Maharashtra Breaking News Live Updates : उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या रायगड दौर्‍यावर, राज ठाकरे मुख्यमंत्री शिंदेच्या भेटीला

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 02 Dec 2023 03:54 PM
मराठा आणि कुणबी एकच, साहित्य संमेलनात ठरावा घ्यावा; सकल मराठा समाजाची मागणी

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील गंगापूरमध्ये सुरु असलेल्या 43 व्या मराठवाडा साहित्य संमेलनात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजला. साहित्यिकांनी मराठा आरक्षणावरून सरकारला खडे बोल सुनावले. त्यानंतर आता सकल मराठा समाजाच्या वतीनं मराठवाडा साहित्य परिषदेच्या अध्यक्षांना पत्र लिहून संमेलनात मराठा आणि कुणबी एकच असल्याचा ठराव घेण्याची मागणी करण्यात आली आहे. सध्या मराठवाड्यात सगळ्याच कार्यक्रमात मराठा आंदोलनाची धग दिसून येऊ लागली आहे. त्याचेच पडसाद आता साहित्य संमेलनात सुद्धा दिसत आहे.



Beed Fire : घराला लागलेले आगीत शेतकऱ्याचं 25 लाख रुपयांचा नुकसान, 20 क्विंटल कापूस जळून खाक
बीड जिल्ह्याच्या मानमोडी गावांमध्ये अर्जुन पौळ या शेतकऱ्याच्या घरात अचानक आग लागल्याने वीस क्विंटल कापूस आणि संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाले आहेत यामध्ये त्यांचा 25 लाख रुपयांच्या वर नुकसान झाल आहे.. अर्जुन पवळे यांची गावांमध्ये माळदाची दोन मजली माडी आहे सकाळच्या वेळी अचानक त्यांच्या घरात आग लागली घरामध्ये कापूस असल्याने काय क्षणामध्ये आग संपूर्ण घरात पसरली त्यामुळे घरातील संसार उपयोगी साहित्य आणि घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून गावकरी आणि अग्निशमन दलाच्या मदतीने आग विझवण्यात आली.

 
Ajit Pawar Raigad Daura : उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या रायगड दौर्‍यावर

Ajit Pawar Raigad Visit : रविवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार रायगड दौर्‍यावर येत असून त्यांच्या हस्ते श्रीवर्धनमध्ये विवीध विकास कामांचे लोकार्पण केले जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने रानवली धरणातुन श्रीवर्धन शहराला शुद्ध पाणी पुरवठा योजना आणि प्रागतीक पर्यटनमधुन श्रीवर्धन समुद्र किनाऱ्याच्या सुशोभिकरणाचे लोकार्पण केले जाणार आहे. या पाणी पुरवठा योजनेमुळे सुमारे 30 हजार लोकसंख्येला शुद्ध पाणी पुरवठा केला जाणार आहे तर समुद्र किनारी सेल्फी पॉईंट, स्ट्रिटलाईट आदी सुविधांचा श्रीवर्धनकर नागरीक आणि पर्यटकांना लाभ मिळणार आहे. या लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभुमीवर सभेचे आयोजन देखील करण्यात आले आहे. श्रीवर्धन हा मंत्री आदीती तटकरे यांचा मतदार संघ असुन राष्ट्रवादीतील फुटी नंतर अजितदादा प्रथमच दक्षिण रायगडमध्ये येत आहेत. आगमी निवडणुकांच्या धर्तीवर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना अजितदादा काय सल्ला देणार हे पहाण महत्वाच ठरणार आहे. मुख्य म्हणजे रायगड लोकसभा मतदार संघात अजित पवार यांनी  निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे उद्या अजित पवार नेमकं काय बोलतात? हे पाहावं लागेल.

Pune Fire News :

पुणे :  मुंबई-बंगळुरू महामार्गावर नऱ्हे येथील स्वामीनारायण मंदिरासमोर पुठ्ठ्याने भरलेला छोटा हत्ती टेम्पो शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाल्याची घटना सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा कुणीबी जखमी नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नांदेड सिटी येथून पुठ्ठा भरून सातारच्या दिशेने जात असताना नऱ्हे येथील स्वामीनारायण मंदिरासमोर येताच टेम्पोमधून धूर निघू लागल्याने टेम्पो रस्त्याच्या कडेला घेऊन गाडीतून उतरून बघितले असता शॉर्टसर्किट होत असल्याचे दिसून आले. सिंहगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अग्निशमन दलाला मदत केली आणि पुढील घटनेचा तपास सिंहगड पोलीस करत आहे.

