(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Saptshrungi Devi Mandir : उदे गं अंबे उदे.... तब्बल अकराशे किलो शेंदूर काढला, आता अशी दिसतेय सप्तशृंगी देवीची स्वयंभू मूर्ती
Saptshrungi Devi Mandir : सप्तशृंगी देवीची (Saptshrungi Devi) मूर्तीच्या संवर्धन व देखभालीचे काम पूर्ण झाले असून भगवतीच्या मूळ रूपाचे दर्शन होत आहे.
Saptshrungi Devi Mandir : सप्तशृंगी देवीची (Saptshrungi Devi) मूर्ती संवर्धन व देखभाल कामकाजामुळे दीड महिना मंदिर (Saptshrungi Devi Mandir) बंद ठेवण्यात आले होते. त्या अनुषंगाने मूर्ती संवर्धन व देखभालीचे काम पूर्ण झाले असून भगवतीच्या मूळ रूपाचे दर्शन होत आहे. देवीच्या मूर्तीवरून अकराशे किलो शेंदूर काढण्यात आल्यानंतर सप्तशृंगी देवीचे मूळ रूप पहिल्यांदाच भाविकांसमोर आले आहे. भगवतीचे मूर्ती संवर्धन आणि देखभाल करण्यासाठी मागील 45 दिवसांपासून मंदिर दर्शनासाठी बंद असून मूर्ती संवर्धनाचे काम पूर्ण झाले आहे. अशातच देवीच्या मूर्तीचे काही फोटो समोर आले आहेत. एकूणच मूर्तीचा झालेला कायापालट सर्वांनाच आश्चर्य करत आहे.
नाशिकच्या (Nashik) सप्तशृंगी गडावर (Saptshrungi Gad) काही दिवसांपूर्वी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने भाविकांसह मंदिर प्रशासनाची तारांबळ उडाली होती. यानंतर मंदिर देखभालीसाठी तसेच देवी मूर्तीच्या संवर्धनासाठी मंदिर बंद ठेवण्यात आले होते. मूर्ती संवर्धन प्रक्रिया केल्यानंतर भगवतीला स्वरूपावरील मागील क्रित्येक वर्षांपासून साचलेला शेंदूर लेपणाचा भाग धार्मिक व शास्त्रोक्त पद्धतीने काढण्यात आला आहे. त्यानंतर सहा ते आठ सप्टेंबर दरम्यान धार्मिक पूजा हवन विधीचे आयोजन केल्यानंतर आता पितृपक्षात सर्व भक्तांच्या कल्याणासाठी सोळाशे देवी अथर्वशीर्ष पठण अनुष्ठान होत आहे. तर यंदाच्या घटस्थापनेला म्हणजेच पहिल्या माळेला देवीचे मूळ रूप दर्शनासाठी खुले होणार आहे. त्यामुळे घटस्थापनेला सप्तशृंगी मातेच्या मूळ रूपाचं दर्शन सर्व भाविकांना घेता येणार आहे. त्यासाठी भाविकांनी व्यवस्थापनास योग्य सहकार्य करावे असे आवाहन विश्वास त्यांच्या वतीने करण्यात आले आहे.
साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्यपीठ म्हणून ओळख असलेल्या वणी येथील सप्तशृंगी देवीचे मंदिर मूर्ती संवर्धन आणि देखभालीसाठी बंद करण्यात आले होते. मंदिरातील देवीच्या गाभाऱ्यामध्ये काम करण्यासाठी हे मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला होता. देवीच्या मूर्तीचे संवर्धन आणि कामकाजाच्या अनुषंगाने सप्तशृंगी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्याचा सूचना देण्यात आल्या होत्या. तत्पूर्वी सप्तशृंगी गडावर ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे मंदिराची संरक्षक भिंत कोसळली होती. त्यामुळे मूर्ती संवर्धन आणि मंदिराचे काम अशा दोन्ही कामांसाठी आणखी काही कालावधीसाठी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यानच्या काळात भाविकांना पहिल्या पायरीचे दर्शन उपलब्ध होते.
असे आहे सप्तश्रुंगीचे नवे रूप
सद्यस्थितीत शेंदुर लेपन काढल्यानंतर भगवतीची मूर्ती जवळपास दहा फुटी उंच आठ फूट रुंद आकारात व एकूण 18 हातात भिन्न प्रकारातील अस्र व शस्त्र असून त्यात उजव्या हातात खालील बाजूकडून वरून बाजूकडे अक्षरमाला, कमल, बाण, खडक, वज्र, गदा, चक्र, त्रिशूल, परशु तर डाव्या हातात खालून बाजू कडून वरील बाजूकडे कमांडलू, पानपात्र, धनुष्य, चर्म, कालदंड, शक्ती, पाच घंटा आहे. ही शस्त्र-अस्त्र विविध देवदेवतांची प्रतीके असल्याची म्हटले जाते. श्री भगवतीची मूर्ती अति प्राचीन व विश्वातील एकमेव भव्य आकार व प्रकारातील ती एकमेव स्वयंभू मूर्ती आहे.
अनेक वर्षांपासून शेंदूर लेपन
गेल्या अनेक वर्षांपासून नाशिकच्या सप्तशृंगी देवी मंदिर राज्यासह देशात प्रसिध्द आहे. नाशिकजवळील वणी येथील गडावर सप्तशृंगी देवीचे मंदिर आहे. मंदिरातील देवी मूर्तीवर वर्षानुवर्ष शेंदूर लेपन सुरू आहे. तसेच सप्तशृंगी गडावर देवीचे मंदिर अनेकदा डोंगराचा भाग तसेच पावसाळ्यात पाणी झिरपून मूर्तीच्या काही भागात हानी पोहोचत असल्याचे पुजारी वर्गाच्या लक्षात आले होते. यानंतर पुरोहितांनी सन 2012-13 मध्येच विश्वस्त मंडळाकडे मूर्ती संवर्धनासाठी मागणी करीत पाठपुरावा केला होता. देवीचा शेंदूर काढण्याची सर्व प्रक्रिया ही पुरातत्व खात्याच्या नियमानुसार करण्यात आली. यामध्ये कोणत्याही रासायनिक प्रक्रियेचा वापर करण्यात आला नाही. त्यानुसार सप्तशृंगी निवासी ने देवी ट्रस्टने सर्व पुरातत्त्व विभाग आयटीआय पवई यांचे अहवाल व प्रशासकीय परवानगीने पुरातत्व विभागाची मान्यता असलेल्या अजिंक्यतारा कन्सल्टन्सी नाशिक या संस्थेमार्फत संवर्धनाचे काम सुरू केले होते.