Maharashtra Guardian Minister List : राज्याच्या पालकमंत्रिपदावरुन महायुतीतील नाराजी समोर येताना दिसली आहे. त्यातच रायगड नाशिकसह अन्य जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदावरुन महायुतीत मतभेद दिसत आहेत. अशातच हे वाद होत असतांना भेटीगाठींचा सिलसिला देखील वाढला आहे. तर दुसरीकडे शिवसेनेनंतर आता पालकमंत्रीपद वाटपावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही धुसफूस असल्याचे पुढे आले आहे. स्वजिल्हे किंवा शेजारचे जिल्हे न देता शेकडो किलोमीटर दूरवरचे जिल्हे दिल्याने राष्ट्रवादीतील मंत्र्यांमध्ये नाराजी सुर असल्याचे पुढे आले आहे. 


पवारांनी स्वत:पुरते तर सुनील तटकरेंनी लेकीपुरते पाहिले


दरम्यान, अजित पवारांनी स्वत:पुरते आणि सुनील तटकरे यांनी लेकीपुरते पाहिले, परंतु पक्षातील इतर मंत्र्यांना त्यांचे जिल्हे मिळविण्यासाठी प्रयत्न केले नसल्याची भावना राष्ट्रवादीतील काही नेत्यांची असल्याची माहिती पुढे आली आहे. भाजप आणि शिवसेनेच्या तुलनेत राष्ट्रवादीतील मंत्र्यांना स्वजिल्हे देण्याचे प्रमाण सर्वात कमी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केवळ उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच तेवढे स्वजिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाले आहे, तर इतर सर्वांना बाहेरचे जिल्हे मिळाल्याचे ही पुढे आले आहे. 


भाजपला 20 पैकी 7, तर शिवसेनेला 12 पैकी 7 मंत्र्यांना स्वजिल्ह्याचे पालकमंत्री


भाजपच्या 20 पैकी 7 आणि शिवसेनेच्या 12 पैकी 7 मंत्र्यांना स्वजिल्ह्याचे पालकमंत्रीपद दिले गेले आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या 10 पैकी केवळ एक म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवारांना स्वजिल्हा मिळाला आहे. तर आदिती तटकरेंना स्वजिल्हा मिळाला होता, त्यावर आता स्थगिती आलीय.


राष्ट्रवादीच्या कुणाला किती लांबवरचा जिल्हा मिळालाय?


१.कोल्हापूरचे हसन मुश्रीफ यांना ६२५ किमी लांब असलेला वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाले आह
२.नाशिकच्या माणिकराव कोकाटेंना १९५ किमीवरचा नंदूरबार जिल्हा मिळाला
३.साता-याचे मकरंद पाटील यांना ४४० किमीवरचा बुलढाणा जिल्हा दिला गेलाय
४.नाशिकच्या नरहरी झिरवाळ यांना ४४५ किमीवरचा हिंगोली जिल्हा दिला गेलाय
५.लातूरच्या बाबासाहेब पाटील यांना ६३६ किमीवरचा गोंदिया जिल्हा दिला गेलाय


स्वजिल्हे मिळालेले मंत्री


भाजप


१.चंद्रशेखर बावनकुळे -नागपूर
२.राधाकृष्ण विखे पाटील-अहिल्यानगर
३.आशिष शेलार-मुंबई उपनगर
४.जयकुमार रावल-धुळे
५.निलेश राणे-सिंधुदूर्ग
६.पंकज भोयर-वर्धा
७.मेघना बोर्डीकर-परभणी


शिवसेना


१.एकनाथ शिंदे-ठाणे
२.गुलाबराव पाटील-जळगाव
३.संजय राठोड-यवतमाळ
४.उदय सामंत-रत्नागिरी
५.संजय शिरसाठ-संभाजीनगर
६.शंभुराज देसाई-सातारा
७.प्रकाश आबिटकर-कोल्हापूर


राष्ट्रवादी काँग्रेस


१.अजित पवार-पुणे


पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाल्यानंतर लगेच २४ तासांच्या आत रायगड आणि नाशिकचं पालकमंत्री पद रद्द करण्यात आलं आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये दोन्ही जिल्ह्यांवरुन महायुतीत मिठाचा खडा पडल्याचं चित्र आहे. शिवसेनेकडून रायगड आणि नाशिकचं पालकमंत्री पद मिळावं यासाठी आग्रही मागणी होताना दिसत असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज रायगडमधील शिवसेनेचे नाराज आमदार भेट घेणार आहेत. भरत गोगावले यांनाच पालकमंत्री करा अशी आग्रही मागणी समोर येताना दिसत आहे. अशात, भाजप आणि राष्ट्रवादी मात्र यात कोंडीत सापडल्याचे चित्र आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या