण हे नशेखोर सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत.