Maharashtra News Updates : ठाण्यात अभूतपूर्व राडा, हर हर महादेव चित्रपटाच्या शो बंद करण्यावरून झाला राडा, मनसे-राष्ट्रवादी आमनेसामने

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 07 Nov 2022 11:12 PM
ठाण्यात अभूतपूर्व राडा, हर हर महादेव चित्रपटाच्या शो बंद करण्यावरून झाला राडा, मनसे-राष्ट्रवादी आमनेसामने

ठाण्यात अभूतपूर्व राडा, हर हर महादेव चित्रपटाच्या शो बंद करण्यावरून झाला राडा, आधी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या चित्रपटाचा चालू शो बंद पाडला, प्रेक्षकांना घरी जाण्यास सांगितले, मग काही कार्यकर्त्यांनी 2 प्रेक्षकांना मारहाण केली, त्यानंतर मनसे ठाणे अध्यक्ष अविनाश जाधव एकटे त्याच शोमध्ये आले. त्यांनी पुन्हा शो सुरू केला, राज ठाकरे यांनी आदेश दिल्याने मी आलो असे त्यांनी सांगितले, आता अविनाश जाधव यांनी सर्व कार्यकर्त्यांना बोलवले आहे, सर्वांना शो बघण्यास सांगत आहेत, पोलीस कार्यकर्त्यांना सोडत नव्हते म्हणून जाधव स्वतः बाहेर आले, पुन्हा सर्व कार्यकर्त्यांना घेऊन आत गेले.

पोलादपूरमध्ये वाळूने भरलेला डंपर रिक्षावर पलटी, अपघातात 4 प्रवाशांचा मृत्यू, तीन विद्यार्थिनींचा समावेश

पोलादपूरमध्ये वाळूने भरलेला डंपर रिक्षावर पलटी, अपघातात 4 प्रवाशांचा मृत्यू, तीन विद्यार्थिनींचा समावेश, खेड येथून माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथे परतत असताना अपघात

Jitendra Awhad : ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये जितेंद्र आव्हाड, हर हर महादेव चित्रपट न पाहण्याचं प्रेक्षकांना आवाहन 

ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये हर हर महादेव हा चित्रपट सुरू असतानाच आमदार जितेंद्र आव्हाड त्या ठिकाणी गेले. हा चित्रपट इतिहासाचं विद्रुपीकरण असल्याचं सांगत त्यांनी प्रेक्षकांना हा चित्रपट बघू नये, बाहेर निघून जावं असं आवाहन केलं

LIVE : भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल, राहुल गांधींसह हजारो कार्यकर्त्यांचा मशाल घेऊन नांदेड जिल्ह्यात प्रवेश

Bharat Jodo Yatra: काँग्रेसची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात, कार्यकर्त्यांच्या हाती तळपत्या मशाली

काँग्रेसची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर निघालेल्या या यात्रेत हजारो कार्यकर्ता हातात तळपत्या मशाली घेऊन चालत आहेत. या यात्रा निमित्त 14 दिवस महाराष्ट्र राहुल गांधी यांचा मुक्काम असणार आहे.   

सोलापूरचे लाचखोर शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना जामीन मंजूर 

सोलापूरचे लाचखोर शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना जामीन मिळाला मंजूर झाला आहे. लोहार  यांना जामीन मिळाला असला तरी त्यांची आज जेलमधून सुटका होणार नाही. कारण त्यांना संध्याकाळी साडे पाच वाजल्यानंतर जामीन मिळाला आहे. त्यामुळे उद्याच त्यांची जेलमधून सुटका होईल. 


 


 

Kiran Lohar : मोठी बातमी: लाचखोर शिक्षण अधिकारी किरण लोहार अखेर निलंबित

सोलापूर जिल्हा परिषदेचे लाचखोर शिक्षण अधिकारी किरण लोहार यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे.  25 हजारांची लाच घेताना 31 ऑक्टोबर रोजी किरण लोहार यांना रंगेहाथ पकडण्यात आले होते.  त्यानंतर राज्य शासनाच्यावतीने किरण लोहार यांचे निलंबनाचे आदेश देण्यात आले होती. 