Jammu Kashmir Snowfall : जम्मू काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी! बर्फाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी

Jammu and Kashmir Snowfall : पर्यटकांचं आकर्षण असलेल्या जम्मू काश्मिरमध्येही बर्फाची चादर पहायला मिळतं आहे. जोरदार बर्फवृष्टीमुळे सर्वत्र बर्फच बर्फ पहायला मिळतेय. जम्मू-काश्मीरमधील लोकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे. जम्मू काश्मीरमधल्या मुघल रोडवरील पीर पंजाल रेंजमध्ये बर्फवृष्टी झाली आहे. त्यामुळे सध्याचं तिथलं तापमान खाली घसरलं आहे.


पाहा फोटो

Datta Dalvi Banner : दत्ता दळवी यांच्या समर्थनार्थ विक्रोळीत बॅनरबाजी




Datta Dalvi Banner : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बद्दल भाषणात अटक झालेल्या शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी महापौर दत्ता दळवी यांची काल जामिनावर मुक्तता झाली आहे. आज दत्ता दळवी दुपारी 1 वाजता मातोश्री वर जाऊन उद्भव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.तर विक्रोळी मध्ये आज सकाळपासून दत्ता दळवींच्या समर्थनार्थ बॅनरबाजी करण्यात आली आहे.टायगर इज बॅक असा मजकूर यावर असून संजय राऊत आणि सुनील राऊत यांचा फोटो यावर आहे. 



 


Ratnagiri Sahitya Samelan : पहिल्या प्रगतशील साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात
पहिल्या प्रगतशील साहित्य संमेलनाला रत्नागिरीत आजपासून सुरुवात झाली आहे. रत्नागिरी एमआयडीसीमध्ये असणाऱ्या नवनिर्माण महाविद्यालयामध्ये दोन दिवस हे साहित्य संमेलन असणार आहे .शहरातील जलतरण तलावापासून आज ग्रंथ दिंडी काढण्यात आली. दिंडीमध्ये विद्यार्थी, साहित्यिक तसेच रत्नागिरीकर सहभागी झाले होते.ढोल ताशाच्या गजरात ही ग्रंथ दिंडी काढण्यात आली. साहित्य संमेलनाला गोपाळबाबा वलंगकर साहित्यनगरी असे नाव देण्यात आलेले आहे. या साहित्य संमेलनामध्ये देशभरातून साहित्यिक, लेखक आणि कवी येथे सहभागी झाले आहेत.

 
Sangli News : मोठ्या भावाची उपसरपंचपदी निवड, छोट्या भावाने गावाला आणि गावच्या राम मंदिराच्या कळसाला हेलिकॉप्टरने घातली प्रदक्षिणा!

सांगली : आपला भाऊ गावच्या उपसरपंचपदावर विराजमान (Elder Brother Become Deputy Sarpanch) झाला आणि आपल्या कुटूंबाचे कित्येक वर्षांपासूनचे स्वप्न पूर्ण झाले म्हणून उपसरपंचाच्या छोट्या भावाने थेट गावाला आणि गावातील राम मंदिराच्या शिखराला हेलिकॉप्टरने प्रदक्षिणा (Elder brother become deputy sarpanch younger brother helicopter circled the village) घालत आपला आनंद व्यक्त केला.  

Nandurbar St Bus News : गळक्या बसमध्ये चालक आणि वाहकाला काढावी लागली रात्र
Nandurbar St Bus News : नंदुरबार जिल्ह्यातुन मध्य प्रदेशातील पानसेमल गावात रात्री मुक्कामी असलेल्या बस चालक आणि वाहकास रात्रभर बसमध्ये बसूनच रात्र काढावी लागली आहे, संपूर्ण बस गळत असल्याने ओलीचिंब झालेल्या बसमध्ये मुक्कामी आलेल्या वाहक आणि चालकास बसण्यास देखील जागा राहिली नसल्यामुळे या दोघेही चालक आणि वाहकांना रात्रभर मोठी कसरत करत रात्र काढावी लागली., सकाळी उठून या चालक आणि वाहकावर प्रवाशांची देखील मोठी जबाबदारी असताना एसटी प्रशासनातर्फे चालक आणि वाहकासाठी कुठल्याही उपाययोजना नसल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा देखील प्रश्न या निमित्ताने ऐरणीवर आला आहे. 
Bhandara Crime News : 'त्या' हत्याप्रकरणी तरुणीसह तिघांना अटक, प्रेमप्रकरणातून तरुणाचे हातपाय बांधून फेकल्याचं उघड

