(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nilam Gorhe: तुळजाभवानी मंदिरात भाविकांमध्ये दुजाभाव, गाभाऱ्यात मलाही नाकारला होता प्रवेश; नीलम गोऱ्हेंचा गौप्यस्फोट
Maharashtra News: तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेच्या मंदिरात पुजारी कुटुंबातील महिलांना देवीची आराधना करण्याची इच्छा आहे. पण प्रशासनाकडून त्यांना परवानगी दिली जात नाही, असे निलम गोऱ्हे म्हणाल्या.
Ahmednagar News : महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या तुळजाभवानीच्या मंदिरात (Shree Tulja Bhawani Temple) पुजारी भोपे कुटुंबातील महिलांना देवीची आराधना करण्याची परवानगी नाकारण्यात आल्याची बाब समोर आल्यानंतर विधान परिषदेच्या (Vidhan Parishad) उपसभापती नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनीही याप्रकरणी नाराजी व्यक्त केली आहे. सामान्य महिलांना तर नाहीच, परंतु मलाही आई तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारला होता, हा दुजाभाव आहे अशी प्रतिक्रिया नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे. त्या अहमदनगर (Ahmednagar) येथे पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
जिल्हाधिकारी, ठराविक मंत्री गाभाऱ्यात गेले, मात्र महिला आमदार आणि इतर महिलांना प्रवेश नाही
तुळजापूर (Tuljapur) येथील तुळजाभवानी मातेच्या मंदिरात पुजारी कुटुंबातील महिलांना देवीची आराधना करण्याची इच्छा आहे. पण प्रशासनाकडून त्यांना परवानगी दिली जात नाही. नोव्हेंबर महिन्यामध्ये मी ज्यावेळेला तिथे गेले त्यावेळेला कुणालाच गाभाऱ्यात सोडायचं नाही असा नियम आहे, असे मला सांगण्यात आलं आणि तो नियम मी पाळला. मात्र त्याच्यानंतर स्वतः जिल्हाधिकारी गाभाऱ्यात गेले. काही ठराविक मंत्र्यांना प्रवेश दिला गेला. महिला आमदार गेल्या किंवा दुसऱ्या महिलांनी गाभाऱ्यात जाण्याची इच्छा व्यक्त केली तर त्यांना जाऊ देत नाही हा सरळ दुजाभाव असल्याचे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावं असंही त्या म्हणाल्या.
पत्रकारांना संरक्षण देणं गरजेचे
दरम्यान रत्नागिरीतील राजापूर तालुक्यातील महानगरी टाईम्स या वृत्तपत्राचे पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या मृत्युबाबत नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, "शशिकांत वारिसे एक अत्यंत कार्यक्षम पत्रकार होते आणि त्यांचा ज्या प्रकारे मृत्यू झाला तो निश्चितपणे संशयाला वाव देणारा आहे. सरकारने त्यांना 25 लाखाची मदत जाहीर केली आहे. एसआयटी चौकशी देखील सुरु आहे." तसंच "पत्रकारांना संरक्षण देणं, त्यांच्यावर होणाऱ्या हल्ल्यानंतर ताबडतोब त्याची दखल घेऊन त्याच्यावर कार्यवाही करणं गरजेचं असल्याचे नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
नव्या राज्यपालांनी सर्व पक्षांना योग्य संधी द्यावी
राज्यपालांची जी निवड झाली ती त्यावेळी सरकारला योग्य वाटली म्हणून झाली होती. परंतु आता त्यांची मुदत संपण्यापूर्वीच त्यांचा राजीनामा मंजूर झाला आहे. महापुरुषांबद्दल निराधार निंदनीय आणि ज्याप्रकारे त्यांचा अवमान होईल अशी त्यांनी अनेक वक्तव्य केली. नव्या राज्यपालांनी सर्व पक्षांना योग्य संधी आणि न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून भूमिका बजवावी हीच आमची त्यांच्याकडून अपेक्षा राहिल असं नीलम गोऱ्हे नव्या राज्यपालांच्या निवडीवर म्हणाल्या.