Maharashtra News Live Updates : शिंदे सरकारने महाविकास आघाडीच्या महत्वाच्या नेत्यांची सुरक्षा काढली, मिलिंद नार्वेकरांच्या सुरक्षेत मात्र वाढ

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा ब्युरो Last Updated: 28 Oct 2022 11:22 PM
दिल्ली विमानतळावर इंडिंगो विमानाचं इमर्जन्सी लँडिंग

दिल्लीवरुन बेंगळुरुला जाणाऱ्या इंडिगो विमानाचं दिल्ली विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं आहे. बेंगळुरुला जाणाऱ्या विमानाला आग लागल्याचं लक्षात येताच दिल्लीमध्ये लँगिंग करण्यात आलं.  

गोरेगाव पूर्वत आरे कॉलनी परिसरामध्ये बिबट्याचा वावर 

आरे कॉलनी 20 नंबर युनिट मध्ये असलेल्या पिकनिक पॉईंटजवळ पुन्हा बिबट्याचं दर्शन झालं आहे. 

हा सर्वस्वी सरकारचा निर्णय - वरुण सरदेसाई

सुरक्षा कोणाला द्यायची कोणाला नाही हा सर्वस्वी सरकारचा निर्णय असतो. मात्र विरोधकांची सुरक्षा काढायची हा एककलमी कार्यक्रम राबविणे योग्य नाही. राज्यापुढे अनेक गंभीर प्रश्न आहेत त्याकडे सरकारने आधी लक्ष द्यावे, वरुण सरदेसाई म्हणाले.

अजितदादा यांची सुरक्षा कपात करणे म्हणजे अघोषित हुकूमशाही, सुरक्षा जी होती तीच कायम ठेवावी... सचिन खरात

शिंदे आणि फडणवीस सरकारने महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते माननीय अजितदादा पवार यांच्या सुरक्षेत कपात केल्याचे समजत आहे. आदरणीय अजितदादा हे महाराष्ट्र राज्याचे मुख्य नेते आहेत तसेच अजितदादा माजी उपमुख्यमंत्री, विधिमंडळ नेते होते तरीसुद्धा आदरणीय अजितदादा यांच्या सुरक्षेत कपात करणे म्हणजे अघोषित हुकूमशाही आहे म्हणून राज्य सरकारला प्रश्न विचारात आहे. आपण सर्व प्रकल्प गुजरातला जाऊ दिले परंतु आता आपण महाराष्ट्र राज्यातील नेत्यांची सुरक्षा काढून गुजरात मधील नेत्यांना देणार आहे का ? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्ष माननीय मुख्यमंत्री यांना मागणी करत आहे, असे सचिन खरात म्हणाले.

तांत्रिक बिघाडामुळे वर्धा -आर्वी -वरूड बसचा अपघात, सुदैवाने मोठा अनर्थ टळला

वर्धा - आर्वी डेपो येथील बस वर्धेवरून वरुडला निघाली असता  येळाकेळी नदी पुलावरुन जात असताना तांत्रिक बिघाडामुळे एसटी बसचा अपघात झाला. सुदैवाने  प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना आज रात्रीच्या सुमारास येळाकेळी नवीन पुलावर घडली. बसमधील सर्व प्रवासी सुखरुप आहेत. मात्र,चालकास दुखापत झाली असून उपचाराकरिता शासकीय रुग्णालयात हलविण्यात आलं. बसमध्ये बिघाड झाल्याने बस चालकाचं नियंत्रण सुटलं आणि बस सिमेंट कठड्याच्या दिशेने गेली. मात्र, चालकाच्या सतर्कतेमुळे ही बस पुलावर असलेल्या कठड्यावर धडकल्याने मोठा अनर्थ टळला आहे. या बसमध्ये पन्नासच्या वर प्रवासी होते. जर या पुलाला सिमेंटबॅरिकेटिंग  कठडे नसते तर बस नदीत कोसळली असती. बस चालकानेही सतर्कता दाखवल्यामुळे  प्रवाशांचा जीव वाचला आहे.

शिंदे सरकारने महाविकास आघाडीच्या महत्वाच्या नेत्यांची सुरक्षा काढली, मिलिंद नार्वेकरांच्या सुरक्षेत मात्र वाढ

शिंदे सरकारने महाविकास आघाडीच्या महत्वाच्या नेत्यांची सुरक्षा काढली आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांची सुरक्षा कायम असून शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत मात्र वाढ करण्यात आली आहे. 

शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून उस्मानाबाद बंदचे आवाहन

आमदार कैलास पाटील यांचं पाच दिवसापासून उपोषण सुरु आहे. अद्याप प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने उद्या उस्मानाबाद बंद चे आवाहन करण्यात आले आहे. 

एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवास स्थनासमोर युवक काँग्रेसचं आंदोलन

टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर नागपुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रामगिरी या शासकीय निवास स्थनासमोर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.


एकनाथ शिंदे हे गुजरातचे मुख्यमंत्री अशा पद्धतीचा फलक लावत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं.
 
आंदोलन सुरू होताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.


युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत (माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे पुत्र) यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.


प्रकल्प पळवणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नसून गुजरात चे मुख्यमंत्री आहे अशा पद्धतीच्या घोषणा देत फलक लावण्याचा प्रयत्न केले असता पोलिसांनी लागलीच ते फलक फाडून टाकत आंदोलकांना ताब्यात घेतले.

उध्दव ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील अमरण उपोषणाला

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ही 2020 चा पीक विमा बजाज अलाईन्स कंपनी देत नसल्यामुळे गेल्या पाच दिवसापासून शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील अमरण उपोषणाला बसले आहेत. आज त्यांची सकाळी वैद्यकीय पथकाने तपासणी केली असता. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लाकाळ यांनी माध्यमांशी बोलताना आमदार कैलास पाटील यांचे पाच किलो वजन कमी झाले असून त्याच्या शरीरातील किटनेस कमी झाले आहे. त्यामुळे यांची प्रकृती बिघडत असल्याचे सांगितले. हे आंदोलन आक्रमक करण्यासाठी रस्ता रोको, मातीत गाढुन घेने, त्याचबरोबर शुक्रवारी सकाळी कांही शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर चढले. तर पाडोळी परिसरात कांही शेतकऱ्यांनी नदीत उतरून नदीच्या पाण्यात उतरून पीक विम्याबाबत घोषणाबाजी केली. त्यामुळे प्रशासन सतर्क होऊन जिल्हाधिकारी यांनी आमदार कैलास पाटील यांची आंदोलनस्थळी जाऊन भेट घेऊन चर्चा केली. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर, माजी नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर, संपर्क नेते शंकरराव बोरकर आदी उपस्थित होते.

ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी राष्ट्रवादीचे आमदार चंद्रकांत यांचं आंदोलन

यावर्षी हिंगोली जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस काळ झाला आहे, त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांची संपूर्ण पीक या पावसामुळे उध्वस्त झाले आहेत  त्यामुळे जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी राष्ट्रवादीचे आमदार चंद्रकांत उर्फ राजू भैया नवघरे यांच्या नेतृत्वामध्ये शेकडो शेतकऱ्यांचा मोर्चा हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर करण्यात आला होता हिंगोली शहरातून निघालेल्या या मोर्चामध्ये शेकडो शेतकरी सहभागी झाले होते   ओला दुष्काळ जाहिर करा या आणि अन्य मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.

अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल, आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी तक्रार

अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी महिला मुक्ती मोर्चा संघटनेकडून बच्चू कडू यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली. त्यानंतर त्यांच्यावर राजापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. 

तर उरलेले आमदार उद्धव ठाकरेकडे जातील - जयंत पाटील

मंत्रीमंडळ विस्तार केला तर उरलेले आमदार उद्धव ठाकरेकडे निघून जातील असे लोक सांगतात, असे जयंत पाटील म्हणाले. उपमुख्यमंत्री यांनी लवकरच विस्तार करू असे म्हटले पण मुख्यमंत्री यांनी घोषणा केली तरच ती खरी मानली जाते, असेही पाटील म्हणाले. 

महाबळेश्वर मेढा रोडवर अपघात, दोन जणांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर मेढा रोडवर झायलो कार आणि दुचाकी समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये दुचाकीवरील दोन जण जागीच ठार तर झायलो गाडी पलटी झाल्याने चार जखमी झाले आहेत.  