पालघर: कासा भागात भुरट्या चोरांचा सुळसुळाट

कासा पोलीस ठाण्यांतर्गत भुरट्या चोरांचा सुळसुळाट वाढला असून रात्री पोलिसांची गस्त नसल्याने या भागात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील दोन दिवसात चार दुकानांवर दरोडा पडला असून यातील एक दरोडा हा कासा पोलीस ठाण्याच्या अवघ्या शंभर मीटर अंतरावर टाकण्यात आला. मध्यरात्री झालेल्या चोरीत  मोबाईल दुकानांमधून तब्बल दहा मोबाईल एक लॅपटॉप आणि काही साहित्यही चोरीला गेलं आहे. तीन ते चार चोरट्यांनी हे दरोडे टाकले असून चोरी करतानाच्या घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्या आहेत. दरम्यान चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असताना देखील कासा पोलिस रात्री गस्त घालत नसल्याने स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय.

Dhule: धुळे महापालिकेविरोधात जिल्हा वकील संघ आक्रमक

धुळे शहरातील नागरीकांना नियमित पाणी पुरवठा, चांगले रस्ते, स्वच्छता, पथदिवे, हॉकर्स झोन अशा मुलभुत सुविधा देण्यात अपयशी ठरत असलेल्या धुळे महापालिकेच्या विरुद्ध धुळे जिल्हा वकील संघ आक्रमक झाला आहे. वकील संघाने महापालिकेविरोधात थेट गुन्हा दाखल करण्याची भुमिका घेत, आज लाल फिती लावून निषेध केला. येत्या महिन्याभरात मनपाकडून जनतेचे हक्काचे प्रश्न सोडवले गेले नाही, तर गुन्हा दाखल करण्याची कारवाईचा इशारा आज वकील संघाच्या वतीने देण्यात आला आहे.


 

नागपूरमध्ये पोलिस चौकीतील दुचाकी पेटवून दिल्या, संशयितांचा शोध सुरू  

नागपूर : मागच्या काही दिवसात नागपूर मधील गुन्हेगारी आटोक्यात येत असल्याचे चित्र दिसत असताना एका घटनेने नागपूर पोलिसांना हादरून सोडले आहे. नागपूरच्या सीताबर्डी पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या वसंतराव नाईक झोपडपट्टी  पोलिस चौकीमध्ये पार्क असलेली पोलिसांची वाहने अज्ञाताकडून जाळण्यात आली आहेत.  पेट्रोलिंगवर असलेल्या तीन शिपायांच्या खासगी दुचाकी  पोलिस चौकी मध्ये होत्या. आरोपीने दुचाकीच्या पेट्रोलच्या पाईप काढून आग लावून दिली. घटनेत तिन्ही शिपायांच्या दुचाक्या जळूच खाक झाल्या असून पोलिसांना अद्याप आरोपीचा शोध लागला नाही. पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरु असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. महत्वाचे म्हणजे दुचाकी जळाल्याने एका पोलिस शिपायाला सायकलने चौकीत कर्तव्यावर यावे लागले.  

Dipali Sayyed: हा शब्द वापरणं चुकीचं: दीपाली सय्यद

Dipali Sayyed: राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत गलिच्छ शब्द वापरल्यानं संतापाची लाट उसळली आहे. अब्दुल सत्तार यांनी वापरलेल्या शब्दावर दीपाली सय्यद यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा शब्द वापरणं चुकीचं, सत्तारांनी शब्द मागे घेतला पाहिजे अशी प्रतिक्रिया दीपाली सय्यद यांनी दिली आहे. 

Vaishali Nagawade: अब्दुल सत्तार यांना रस्त्यावर फिरू देणार नाही: वैशाली नागवडे

Vaishali Nagawade:  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्यावा अन्यथा अब्दुल सत्तार यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा वैशाली नागवडे यांनी दिला आहे. वैशाली नागवडे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे विभागाच्या अध्यक्षा आहेत.

