अहमदनगर : पारनेर तालुक्यातील देवीभोयरे येथील पारनेर सहकारी साखर कारखाना (Parner Sugar Factory) विक्री प्रकरणात गैरव्यवहार करणाऱ्या क्रांती शुगर या खासगी कंपनीचे नऊ संचालक आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे दोन वरिष्ठ अधिकारी यांच्याविरुद्ध पाच दिवसांपूर्वी पारनेर पोलीस ठाण्यात (Parner Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पारनेर तालुक्यातील सुमारे 17 हजार सभासदांच्या मालकीच्या सहकारी साखर कारखान्याचे खासगीकरण संबंधित आहे. या गुन्ह्यातील घोटाळ्याची व्याप्ती सुमारे 300 ते 400 कोटी रुपयांच्या पेक्षाही अधिक असून या गुन्ह्याचा सखोल तपास होण्यासाठी एसआयटीची नेमणूक करावी अशी मागणी साखर कारखाना बचाव समिती आणि शेतकऱ्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे. अन्यथा पारनेर पोलीस स्टेशन समोर  27 जानेवारीपासून आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, देवीभोयरे येथील पारनेर सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता विक्री करण्यासाठी राज्य सहकारी बँकेने साडेचौदा कोटी रुपये कर्जाचे एक बनावट गहाणखत तयार करून कारखान्यावर कर्जाचा फुगवटा निर्माण केला होता. विक्रीची बेकायदा प्रक्रिया झाली होती. कारखान्याचा विक्रीसाठी केवळ पाचशे रुपये मुद्रांक शुल्क देऊन सुमारे दीड कोटी रुपयांचा महसूल बुडवला होता. ज्या तारखेला कारखान्याची विक्री केली त्याच तारखेला क्रांती शुगर या खरेदीदार कंपनीला कारखाना विकत घेण्याकरिता त्याच मालमत्तेवर गहाणखत घेऊन कर्ज पुरवठा केला होता.


सतरा हजार सभासदांच्या वतीने याचिका दाखल


कारखाना विक्रीच्या खरेदीखताला बोजा नसलेला बनावट सातबारा जोडण्यात आला. पारनेर साखर कारखान्याची मालमत्ता केवळ 32 कोटी रुपयांना विकत घेऊन त्याच मालमत्तेवर सुमारे 300 कोटी रुपयांचे कर्ज काढले. पारनेर कारखाना विक्रीच्या या सर्व गैरव्यवहारांबाबत कारखाना बचाव व पुनर्जीवन समितीने सतरा हजार सभासदांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे याचिका दाखल केली होती.


एसआयटी नेमणुकीची मागणी 


यानंतर पारनेर सहकारी साखर कारखाना बेकायदा विक्रीप्रकरणी दोषींविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश पारनेर न्यायालयाने दिले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर पारनेर पोलीस ठाण्यात क्रांती शुगर अ‍ॅण्ड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड, पुणे या खासगी साखर कारखान्याचे अध्यक्ष ज्ञानेश नवले, पांडुरंग नवले, दत्तात्रय नवले, भिकू नवले, जालिंदर नवले, गुलाब नवले, शिवराज नवले, श्रीधर नवले व निवृत्ती नवले या 9 संचालकांसह महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे तत्कालीन जनरल मॅनेजर अनंत भुईभार व वरिष्ठ अधिकारी अनिल चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आता या गुन्ह्याचा सखोल तपास होण्यासाठी एसआयटीची नेमणूक करावी अशी मागणी साखर कारखाना बचाव समिती आणि शेतकऱ्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे. अन्यथा पारनेर पोलीस स्टेशन समोर  27 जानेवारीपासून आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.


आणखी वाचा 


Nilesh Lanke : हे सरकारच शापित, महायुतीतील बडा मंत्री खासगीत बोललाय; निलेश लंकेंच्या दाव्यानं भुवया उंचावल्या!