Shivbhojan Thali : नाशिकमध्ये गाजावाजा झालेली शिवभोजन थाळी झाली बेचव, पालकमंत्री भुसेंनी चाखली चव
Shivbhojan Thali : पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी मुंबई नाका परिसरातील शिवभोजन केंद्राला अचानक भेट दिली.
Shivbhojan Thali : शिवभोजन थाळी (Shivbhojan Thali) केंद्राबद्दल नागरिकांच्या तक्रारी प्राप्त होत असल्याने पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी मुंबई नाका परिसरातील शिवभोजन केंद्राला अचानक भेट दिली. यावेळी लाभार्थ्यांचा तपशील ठेवला जात नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्याचबरोबर जेवणाची चव चाखल्यानंतर अन्नपदार्थांच्या बाबतीत सुधारणा करा अशा सूचना त्यांनी यावेळी शिवभोजन केंद्र चालकाला दिल्या.
पालकमंत्री दादा भुसे यांनी नाशिकमध्ये अचानक शिव भोजन केंद्राला भेट दिली. नाशिकच्या मुंबई नाका (Mumbai Naka) परिसरातील शिवभोजन केंद्रावर दादा भुसे अचानक धडकले. शिव भोजन केंद्राबाबत गेल्या अनेक दिवसांपासून तक्रारी येत होत्या. त्याच पार्श्वभूमीवर दादा भुसे या शिवभूषण केंद्राची पाहणी करण्यासाठी आले होते. तर दादा भुसे यांच्या अचानक भेटीने शिवभोजन चालवणाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. महाविकास आघाडी (MahaVikas Aghadi) सरकारने सुरू केलेल्या महत्त्वकांक्षी योजनांपैकी शिवभोजन थाळी एक योजना आहे. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतरही ही योजना सुरू ठेवण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला. मात्र गोरगरिबांसाठी सुरू करण्यात आलेल्या या योजने संदर्भात अनेक तक्रारी समोर आल्या होत्या. त्यामुळे दादा भुसे यांनी स्वतः शिवभोजन केंद्राची भेट घेत त्या ठिकाणी जेवणाची चव घेतली. त्यासोबतच जेवणाच्या दर्जात सुधारणा करण्याचे आदेश दिले.
दरम्यान पालकमंत्री दादा भुसे हे बैठकांच्या निमित्ताने नाशिक शहरात आले होते. नाशिक महापालिकेच्या पंचक येथील प्राथमिक शाळेत स्मार्ट स्कूल प्रकल्प आढावाची बैठक घेतल्यानंतर भुसे जिल्हा परिषदेत आढाव बैठक घेण्यासाठी येत होते. परंतु मार्गात त्यांनी मुंबई नाका परिसरातील शिव भोजन केंद्राला अचानक भेट देण्याचा निर्णय घेतला. या केंद्रावर जेवण करणाऱ्या नागरिकांची त्यांनी संवाद साधला. स्वतः देखील भाजीची चवघेतली. त्यावेळी भाजी बेचव लागल्याने त्यांनी जेवणाच्या दर्जात सुधारणा करण्याची सूचना संबंधित केंद्र चालकाला दिल्या. केंद्रावर 50 लाभार्थ्यांनी जेवण केल्याची माहिती संबंधित केंद्र चालकाने दिली. परंतु 50 जणांची माहिती अपडेट केली नसल्याचे पाहणीत आढळून आल्याने भुसे यांनी नाराजी व्यक्त केली. केंद्रचालकांनी लाभार्थ्यांचा डेटा अपडेट ठेवायलाच हवा अशा सूचना यावेळी त्यांनी केल्या.
शिवभोजन केंद्राचा दर्जा ढासळला...
गेल्या अडीच वर्षांपासून राज्यातील महत्वाच्या शहरांमध्ये शिवभोजन केंद्रे उभारण्यात आली आहेत. या माध्यमातून गोर गरीब नागरिकांना स्वस्तात जेवण मिळण्यासाठी ही योजना अंमलात आणली आहे. यामध्ये ग्राहकाकडून दहा रुपये आणि सरकारकडून 30 रुपये संबंधित केंद्रचालकाला दिले जातात. तर दुसरीकडे राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ,अन मधल्या काळात कोरोना असल्याने शिवभोजन केंद्राकडे फारसे लक्ष दिले जात नव्हते. त्यामुळे आज अचानक पालकमंत्री दादा भुसे यांनी नाशिकच्या शिवभोजन केंद्राला भेट देत परिस्थिती जाणून घेतली. पाहणीवरून असे लक्षात आले कि, शिवभोजनच्या थाळीत दर्जा ढासळला असून केंद्रात ग्राहकांची माहिती अद्ययावत केली जात नसल्याचे समोर आले आहे. त्यामुले राज्य शासनाने या महत्वाकांक्षी योजनेकडे गांभीर्याने बघणे आवश्यक आहे.