Shirdi News : सलग सुट्ट्यांमुळे साईनगरीत गर्दी; हॉटेल फुल्ल तर रस्त्यावर वाहनांच्या रांगाच रांगा

Shirdi News : दिवाळीच्या सलग सुट्ट्यांमुळे शिर्डीत भाविकांची गर्दी वाढली असून दर्शनासाठी भक्तांची मोठी मांदियाळी दिसून येत आहे. शिर्डीतील रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या असून भक्तनिवासासह अनेक हॉटेल आज फुल्ल झाले आहेत. साईनगरीत साईनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेली आहे. उद्या शनिवार आणि रविवार जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे भक्तांची गर्दी अजून वाढणार आहे. भाविकांचे दर्शन सुखकर व्हावे यासाठी विशेष उपाययोजना साईबाबा संस्थानाने केली असून दर्शनपास काऊंटर बंद केल्याने भक्तांचे दर्शन अधिक सुखकर झाले आहे.

नंदुरबारमध्ये होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या सभेची तयारी अंतिम टप्प्यात, शिंदे गटाचे अर्धा डझनपेक्षा जास्त मंत्री दौऱ्यावर
Nandurbar News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या उपस्थितीत नंदुरबार नगरपालिकेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन होणार आहे. सत्तासंघर्षानंतर बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गटाचा उत्तर महाराष्ट्रातला पहिला मेळावा मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत होत आहे. या मेळाव्याचे उत्तर महाराष्ट्रात प्रचंड आकर्षण असून या मेळाव्यासाठी जवळपास 25 हजारांपेक्षा अधिक लोक येतील, अशी व्यवस्था आयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे. कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात असून प्रशासनाच्या वतीने ही दौऱ्याची तयारी केली जात आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीने सभास्थळी मोठा बंदोबस्त ठेवण्यात येत असून एक पोलीस अधीक्षक, एक अप्पर पोलीस अधीक्षक सात दिवस, 16 पोलीस निरीक्षक, 46 पोलीस उपनिरीक्षक आणि 643 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. दौरा यशस्वी करण्यासाठी शिंदे गटाच्या वतीने सर्वच तयारी केली असल्याची माहिती शिंदे गटाचे नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली आहे.

 
सलगच्या सुट्ट्यांमुळे साईनगरीत गर्दी, हॉटेल फुल्ल तर रस्त्यावर वाहनांच्या रांगा

Shirdi News : दिवाळीच्या सलग सुट्ट्यांमुळे शिर्डीत भाविकांची गर्दी वाढली असून दर्शनासाठी भक्तांची मोठी मांदियाळी दिसून येत आहे. शिर्डीतील रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या असून भक्तनिवासासह अनेक हॉटेल आज फुल्ल झाले असून साईनगरी साईनामच्या जयघोषाने दुमदुमून गेली आहे. उद्या शनिवार आणि रविवार जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे भक्तांची गर्दी अजून वाढणार आहे. भाविकांचे दर्शन सुखकर व्हावे यासाठी विशेष उपाययोजना साईबाबा संस्थानने केल्या असून दर्शनपास काऊंटर बंद केल्याने भक्तांचे दर्शन अधिक सुखकर झाले आहे.

Sangli Miraj Police Action : बिबट्याचे कातडे, सांबरची दोन शिंगे असा 28 लाखाचा मुद्देमालासह तस्कर जेरबंद

बिबट्याची कातडी, सांबरशिंगे आणि खवल्या मांजराची खवले यांची तस्करी करणार्‍या एका टोळीचा छडा लावत सुमारे 28 लाखांचे वन्य प्राण्यांचे अवयव मिरजेत पोलीसांनी जप्त केलेत. तस्करी करणारा एकजण पोलीस आणि वन विभागाच्या सापळ्यात अडकला असून एक जण फरार झाला आहे. संरक्षित वन्य प्राण्यांचे अवयव बाळगणे, विक्री करण्याचा प्रयत्न करणे या प्रकरणी अशोक सदाशिव कदम (वय 55 रा. कदमवाडी, पोस्ट केजीवडे, ग्रामपंंचायत हासणे, ता. राधानगरी) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून पूर्ण वाढीच्या एक लाखाचे बिबट्याचे हळद, मीठ लावलेले चमडे, पन्नास हजार मुल्याची दोन सांबरशिंगे आणि अत्यंत दुर्मिळ समजल्या जात असलेल्या खवल्या मांजराची दहा लाखाचे 18 किलो खवले जप्त करण्यात आली.

