Nashik Helmet : नाशिकमध्ये वर्षभरात 83 दुचाकीचालकांचा मृत्यू, 01 डिसेंबरपासून पुन्हा हेल्मेटसक्ती
Nashik Helmet : नाशिकमध्ये (Nashik) 1 डिसेंबर पासून दुचाकीचालकांना (Two Wheelar) हेल्मेट बंधनकारक करण्यात आले आहे.
Nashik Helmet : हेल्मेट सक्तीचा (Helmet) मुद्दा नाशिकमध्ये (Nashik) पुन्हा गाजण्याची शक्यता आहे. कारण शहरात 1 डिसेंबर पासून दुचाकीचालकांना (Two Wheelar) हेल्मेट बंधनकारक करण्यात आले आहे. हेल्मेट परिधान न केल्यास मोटर वाहन कायद्यानूसार कारवाई होण्यासोबतच पाचशे रुपये दंडही आकारला जाऊ शकतो, दंडाची तशी तरतूद देखिल कायद्यात असल्याचं पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे (Nashik CP) यांनी आपल्या आदेशात म्हंटल आहे.
नाशिकमधल्या हेल्मेट सक्तीची मोहीम तात्कालीन पोलीस आयुक्त दीपक पांडे (Deepak Pandey) यांच्या बदलीनंतर थंडावली होती. मात्र आता पुन्हा मोहिमेला सुरुवात होणार असून येथे एक डिसेंबर पासून शहरात हेल्मेट न वापरणार विरुद्ध दंडात्मक कारवाईची मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त जयंत नाईक नवरे यांनी स्पष्ट केले आहे. येत्या काही दिवसात शहर पोलिसांकडून पुन्हा एकदा कारवाईचा बडगा उगारला जाणार असून त्यासाठी दुचाकी चालकांना एका आठवड्याची मुदत शहर पोलिसांकडून देण्यात आली आहे. चांगल्या प्रतीचे हेल्मेटसह दुचाकी धारकांनी दे वापरणे देखील बंधनकारक करण्यात येणार आहे. त्यामुळे नाशिककरांना पुन्हा हेल्मेटसक्तीला सामोरे जावे लागणार आहे.
नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील तत्कालीन पोलीस आयुक्त पांडे यांनी रस्ता सुरक्षा दृष्टीने हेल्मेट वापरा संबंधी जनप्रबोधनपर अभियान राबवत मागील वर्षी नो हेल्मेट नो पेट्रोलचा आदेश काढला होता. त्यासाठी भरारी पथकांची ही नियुक्ती केली होती. तसेच शहरात 'हेल्मेट नाही तर पेट्रोल नाही' असेही प्रयोग राबवण्यात आला होता. हा प्रयोग काही अंशी वादात सापडला होता. त्यानंतर नाशिक शहरातील शासकीय आस्थापना, रुग्णालये, शाळा, महाविद्यालयात 'हेल्मेट नाही तर सहकार्य नाही' हा प्रयोग नंतर राबवण्यात आला. मात्र पांडे यांच्या बदलीनंतर हे अभियान बाजूला पडले. पुन्हा एकदा शहर वासियांकडून पहिले पाढे पंच्चावन सुरु झाले. तसेच हेल्मेट सक्ती बाबतची पोलिसांकडून केली जाणारी कारवाई देखील मंदावल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान पोलिसांच्या माहितीनुसार यंदाच्या वर्षी हेल्मेट न घातल्यामुळे आजपावेतो 83 दुचाकीस्वारांचा मृत्यू तर 261 जण गंभीर जखमी झाल्याची पोलिसांकडे नोंद करण्यात आली आहे. तसं बघितलं तर माजी पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या काळात नाशिक मधील हेल्मेट सक्तीचा मुद्दा हा राज्यभर चर्चेत राहिला होता मात्र त्यांच्या बदलीनंतर ही मोहीम थंडावली होती, आता पुन्हा या मोहिमेला नाशिककर कसा प्रतिसाद देणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.
कठोर कारवाई करणार
नाशिक शहरांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर पोलिसांनी राष्ट्रीय राष्ट्रीय महामार्गावर गस्त वाढवली असता अपघातांमध्ये बऱ्यापैकी घट झाल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी देखील हेल्मेट वापराबद्दल पोलीस आयुक्तालयामध्ये वेळोवेळी मोहिमा राबवण्यात आल्या आहेत. त्या त्या वेळी अपघातांच्या संख्येमध्ये व गंभीर दुखापतीमध्ये घट झाल्याचे आढळून आले आहे. दुचाकी स्वरांचे होणाऱ्या अपघात व त्यामध्ये होणारे प्राणहानी गंभीर जखमा व त्यामुळे येणाऱ्या अपंगत्व या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन न करणाऱ्या विरुद्ध पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे. नाशिक शहरातील सर्व दुचाकीधारकांनी योग्य प्रतीचे हेल्मेट वापरून आपल्या दुचाकी वाहन चालवावे व वाहतूक नियमांचे पालन करावे असे आवाहन पोलीस विभाग विभागाकडून करण्यात आले आहे.