Maharashtra News: अब्दुल सत्तार यांची सुप्रिया सुळेंवर गलिच्छ भाषेत टीका,अभद्र भाषेमुळे महाराष्ट्रात संतप्त प्रतिक्रिया

Maharashtra News:  राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत गलिच्छ शब्द वापरल्यानं संतापाची लाट उसळली आहे.   शब्द मागे घेण्यासाठी सत्तारांना राष्ट्रवादीने 24  तासांचा अल्टिमेटम दिला आहे. 


 





EWS Reservation : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे मनापासून स्वागत : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

EWS Reservation : सर्वोच्च न्यायालयाच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आरक्षण देण्याच्या निर्णयाचं मनापासून स्वागत करतो, असं ट्विट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय.


 





कोल्हापूर : मनसेनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाटली भाजी मंडई

करवीर तालुक्यातील गोकुळ शिरगावमधील भाजी विक्रेत्यांवर करण्यात येणाऱ्या अन्यायी कारवाईच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजी मंडई थाटून आज अनोखे आंदोलन करण्यात आले. भाजी विक्रेत्यांना व्यवसायासाठी जागा द्यावी, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामूदायिक आत्मदहन करू, असा इशारा यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष राजू यादव यांनी दिला.

Solapur News :  सोलापुरात हर हर महादेव चित्रपटाचा शो थांबवला

Solapur News :  सोलापुरात हर हर महादेव चित्रपटाचे प्रदर्शन रोखले आहे. चुकीचा इतिहास मांडत असल्याचा आरोप करत सकल मराठा समाज संघटनेने  प्रदर्शन बंद पाडले.  सोलापुरातल्या ई स्क्वेअर  चित्रपटगृहातील  दुपारी पावणे एक वाजताचा शो आंदोलकानी बंद पाडला आहे.  चित्रपटगृहातील 19 प्रेक्षकांना त्यांचे तिकीटाचे पैसे देखील थिएटर प्रशासनाला परत करायला लावले. यापुढे चुकीचा इतिहास मांडणारे चित्रपट प्रदर्शित करू नका अन्यथा चित्रपट चालू देणार नाही, असा इशारा सकल मराठा समाज समन्वयक  माऊली पवार यांनी दिला आहे

Yawatmal News : यवतमाळच्या उमरखेड येथे घरासमोर डफले वाजवण्यावरुन झालेल्या वादात तरुणाचा मृत्यू

Yawatmal News : यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील माणकेश्वर येथे तुळशीचे लग्न लावण्याच्या वादातून झालेल्या झटापटीत तरुणाचा मृत्यू झाला आहे. घरासमोर डफली वाजवू नको असे वारंवार सांगण्यात आले मात्र तरी न ऐकल्याने दोघांमध्ये झटापटी झाली. झटापटी दरम्यान बाबाराव मोतीराम पतंगे याचा मृत्यू झाला आहे.

पुण्यात राजू शेट्टी यांच्या नेतृत्त्वात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा

Pune News : पुण्यात राजू शेट्टी यांच्या नेतृत्त्वात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मोर्चा काढला आहे. अलका चौकातून निघालेला हा मोर्चा साखर संकुलावर धडकणार आहे. एकरकमी एफआरपी आणि इतर मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हा मोर्चा काढला.

Jalna News: जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकाचा अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न

Jalna News:  जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका शेतकऱ्याने अंगावर डिझेल ओतून स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र सध्या वेशात माहितीवरून अगोदरच दबा धरून असलेल्या पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. संतोष पाटोळे असे या शेतकऱ्याचे नाव असून एका कंपनीच्या ट्रॅक्टरच्या शोरूम चालकाला दिलेले धनादेश परस्पर दुसऱ्या व्यक्तीला देऊन आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप या शेतकऱ्याने केला आहे, पोलीस ठाण्यात तक्रार देऊन सुद्धा कारवाई होत नसल्याने या शेतकऱ्याने हा आत्महत्याचा प्रयत्न केला.
दरम्यान शेतकऱ्या बरोबर त्याच्या पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय..