WASHIM VIJ JODNI : निधीअभावी कृषीपंपाची वीजजोडणी रखडली, आठ हजार कृषी पंपधारक वीजजोडणीच्या प्रतीक्षेत

राज्य सरकारकडून शेतकऱ्यांचं जीवनमान उंचवण्या साठी विविध उपक्रम राबविले जात आहे, मात्र दुसरीकडे वाशिम जिल्ह्यात 8000 कृषीपंपाची जोडणी रखडली आहे. महावितरण कंपनीकडे वीजजोडणीसाठी अर्ज करून ही वीज मिळेना. परिणामी पाऊस भरपूर होऊनही वीजजोडणी प्रलंबित आहे. महावितरण कंपनीकडे निधी नसल्याने नवीन वीज जोडणी रखडली होती. मात्र आता महावितरण कंपनीकडे राज्य सरकारकडून निधी मंजूर झाल्यानंतर आता लवकर वीजजोडणी केल्या जाणार असल्याची माहिती आहे.  

Beed Road Protest : यम है हम... यमाचा पोशाख घालून रस्त्यासाठी आंदोलन
बीड शहरातल्या रस्त्यावर अवतरले यमराज..बायपासवर उड्डाणपूल आणि खड्डे बुजवण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्यांचं यमाचा पोशाख घालून आंदोलन केलं आहे. बीड शहराजवळ असलेल्या दोन्ही बायपास वर उड्डाणपूल हवेत आणि बीड शहरातील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यात यावे यासाठी सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे यांनी यमाचा पोशाख घालून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून तर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत खड्डे पडलेल्या रस्त्यावर चालून आंदोलन केलं.
वाशिम जिल्ह्यात मोकाट गुरांना होतेय लम्पीची लागण; वर नियंत्रण मिळणे होतय कठीण

वाशिम जिल्ह्यात जनावरांवरील 'लम्पी' आजाराची व्याप्ती वाढत चालली असून, आठवडाभरापूर्वी 88 गावांतील दीड हजार जनावरांना या आजाराचा संसर्ग होऊन 73 जनावरांचा मृत्यू झाला. आता शहरी भागात फिरणाऱ्या मोकाट पाळीव गुरांनाही या आजाराची लागण होत असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. या गुरांवर उपचाराच्या कोणत्याही उपाययोजना करण्याबाबत स्थानिक स्वराज्य संस्था उदासीन आहेत.जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास दीड लाख जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे, तर उपचारातून 300 पेक्षा अधिक गुरे लम्पीमुक्तही झाली आहेत. हा घरच्या पाळीव गुरांचा आकडा असला तरी जिल्ह्यात मोकाट गुरांची संख्या लक्षणीय असून, त्यांना लसीकरण करणार कोण, असा प्रश्न आहे.


 
पुरंदर जेऊर येथे युवकांनी दिले हरणाला जीवदान


 

















पुरंदर तालुक्यातील जेऊर येथे युवकांनी एका हरणाला जीवदान दिले आहे. कुत्र्याच्या तावडीतून हरणाची सुटका करण्यात या मुलांना यश आले आहे. या हरणाला आता वनविभागाच्या ताब्यात देण्यात येणार आहे  जेऊर येथील प्रज्वल प्रकाश जाधव श्रावणी विजय जाधव, श्रावण विजय जाधव आणि विजय जाधव हे शेतात काम करीत होते. यावेळी जिवाच्या आकांताने ओरडणाऱ्या हरणाचा आवाज त्यांना आला. त्यांनी आवाजाच्या दिशेने पहिले असता दोन कुत्री त्या हरणाला मारत असल्याचे त्यांना दिसले त्यानंतर त्यांनी मोठ्या प्रयत्नाने हरणाला कुत्र्यांच्या तावडीतून सोडवले. यानंतर  त्यांनी वनविभागाला फोन करून याबाबतची माहिती दिली आहे या हरणाला ते वनविभागाच्या ताब्यात देणार आहेत. या युवकांनी दाखवलेल्या धाडस बद्दल त्यांचं ग्रामस्थांनी कौतुक केलंय.