भंडारा : गोसीखुर्द धरणाच्या बॅक वॉटरमध्ये मासोळी पकडायच्या जाळीत नयन खोडके (19) या तरुणाचा गुरुवारी हातपाय बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. या प्रकरणी जवाहरनगर पोलिसांनी एका तरुणीसह तिच्या दोन मित्रांना अटक केली आहे. नयन खोडके हा दोन दिवसांपूर्वी घरी काही न सांगता बाहेर गेला होता. मात्र, घरी परत गेला नसल्याने त्याच्या बेपत्ता होण्याची तक्रार वरठी पोलिसात दाखल केली असताना त्याचा मृतदेह हातपाय बांधलेल्या अवस्थेत कोरंभी - सालेबर्डी मार्गावरील वैनगंगा नदीच्या बॅक वॉटरमध्ये आढळला होता. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली आणि एका तरुणीसह तिच्या दोन मित्रांना अटक केली. मंथन अशोक ठाकरे (19) रा.  भोजापूर, साहिल शरद धांडे (19) रा. पेट्रोलपंप ठाणा या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. हे सर्व रमणीय स्थळ असलेल्या जवाहरनगर पोलीस स्टेशन हद्दीतील झिरी येथे गेले होते. तिथे त्यांच्यात वाद झाल्यानंतर मृतक नयन खोडके याला दुचाकीवर बसवून घटनास्थळी आणले आणि तिथे त्याला मारहाण करून हातपाय बांधत पुलावरून पाण्यात फेकले होते. जवाहरनगर पोलिस अधिक तपास करीत आहे.

Gold Price Today : सोन्याच्या दरात विक्रमी वाढ! 24 कॅरेट सोन्याचा भाव 65400 रुपये

Gold Silver Rate Today : सोन्याच्या दरात गेल्या काही दिवस पासून सातत्याने वाढ होत असल्याचं पाहायला मिळत असून आठवडा भरात तब्बल दोन हजार रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे सोन्याचे दर जीएसटीसह 65400 रुपये इतक्या विक्रमी पातळीवर जाऊन पोहोचले आहेत. देशात लग्नाचा हंगाम सुरु झाला त्यामुळे सोन्या-चांदीची (Gold Silver Price) मागणीत वाढ झाली आहे. अशात सोने-चांदीचे दर दिवसागणित वाढताना दिसत आहेत.


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

Sindhudurg Tripuri Purnima : गांगेश्र्वर मंदिरात त्रिपुरित्सव उत्साहात संपन्न

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील नारिंग्रे गावात गांगेश्र्वर मंदिरात त्रिपुरित्सव पार पडला. या उत्सवनिमित्त विविध कार्यक्रम आयोजीत केले होते. या कार्यक्रमात महिलांनी सादर केलेले समई नृत्य सर्वांचे आकर्षण बनले. देवगड तालुक्यातील नाद गावातील महिलांनी केलेले रोमहर्षक समई नृत्य सर्वांना मोहित करून गेले. समई नृत्याचे साजरिकरण करत समई डोक्यावर घेऊन विवीध प्रकारचे नृत्य सादर करण्यात आले.

Nandurbar Leopeard Death : रस्त्यावर मृत्यू अवस्थेत आढळला बिबट्या

Nandurbar News : नंदुरबारमधील तळोदा तालुक्यातील तऱ्हावद ते धानोरा रस्त्यावर मृत्यू अवस्थेत बिबट्या आढळला. रात्री गाडीच्या धडक लागल्याने बिबट्याच्या मृत्यू झाल्याच्या अंदाज व्यक्त केला जात आहे. तळोदा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बिबट्यांच्या वावर आहे. रात्री रस्त्यावरून जात असताना वाहनाच्या धडक लागली असल्याने बिबट्या जागीच मृत्यूमुखी पडल्याचा अंदाज आगहे या बिबट्याच्या वन विभागाकडून पंचनामा करण्यात येत असून मृत्यूचे कारण देखील शोधलं जात आहे.

OBC Protest : रोहिणी आयोगाच्या मागणीसाठी राज्यातील सूक्ष्म ओबीसी घटक आक्रमक, 6 डिसेंबरपासून तीन दिवसीय धरणे आंदोलन

Buldhana News : बुलढाणा : राज्यभरात मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, ओबीसी आरक्षण मुद्दा गाजत असताना आता ओबीसी मध्येच मोडल्या जाणाऱ्या सूक्ष्म ओबीसी घटकही आंदोलनाच्या पवित्र उभे ठाकले आहेत . सूक्ष्म ओबीसी घटकाला ओबीसी मध्ये राहूनही राजकीय आरक्षणाचा लाभ मिळत नाही.  त्यामुळे रोहिणी आयोग तात्काळ लागू करावा व सूक्ष्म ओबीसी घटकांचीही दखल घ्यावी अशी मागणी करत आता राज्यातील सूक्ष्म ओबीसी येत्या 6 डिसेंबर म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा या गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विहिरी समोर " तीन दिवसीय अखंडित धरणे आंदोलन " करणार असल्याची माहिती सूक्ष्म ओबीसी समाजाचे राज्य समन्वयक विजय पोहनकर यांनी दिली आहे. त्यामुळे आता राज्यभरात विविध जातींच्या आरक्षणाचा मुद्दा गाजत असतानाच आता ओबीसी समाजातीलच सूक्ष्म ओबीसी रस्त्यावर उतरताना दिसत आहे.

Hunger Strike for Road Issue : घारगाव-पिंपळदरी रस्त्यासाठी आमरण उपोषण सुरु.. ग्रामस्थांचा पाठींबा

Sangamner Protest for Road : संगमनेर तालुक्यातील घारगाव-पिंपळदरी रस्त्याच्या डांबरीकरण करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते गणेश भोसले यांनी आमरण उपोषण सुरू केले असून 14 वर्षापासून मागणी करूनही रस्ता होत नसल्याने उपोषण सुरू करण्यात आले आहे. संगमनेर तालुक्यातील घारगाव ते पिंपळदरी  14 किलोमीटरचा रस्ता असून हा रस्ता रहदारीचा आहे. या रस्त्यावरून दुध, भाजीपाला, शाळकरी विद्यार्थी यांची मोठी वर्दळ सुरु असते या रस्त्यावरून तालुक्यातील साखर कारखान्यांना ऊस वाहतूक सुरु असते. या रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले असून लहान मोठ्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून रस्त्याचे डांबरीकरण झाले नाही. लोकप्रतिनिधी व प्रशासनाने अद्यापही दखल घेतली नाही. त्यामुळे सर्वसामान्य ग्रामस्थांवर उपोषण करण्याची वेळ आली आहे.

Gadchiroli Naxalite : ‘पीएलजीए’ सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी नक्षल्यांची ‘बॅनरबाजी’, पोलीस यंत्रणा सतर्क

गडचिरोली : पीएलजीए’ सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी नक्षल्यांनी भामरागड तालुक्यातील मीडदापल्लीजवळ कापडी बॅनर लावून इशारा दिल्याने दुर्गम भागात दहशतीचे वातावरण आहे. दरम्यान, पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून नक्षल प्रभावित क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पोलीस जवानांना तैनात करण्यात आले आहे.


नक्षल्यांचे सशस्त्र संघटन पीपुल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मीच्या (पीएलजीए) स्थापना दिनानिमित्त नक्षलवादी दरवर्षी २ ते ८ डिसेंबरदरम्यान ‘पीएलजीए’ सप्ताह पाळतात. यादरम्यान ते हिंसक कारवाया करतात. त्यामुळे गडचिरोलीच्या नक्षलप्रभावित क्षेत्रात या काळात दहशतीचे वातावरण असते. आज ‘पीएलजीए’ सप्ताहाचा पहिलाच दिवस असून नक्षल्यांनी भामरागड तालुक्यातील मीडदापल्ली जवळ बॅनर लावले. यात त्यांनी हा सप्ताह साजरा करण्याचे आवाहन केले आहे.