Aaditya Thackeray : ज्यांनी स्वत:ला विकलं नाही त्यांना भेटायला आलोय : आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray : "ज्यांनी स्वत:ला विकलं नाही त्यांना भेटायला आलोय" असे शिवसेनेचे आदित्य ठाकरे बाळापूरमध्ये आदित्य ठाकरेंची सभा घेण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. 

आमदार भास्कर जाधव यांनी कुडाळ पोलीस स्टेशनला हजेरी लावली

Sindhudurg News : आमदार भास्कर जाधव यांनी आज सिंधुदुर्गातील कुडाळ पोलीस स्टेशनला हजेरी लावली. आमदार वैभव नाईक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या नोटीसनंतर महाविकास आघाडीने काढला होता. या मोर्चानंतर केलेल्या चिथावणीखोर भाषणाप्रकरणी कुडाळ पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. 18 ऑक्टोबरला कुडाळमध्ये आयोजित रॅलीत आमदार भास्कर जाधव यांनी चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी जामीन मंजूर केला. मात्र न्यायालयाने यांना कुडाळ पोलीस स्थानकात हजेरी लावण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आमदार भास्कर जाधव यांनी आज कुडाळ पोलीस स्टेशन येथे हजेरी लावली.

संगमनेरमध्ये 15 लाखांच्या गांजासह ब्रीजा कार जप्त, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांची कारवाई

Ahmednagar News : संगमनेर लोणी रोडवर समनापूर गावाजवळ अवैधरित्या गांजाचे वाहतूक होणार असल्याची गुप्त खबऱ्यामार्फत माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांना समजली. त्यांनतर त्या ठिकाणी पथकाने सापळा रचून संदीप लक्ष्मण भोसले, (वय 35 वर्षे. रा. मलकापुर ता.कराड, जि. सातारा) आणि बाळासाहेब भाऊसाहेब शिंदे (वय ३० वर्षे, रा. वडगाव सावताळ, ता. पारनेर) यांना ताब्यात घेत वाहनाची तपासणी केली असता त्यांचे ताब्यातील ब्रीझा कारच्या डिक्कीमध्ये 15 लाख 55 हजार 740 रुपये किंमतीचा एकूण 172 किलो 86 ग्रॅम काळपट हिरवट रंगाची पाने, फुले, काड्या आणि बिया असलेले कॅनाबीज पोलिसांनी जप्त केल आहे.

Beed  News : राज्यामध्ये तब्बल 15 हजार पोलिसांच्या जागा बीडमध्ये मात्र पाचच जागा रिक्त

Beed  News : राज्यामध्ये तब्बल 15 हजार पोलिसांच्या जागा भरण्यात येणार असून बीडमध्ये मात्र पाचच जागा रिक्त असल्याने पोलीस भरती होणार नसल्याची माहिती पोलीस प्रशासनाने  दिली आहे. बीडमध्ये पोलीस भरती होणार नसल्याने पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांची निराशा झाली असून त्यांना आता इतर जिल्ह्यांमध्ये भरतीसाठी अर्ज करावे लागणार आहेत.. बीडमध्ये 2021 पासून पाच पदे रिक्त असून त्यासाठी देखील अर्ज मागवले जाणार नसल्याने  विद्यार्थ्यांची निराशा झाली आहे.

