Nashik News : उद्योगाचे विमान गुजरातला, बेरोजगारीचे गाजर मराठी तरुणाला, राष्ट्रवादीचे जोरदार आंदोलन
Nashik News : नाशिकमध्ये (Nashik) देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवा कार्यकारणीकडून निषेध आंदोलन करण्यात आले.
Nashik News : वेदांता-फॉक्सकॉनचा (Vedant) प्रकल्प, एअरबस-टाटा (Air Bus tata), सॅफ्रन (Safran) प्रकल्प यासारखे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (NCP) शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या अध्यक्षतेखाली आश्वासनाचे विमान उडवून राज्य सरकारविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी “खोके सरकारचा निषेध असो”, “उद्योगाचे विमान गुजरातला, बेरोजगारीचे गाजर मराठी तरुणाला”, “गुजरात तुपाशी, महाराष्ट्र उपाशी” अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातून अनेक प्रकल्प बाहेर गेल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. विरोधक कडकडून या सर्वांचा निषेध करत आहेत. नाशिकमध्ये (Nashik) देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवा कार्यकारणीकडून निषेध आंदोलन करण्यात आले. नाशिक शहरातील मुंबई नाका परिसरातील राष्ट्रवादी भवन येथे जोरदार घोषणाबाजी करत राष्ट्रवादी युवकच्या कार्यकर्त्यानी जोरदार निदर्शने केली. यावेळी “खोके सरकारचा निषेध असो”, “उद्योगाचे विमान गुजरातला, बेरोजगारीचे गाजर मराठी तरुणाला”, “गुजरात तुपाशी, महाराष्ट्र उपाशी” अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातील अनेक उद्योग, सरकारी कार्यलये आणि प्रस्तावित प्रकल्प आयत्यावेळेला गुजरातला हलवण्यात आल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. गेल्या काही दिवसात सर्वप्रथम वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातला गेला. त्यानंतर एअरबस-टाटा सी-295 लष्करी वाहतूक विमान हा प्रकल्प सुद्धा गुजरातला गेला. यानंतर सॅफ्रन विमान इंजिन दुरुस्ती देखभालीचा प्रकल्प नागपूर येथे येणार होता, तोही हैदराबादला हलविण्यात आला आहे.
राज्य सरकारच्या आडमुठेपणामुळे राज्यातील उद्योग प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जात असल्याने अब्जावधीची गुंतवणुकीवरुन राज्याला पाणी फिरवावे लागले आहे. वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प, एअरबस-टाटा, सॅफ्रन प्रकल्प यासारख्या अब्जावधी रकमेच्या प्रकल्पामुळे महाराष्ट्रात लाखो तरुणांना रोजगारनिर्मिती होणार होती. परंतु तसे न झाल्याने महाराष्ट्राची अधोगती होत आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या आडमुठेपणामुळे अनेक मोठे प्रकल्प राज्याच्या बाहेर गेल्याने महाराष्ट्रातील तरूण बेरोजगारीच्या उंबरठ्यावर उभा आहे. याचा निषेध करत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व उद्योगमंत्री यांच्या प्रतिमेचे कागदी विमान बनवून उडविले.
महाराष्ट्रातील वातावरण व इतर बाबींचा विचार करता उद्योगपती प्रथमतः महाराष्ट्र राज्याला प्राधान्य देतात. परंतु सत्तेच्या हव्यासापोटी खोके सरकारने राज्यातील वातावरण गढूळ केल्याने तसेच महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजरातची चाकरी करत असल्याने महाराष्ट्राचे उद्योगधंदे गुजरातला पळविले जात असल्याचे राष्ट्रवादी युवकाचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी सांगितले. दरम्यान जळगाव शहर, हिंगोली, पिंपरी चिंचवड, पुणे, सांगली, नाशिक येथेही राज्य सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. 'महाराष्ट्राचे उद्योग गुजरातच्या घशात घालणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकारचा जाहीर निषेध', असे फलक हातात घेत कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला.