Nashik News : खंडित वीजजोडणीला विलंब, शेतकऱ्यांची न्यायालयात तक्रार, महावितरणला झटका
Nashik News : सिन्नर (Sinnar) तालुक्यातील शेतकऱ्याला ग्राहक मंचाने (Grahak Manch) न्याय मिळवून दिला आहे.
Nashik News : सिन्नर (Sinnar) तालुक्यातील एका शेतकऱ्याला ग्राहक मंचाने (Grahak Manch) न्याय मिळवून दिला आहे. शेतकऱ्याने वीज वितरण कंपनीच्या (MSEB) विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर न्यायालयाने दोन्ही बाजुंचे म्हणणे ऐकत शेतकऱ्याला पिकाच्या नुकसानीपोटी नऊ लाख रुपये देण्याचे वीज कंपनीला आदेश दिले आहेत. त्यामुळे परिसरात शेतकऱ्याची चांगलीच चर्चा होत आहे.
नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील मधुकर ठोंबरे व विलास देवळे या दोन्ही शेतकऱ्यांनी यांनी याबाबत ग्राहक मंचाकडे तक्रार दिली होती. यंदाच्या पावसाळ्यात शेतकऱ्यानी शेतात घेतलेल्या वीजजोडणी खंडित झाल्यानंतर वीज वितरण कंपनीने वेळेत जोडणी न करता वाढीव बिल दिले. याबाबत शेतकऱ्यांनी ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल केल्यानंतर न्यायालयाने दोन्ही पक्षकारांचा युक्तिवाद ऐकून विज वितरण कंपनीला पिकाच्या नुकसानीपोटी 1 लाख तसेच घरगुती आणि कृषिपंप या दोन्ही वीजजोडणी 2016 ते 2017 या कालावधीत न दिल्याने प्रतिदिन 1200 प्रमाणे 7 लाख 92 हजार रुपये असे एकूण 9 लाख रुपये शेतकऱ्यास देण्याचे आदेश दिले. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळाला आहे.
सिन्नरच्या दोन्ही शेतकऱ्यांनी शेती कामासाठी शेतात कृषिपंप घरगुती वीजजोडणी केली आहे. या दोन्ही वीजजोडणीची स्वतंत्र मीटर असून लाईट बिल देखील नियमित भरलेली आहेत. मात्र 2016 मध्ये पावसामुळे वीजपुरवठा बंद झाल्याने शेतकऱ्यांनी दुरुस्तीसाठी महावितरणला लेखी तक्रार दिली. त्यानुसार स्थानिक वायरमनने वीज वितरण कार्यालयाकडून पोल आणि साहित्य मिळाल्यानंतर दुरुस्ती केली जाईल, असे सांगितले गेले. वीजपुरवठा बंद असल्याने शेतातील डाळिंब पिकाला पाणी देता आले नाही. घरातील लाइट बंद असल्याने असुविधा झाल्याने मुख्य अभियंता मुंबई आणि कार्यकारी अभियंता ग्रामीण, उपकार्यकारी अभियंता सिन्नर यांच्या विरोधात ग्राहक न्यायमंचाकडे तक्रार केली होती.
दरम्यान शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीमध्ये खंडित वीजपुरवठ्यामुळे डाळिंब पिकांचे नुकसान भरपाईपोटी 6 लाख 50 हजार आणि 2016 ते 2017 या कालावधीत वीजजोडणीचे प्रतिदिन 1200 प्रमाणे 7 लाख 92 हजार मिळावे अशी तक्रार केली होती. वीज वितरण कंपनीकडून यास विरोध करत वीज बिल दुरुस्त करून देण्याचे मान्य केले होते. न्यायमंचाच्या अध्यक्षांसह सदस्यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत डाळिंब पिकांचे नुकसान झाल्याचे कृषी अधिकाऱ्यांचा अहवाल सादर केलेला नाही. वीजपुरवठा खंडित झाल्याच्या कालावधीत कंपनीने ग्राहकाला प्रतिदिन जोडणी 1200 प्रमाणे 7 लाख 92 हजार रुपये व पिकांच्या नुकसान भरपाईपोटी 01 लाख रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. वीज ग्राहकास 2016 ते 2017 या काळात वीज जाेडणी न दिल्याने ग्राहकाचे नुकसान झाले. तसेच वीज नसल्याने घरामध्ये असुविधा झाल्याचे लक्षात घेत ग्राहक न्याय मंचाने ग्राहकास नुकसान भरपाई देण्याचे आदेश वीज वितरण कंपनीस दिले आहेत.