Beed News: बालाघाटच्या डोंगरातल अवैध उत्खनन थांबवण्यासाठी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन
Beed News: बीड जिल्ह्यातील बालाघाटाच्या डोंगरामध्ये अवैध उत्खनन करून यामध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी यासाठी भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हाधिकारी यांच्या विरोधात आक्रोश आंदोलन करण्यात आलं. बालाघाटाच्या डोंगराला मध्ये होणाऱ्या अवैध उत्पन्नामुळे मोठ्या प्रमाणात शासनाचा महसूल बुडत असून अधिकारी यामध्ये पैसे घेऊन उत्खनन करन्याची परवानगी देत आहेत त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. 
Kolhapur: कोल्हापूर-सांगली मार्गावर उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून रास्ता रोको आंदोलन

Kolhapur:  कोल्हापूर-सांगली मार्गावर उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. अतिवृष्टीमुळे उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना अजून मदत मिळाली नाही. हातकणंगले तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. मात्र शेतकऱ्याला मदत मिळत नाही हेक्टरी 50 हजार रुपये मदत मिळावी यासाठी हे आंदोलन आहे शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांच्या नेतृत्वाखालील हे आंदोलन होत आहे. या भागातील शिवसेनेचे माजी आमदार उल्हास पाटील आणि सुजित मिनचेकर देखील उपस्थित राहणार आहेत

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे यांनी घेतलं अकोल्याचं ग्रामदैवत राज राजेश्वराचं  दर्शन

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे यांनी अकोल्याचं ग्रामदैवत राज राजेश्वराचं  दर्शन घेतले आहे.  सोबत खासदार अरविंद सावंत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आमदार नितीन देशमुख  हे देखील उपस्थितत आहे

Sudhir Mungantiwar on EWS Reservation : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत, मराठा समाजाला आरक्षणाचा फायदा: सुधीर मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar on EWS Reservation : मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. भविष्यात राज्य सरकारही राज्यातील आर्थिक मागास घटकांना आरक्षणासंदर्भात विचार करेल असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. राज्यातील मराठा समाजाला देखील या आरक्षणाचा फायदा घेता येणारे असल्याचे सुधीर मुनगंटीवार म्हणाले. 

EWS Reservation :  मराठा समाजाच्या आरक्षणसाठी सुप्रीम कोर्टाचा निकाल सकारात्मक, संजीव भोर यांची प्रतिक्रिया

EWS Reservation :  इडब्ल्यूएस आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा ऐतिहासिक असून या महत्वपूर्ण निकालामुळे मराठा समाजासह जे जे शेतकरी जातीसमूह आरक्षण मागत आहे त्यांना आरक्षण मिळण्यासाठी हा निकाल अतिशय सकारात्मक ठरणार आहे. ईडब्ल्यूएस आरक्षण वैध ठरवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे हार्दिक स्वागत करत आहोत, अशी प्रतिक्रिया संजीव भोर यांनी दिली आहे

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 10 टक्के आरक्षण सर्वोच्च न्यायालयात वैध, पाचपैकी चार न्यायमूर्तींकडून आरक्षणाला मान्यता

#EWSReservation : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 10 टक्के आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर सुनावणी


न्यायमूर्ती पारडीवाला यांचीही ईडब्लूएस आरक्षणाला संमती, घटनापीठातील पाच पैकी चार न्यायमूर्तींकडून आरक्षण मान्य

EWSReservation : आर्थिक आरक्षण घटनाविरोधी नाही, न्यायमूर्ती माहेश्वरी यांची टिप्पणी 

#EWSReservation : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 10 टक्के आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठसमोर सुनावणी


आर्थिक आरक्षण घटनाविरोधी नाही, न्यायमूर्ती माहेश्वरी यांची टिप्पणी 


न्यायमूर्ती बेला त्रिवेदी या देखील न्यायमूर्ती माहेश्वरी यांच्या मताशी सहमत

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ रुग्णालयात दाखल

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांना आज सकाळी बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. व्हायरल इन्फेक्शनमुळे रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  आज संध्याकाळीचं रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणारं आहे. 

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात 30 हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामाच्या पेरणीचा अंदाज

Nandurbar News : नंदुरबार  जिल्ह्यात यावर्षी झालेला चांगला पाऊस यामुळे रब्बी हंगामाच्या पेरणी क्षेत्रात वाढ होण्याच्या अंदाज कृषी विभागाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.  जिल्ह्यात 30 हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावररब्बी हंगामाची पेरणीचा अंदाज कृषी विभागाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. या वर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे गव्हाच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. शहादा नंदुरबार आणि तळोदा तालुक्यात रब्बीचे क्षेत्र यावर्षी वाढणार असल्याचा अंदाज कृषी विभाग व्यक्त करत असला तरी सिंचनाच्या सुविधा अजून उपलब्ध झाल्या तर रब्बीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होईल. तर दुसरीकडे कृषी विभागाच्या वतीने रब्बी हंगामाची तयारी पूर्ण करण्यात आली असून खते आणि बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जिल्ह्यात 18 ते 19 हजार हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नोव्हेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यातील रब्बी हंगामाची पेरणी पूर्ण होईल, असा  कृषी विभागाच्या वतीने व्यक्त केला गेला आहे

Parbhani News:  पुर्णा नदीपात्रात महसूल पथकाची कारवाई, अवैध वाळू उपसा करणारे 8 तराफे केले नष्ट

Parbhani News:  परभणीच्या पुर्णा तालुक्यातील राहाटी शिवारात पुर्णा नदीपात्रात सुरू असलेला अवैध वाळू उपसा महसूल पथकाने थांबवला असून अवैध वाळू उपसा करणारे 8 तराफे नष्ट करण्यात आले आहे.उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांच्यासह तहसीलदार,मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्या संयुक्त पथकाने या परिसरात स्थळ पंचनामा केला असता त्यांना तराफ्या द्वारे अवैध वाळू उपसा केला जात असल्याचे निदर्शनास आल्याने या पथकाने 8 ही तराफे जाळून नष्ट केले आहेत..

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. सकाळी साडे दहा वाजता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती डॉ. प्रतीत समदानी यांनी 'एबीपी माझा'ला दिली. मागील आठ दिवसांपासून शरद पवार यांच्यावर मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पालघरमधील जव्हार-सिल्वासा रोडवर दोन एसटी बसचा भीषण अपघात, 20 ते 25 प्रवासी जखमी

Palghar News : पालघर जिल्ह्यातील जव्हार-सिल्वासा रोडवर दोन एसटी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात 20 ते 25 प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. नाशिक सिल्वासा आणि जळगाव सिल्वासा या दोन्ही बसची धोकादायक वळणावर समोरासमोर धडक होऊन अपघात घडला. जखमींवर जव्हारमधील कुटीर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.



नंदुरबार जिल्ह्यात केळी काढणीला वेग, केळीला चांगला दर मिळत असल्याने शेतकरी समाधानी

Nandurbar News : उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात केळीचे उत्पादन घेतले जात असते. जळगाव आणि नंदुरबार जिल्हा प्रामुख्याने केळी उत्पादक जिल्हे म्हणून ओळखले जातात. गेल्या दोन वर्षात केळी दरामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र आता केळीला चांगले दर मिळत असल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधान असून. जिल्ह्यात केळी काढणीला वेग आला आहे. नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निर्यातक्षम केळीचे उत्पादन घेतले जात असून उत्तर भारतातील व्यापारी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे केळीच्या काढणीला वेग आला आहे. जिल्ह्यातून परराज्यात आणि प्रदेशात केळी पाठवण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना चांगला दर मिळत आहे. यावर्षी केळीला चांगला दर मिळत असल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

रत्नागिरीच्या सागरी हद्दीत मासळीचा दुष्काळ; समुद्री प्रदूषण, बिघडलेल्या वातावरणामुळे ऑक्टोबरमध्ये दक्षिणेकडून होणारं माशांचं स्थलांतर थांबल्याचा अंदाज

Ratnagiri News : दक्षिणेच्या समुद्रातील मासा दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात कोकण किनारपट्टीकडे स्थलांतरित होत असतो. त्याचा परिणाम या महिन्यात रत्नागिरीच्या मच्छिमारांना चांगली मासळी मिळत असते. परंतु महिन्याभरापूर्वी तेलवाहू जहाज बुडून त्याचा तवंग गोव्याकडून सिंधुदुर्गच्या समुद्रापर्यंत पसरल्याने दक्षिणेकडून येणारे मासे रत्नागिरी जिल्ह्याच्या दिशेने स्थलांतरित होत नसल्याचा अनुमान येथील मच्छिमारांनी वर्तवला आहे. त्याचबरोबर थंडीही कमी झाल्याने मासळीचा तुटवडा सध्या जाणवत असल्याने येथील मच्छिमार गलितगात्र झाले आहेत.

Babanrao Lonikar:  राजेश टोपेंमुळे तीन लाख लोकांचा मृत्यू झाला, बबनराव लोणीकरांचा गंभीर आरोप

Babanrao Lonikar:  भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.  माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यावर बबनराव लोणीकर यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. कोरोनामुळे लाखो लोकांनी आपला जीव गमावला. या सर्वांच्या मृत्यूला राजेश टोपे जबाबदार असल्याचा खळबळजनक दावा बबनराव लोणीकर यांनी केलाय.

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील विठ्ठल भक्तीत दंग

Pune News : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज आपल्या कोथरुड मतदारसंघातील कर्वेनगर येथील विठ्ठल मंदिरात आयोजित काकड आरतीला उपस्थिती लावली. यावेळी मृदंगाच्या तालावर आणि विठ्ठलाच्या नामघोषात तल्लीन झाले.

आदित्य ठाकरे यांचा बुलढाणा दौरा, शेतकऱ्यांशी संवाद साधणार; सभेला परवानगी नाकारल्याने शिवसैनिकांकडून केवळ स्वागत स्वीकारणार

Aaditya Thackeray Buldhana Visit : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचा आज बुलढाणा दौरा आहे. आज दुपारी आदित्य ठाकरे हे जिल्ह्यातील मेहकर येथे शेतकरी आणि कार्यकर्त्यांची एक सभा घेऊन नंतर बुलढाणा तालुक्यातील मढ फाटा येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्या बुलढाणा येथील सभेला परवानगी नाकारल्यानंतर त्यांच्या या दौऱ्यात बदल करण्यात आला आहे. आता आदित्य ठाकरे बुलढाण्यातील शिवसैनिकांचं फक्त स्वागत स्वीकारणार आहेत.

वीकेंडला गुहागर समुद्रकिनारा हाऊसफुल

 दिवाळीच्या सुट्टीनिमित्त काल गुहागरमधील समुद्र किनारा पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाला होता. या ठिकाणी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती.. 

Jitendra Awhad: ऐतिहासिक सिनेमांबाबत संभाजीराजेंनी घेतलेल्या भूमिकेला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा

Jitendra Awhad:  ऐतिहासिक सिनेमांबाबत शिवाजी महाराजांचे वारसदार संभाजीराजेंनी घेतलेल्या भूमिकेला राष्ट्रवादी काँग्रेसनं पाठिंबा दिलाय. सिनेमॅटिक लिबर्टीच्या
नावाखाली इतिहासाचं विकृतीकरण होऊ देणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादीच्या चित्रपट विभागानं घेतलीय. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही संभाजीराजेेंच्या भूमिकेचं स्वागत केलंय. शिवरायांचा चुकीचा इतिहास मांडण्याची परंपरा बाबासाहेब पुरंदरे यांनी सुरु केली, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केलीय. 





Andheri Gokhale Bridge : मुंबईत अंधेरीमधील गोखले पूल आजपासून बंद, पर्यायी वाहतुकीसाठी सहा मार्गांची व्यवस्था

Andheri Gokhale Bridge :  मुंबईत अंधेरी इथे पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय.. धोकादायक असल्यामुळे मुंबई महापालिकेने हा पूल बंद करण्याचं पत्र वाहतूक पोलिसांना दिलं होतं. पश्चिम द्रुतगती मार्गाला जोडणारा हा पूल आहे.. पूल वाहतुकीसाठी बंद झाल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.. पर्यायी वाहतुकीसाठी सहा मार्गांची व्यवस्था करण्यात आलीय.. पुनर्बांधणीसाठी हा पूल किमान दोन वर्षे सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी सुचवलेल्या पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पालिकेनं केलंय.


