मुंबई : दावोस येथे सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममधून महाराष्ट्रासाठी गुंतवणुकीसाठीचा पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी करण्यात आला आहे. कल्याणी समूहाकडून गडचिरोलीमध्ये पोलाद उद्योगासाठी 5,200 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. या संदर्भात कल्याणी उद्योग समूहाने महाराष्ट्र शासनासोबत सामंजस्य करार केला आहे. 


कल्याणी समूह आणि महाराष्ट्र राज्य शासनामध्ये स्टील आणि संरक्षण क्षेत्रात करार करण्यात आला आहे. या माध्यमातून पोलाद उद्योगासाठी 5 हजार 200 कोटी रुपयांची गुंतवणूक गडचिरोलीत केली जाणार आहे. त्यामाध्यमातून 4 हजार रोजगार निर्मिती होणार आहे. कल्याणी समूहाचे प्रमुख अमित कल्याणी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत हा करार केला आहे. 


स्वित्झर्लंडमध्ये दावोस येथे होत असलेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत. यंदा भारताने आपले सर्वांत मोठे शिष्टमंडळ त्यासाठी पाठवले असून ही बैठक पाच दिवस चालेल


दावोसमध्ये महाराष्ट्र पॅव्हेलियन सज्ज


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे संस्थापक अध्यक्ष क्लॉस श्वाब यांची भेट घेतली. हरित ऊर्जा, ईलेक्ट्रीक व्हेईकल, उद्योग जगतातील अनेक नवीन घडामोडींवर या दोघांमध्ये यावेळी चर्चा झाली. महाराष्ट्राच्या विकासभरारीला त्यांनी यावेळी शुभेच्छाही दिल्या.


दावोसमध्ये महाराष्ट्र पॅव्हेलियन आता सज्ज झाले असून, पुढचे दोन दिवस भरगच्च कार्यक्रमांचे असणार आहेत. महाराष्ट्रासाठी विक्रमी सामंजस्य करार यात होणार आहेत आणि विविध कंपन्यांसोबत बैठकाही होणार आहेत.


गेल्या वर्षीच्या गणेशोत्सवात क्लॉस श्वाब हे एका बैठकीसाठी मुंबईत आले होते. त्यावेळी 12 सप्टेंबर रोजी सपत्नीक त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी येऊन श्रीगणेशाची आरती केली होती. या भेटीत त्या आठवणीलाही उजाळा देण्यात आला. या बैठकीने आज देवेंद्र फडणवीस यांच्या दावोसमधील भेटी, बैठकांचा श्रीगणेशा झाला.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी होरॅसिसचे अध्यक्ष फ्रँक जर्गन रिक्टर यांचीही भेट घेतली. फ्रँक हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे माजी संचालक सुद्धा आहेत. येणार्‍या काळात मुंबईत जागतिक कंपन्यांची एक परिषद आयोजित करण्यासाठी त्यांनी यावेळी पुढाकार दर्शविला. नवीन तंत्रज्ञान, नाविन्य यावर भर देताना असे आयोजन राज्य सरकारसोबत सहकार्याने करण्याबाबत तसेच होरॅसिसचे मुंबईत मुख्यालय असण्याबाबत सुद्धा यावेळी प्राथमिक चर्चा झाली.


ही बातमी वाचा :