Gadchiroli Naxalite : ‘पीएलजीए’ सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी नक्षल्यांची ‘बॅनरबाजी’, पोलीस यंत्रणा सतर्क

गडचिरोली : पीएलजीए’ सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी नक्षल्यांनी भामरागड तालुक्यातील मीडदापल्लीजवळ कापडी बॅनर लावून इशारा दिल्याने दुर्गम भागात दहशतीचे वातावरण आहे. दरम्यान, पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून नक्षल प्रभावित क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पोलीस जवानांना तैनात करण्यात आले आहे.


नक्षल्यांचे सशस्त्र संघटन पीपुल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मीच्या (पीएलजीए) स्थापना दिनानिमित्त नक्षलवादी दरवर्षी २ ते ८ डिसेंबरदरम्यान ‘पीएलजीए’ सप्ताह पाळतात. यादरम्यान ते हिंसक कारवाया करतात. त्यामुळे गडचिरोलीच्या नक्षलप्रभावित क्षेत्रात या काळात दहशतीचे वातावरण असते. आज ‘पीएलजीए’ सप्ताहाचा पहिलाच दिवस असून नक्षल्यांनी भामरागड तालुक्यातील मीडदापल्ली जवळ बॅनर लावले. यात त्यांनी हा सप्ताह साजरा करण्याचे आवाहन केले आहे.



Chhagan Bhujbal News : विभागीय आयुक्त कार्यालयात शिंदे समितीची बैठक

Chhagan Bhujbal News : गेल्याच आठवड्यात हिंगोलीतील सभेत ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी शिंदे समिती रद्द करण्याची मागणी केली होती आणि आज भुजबळांच्याच बालेकिल्ल्यात विभागीय आयुक्त कार्यालयात शिंदे समितीची बैठक पार पडणार आहे. मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहीत करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली असून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात ही समिती आढावा घेत आहे.

Maharashtra Rain Update : वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात विजांच्या गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. मध्यम ते हलक्या स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. पुढील 24 तासांत विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आयएमडी (IMD) ने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज अकोला, वाशिम, बुलढाणा, अमरावती या भागात वादळी वाऱ्यांसह गारपीट होण्याची शक्यता असल्याने या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 

MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधिमंडळामध्ये सुनावणी

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आज मुंबईतील विधिमंडळामध्ये सुनावणी पार पडत आहे. यानंतर थेट नागपूर येथील विधिमंडळामध्ये 7 डिसेंबर पासून सुनावणी होणार आहे. आज आमदार सुनील प्रभू यांची उलट साक्ष पूर्ण झाल्यानंतर शिवसेना कार्यालय सचिव विजय जोशी यांचीही उलट साक्ष घेतली जाण्याची दाट शक्यता आहे. याउलट नागपूर या ठिकाणी होणाऱ्या सुनावणीमध्ये ठाकरे गटाचे वकील हे शिंदे गटातील आमदार आणि खासदारांची उलट साक्ष घेताना पाहायला मिळतील.

Maharashtra Weather : शेतकऱ्यांची चिंता वाढली, पुढील 24 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज,

Maharashtra Rain Alert : राज्यात अवकाळी पावसाचं थैमान सुरुच असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. अवकाळी पावसाचा फटका बसल्याने पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आणि वेस्टर्न डिस्टर्बनसमुळे राज्यात पुढील 24 तासांत काही ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने (India Meteorological Department) वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं लवकरच चक्रीवादळात (Cyclone) रुपांतर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यासह देशाच्या तापमानावर परिणाम होणार आहे. 

B.L. Killarikar Resigned : काल राजीनामा, आज पवारांच्या भेटीला

मुंबई : मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठीच्या सर्वेक्षणाचे निकष अंतिम झाले असून, सर्वेक्षण करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाकडून राज्य सरकारला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. दरम्यान, आयोगाचे सदस्य बालाजी सागर किल्लारीकर यांनी सर्वच जातींचे मागासलेपण तपासावे, अशी मागणी लावून धरून आपल्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे काल राजीनामा देणारे किल्लारीकर आज सकाळीच शरद पवारांच्या (Sharad Pawar) भेटीला पोहचले आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


एबीपी माझाच्या लाईव्ह ब्लॉगमध्ये दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा तुम्ही घेऊ शकता. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सविस्तर आढावा तुम्हाला या लाईव्ह ब्लॉगमधून घेता येईल... 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.