पर्यायी मार्ग कोणता? वाचा सविस्तर


https://marathi.abplive.com/news/mumbai/mumbai-traffic-news-update-gokhale-bridge-andheri-connector-shut-from-monday-7th-november-2022-for-vehicle-know-about-alternate-routes-for-motorists-1117630 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


 मशाल हाती घेऊन आज राहुल गांधींची महाराष्ट्रात एन्ट्री


काँग्रेसची भारत जोडो यात्रा आज महाराष्ट्रात दाखल होणार आहे. राहुल गांधींच्या महाराष्ट्रातल्या भारत जोडो यात्रेसंदर्भात महाराष्ट्र काँग्रेसनं कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे.   नांदेड, देगलूरसह अन्य ठिकाणी यात्रेची जोरदार तयारी करण्यात आली आहे.  महाराष्ट्रातील देगलूर या ठिकाणी आज संध्याकाळी 7:30 वाजता पोहचेल. तेलंगणा,कर्नाटक महाराष्ट्राच्या वेशिवरील मदनूर याठिकाणी तीन राज्यातील काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते भारत जोडो यात्रेचे या दरम्यान जंगी स्वागत करतील. देगलूर येथील शिवाजी चौकातून 50 हजार कार्यकर्त्यांच्या जनसमुदायात हातात मशाल घेऊन राहुल गांधी ही यात्रा पुढे मार्गक्रमण करेल.


 केंद्र सरकारने दिलेल्या आर्थिक आरक्षणासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात निकाल


केंद्र सरकारनं दिलेल्या आर्थिक आरक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयात आज निर्णय होणार आहे. सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींचं घटनापीठ याबाबत निकाल देणार आहे. 103 वी घटनादुरुस्ती करून केंद्र सरकारनं दिलेलं हे आरक्षण वैध आहे की नाही याचा फैसला सुप्रीम कोर्ट करणार असल्यानं या निर्णयाला ऐतिहासिक महत्त्व आहे. विशेष म्हणजे हा निर्णय देताना वेगवेगळी निकालपत्रं दिली जाणार असल्यानं निकालाची उत्सुकता आणखी वाढली आहे.


औरंगाबादच्या सिल्लोडमध्ये आज आजी-माजी मुख्यमंत्र्यांच्या पुत्रांची तोफ धडाडणार


शिवसेनेत (Shivsena) झालेल्या बंडानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट सतत एकमेकांवर टीका करतांना पाहायला मिळतात. मात्र पहिल्यांदाच दोन्ही गटाच्या प्रमुखांचे पुत्र आमने-सामने येणार आहे. विशेष म्हणजे दिवस एकच, मतदारसंघ सुद्धा एकच आणि कार्यक्रमाचा वेळ देखील एकच असणार आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे पुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे पुत्र आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आज औरंगाबादच्या (Aurangabad) सिल्लोड दौऱ्यावर असणार आहे. या दोन्ही युवा नेत्यांची एकमेकांविरोधात तोफ धडाडणार आहे. 


मुंबईतील अंधेरीतील गोखले रोड पूल आजपासून बंद 


 मुंबईचा अंधेरी पूर्व ते पश्चिमला जोडणारा मुख्य मार्ग गोखले ब्रीज आजपासून वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. गोखले ब्रीज हा धोकादायक असल्यामुळे मुंबई महानगरपालिकेने वाहतूक पोलिसांकडे बंद करण्याचा पत्र दिलं होतं.  मुंबई वाहतूक पोलिसांनी रविवारी रात्री बारा वाजेपासून गोखले पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला आहे.  सध्या नागरिकांना पर्यायी मार्ग म्हणून कॅप्टन गोरे ब्रीज, मिलन सबवे, खार सबवे ,ठाकरे उड्डाणपूल, अंधेरी सबवे  देण्यात आला आहे.


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.