Wardha : भारत जोडो पदयात्रा वर्ध्यात येणार नसल्याने अस्वस्थता 

वर्धा जिल्हा राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी आहे आणि..सध्या देशात निर्माण झालेले असहिष्णू वातावरण बद्लवण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा प्रारंभ झाली आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यात ही यात्रा महाराष्ट्रात येणार असून 3 जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार आहे मात्र महात्मा गांधींच्या विचारांनी पावन झालेल्या वर्ध्याच्या भूमीत ही यात्रा भेट देणार नसल्याने महात्मा फुले समता परिषदेचे गांधीवादी कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता दिसून येत असून त्यांनी या यात्रेने सेवाग्रामला भेट द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

परतीच्या पावसाने सोयाबीन खराब, तर बाजारपेठेत सोयाबीनला भाव नसल्याने शेतकरी दुहेरी संकटात
नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन चे उत्पन्न घेतल जात असते मात्र परतीच्या पावसामुळे सोयाबीन चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पावसात सापडल्याने सोयाबीन काळे पडले असून सोयाबीनला बाजार पेठेत 4000 ते 4300 पर्यंत दर मिळत आसल्याने अगोदर निसर्गाच्या लहरीपणाचा तर दुसरीकडे भाव पडल्याने व्यापाऱ्यांचा मनमानी असा दुहेरी फटका जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकाना बसत आहे.
Kartiki Yatra : विठ्ठल भक्तांसाठी खुशखबर , कार्तिकी यात्रेसाठी देवाचा पलंग निघाला

कार्तिकी यात्रेसाठी येणाऱ्या जास्तीत जास्त भाविकांना विठुरायाच्या दर्शनाचा लाभ देण्यासाठी आजपासून देवाचे राजोपचार बंद करून 24 तास दर्शन व्यवस्था सुरु करण्यात आली आहे. आज सकाळी अकरा वाजता विठ्ठल रुक्मिणीचा पलंग काढण्यात आला आहेत. देवाचा पलंग निघतो म्हणजेच देवाची रात्रीची विश्रांती बंद होत असते  आषाढी आणि कार्तिकी यात्रेसाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरपूर मध्ये येत असतात , यातील जास्तीतजास्त भाविकांना देवाच्या दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी मंदिर दर्शनासाठी 24 तास खुले ठेवण्याची परंपरा आहे. त्यानुसार देवाचा आणि रुक्मिणी मातेच्या शेजघरातील पलंग काढून ठेवण्यात येतो यामुळे देवाची झोप बंद होते अशी प्रथा आहे . गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे पलंग निघत होता , मंदिरही 24 तास खुले राहायचे मात्र मंदिरात भाविकांना प्रवेश नसायचा. यंदा दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त कार्तिकी यात्रा होणार असल्याने संपूर्ण यात्रा काळात आजपासून लाखो भाविकांना 24 तास दर्शन मिळणार आहे . 

Shirdi : संगमनेर विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी ग्रामपंचायतीचे क्रांतिकारी पाऊल

विधवा महिलांनाही समाजात जगताना मानसन्मान मिळावा यासाठी संगमनेर तालुक्यातील आंबीखालसा या ग्रामपंचायतीने नुकत्याच झालेल्या मासिक सभेत विधवा महिलांच्या पुनर्विवाहास 16 हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. असा निर्णय घेऊन आंबीखालसा ग्रामपंचायतीने महिला सक्षमीकरणासाठी आणखी एक क्रांतिकारक पाऊल उचलले आहे.

Tata AirBus : उद्योग मंत्र्यांनी राजीनामा द्यावा : वरूण सरदेसाई

महाराष्ट्रातील मोठे प्रकल्प इतर राज्यात जाणे ही दुर्दैवी घटना आहे. दरम्यान अगोदर फॉक्सकॉन, वेदांता आता टाटा एअर बस सारखे प्रकल्प दुसऱ्या राज्यात जात असल्याने युवकांचा खुप मोठा रोजगार गेला आहे. दरम्यान उद्योग मंत्र्यांनी ABP माझा च्या माझा कट्ट्यावर टाटा एअर बस प्रकल्प इतरत्र जाणार नाही अशी ग्वाही दिली होती. तर नोकऱ्या फक्त इतर राज्यातील तरुणांना आणि आपल्या राज्यातील तरुणांनी फक्त डॉल्बीवर नाचतच राहावं काय असा खोचक टोला लागवलाय. त्यामुळे उद्योग मंत्र्यांनी हे आपले अपयश समजून राजीनामा द्यावा अशी मागणी युवा सेनेचे नेते वरून सरदेसाई यांनी केलीय.

छोटे पप्पू म्हणत आदित्य ठाकरे यांच्यावर अब्दुल सत्तार यांची टीका 
हिंगोली जिल्ह्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी हिंगोली जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारल्यानंतर आज पहिल्यांदाच ते हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आहेत. छोटे पप्पू म्हणत अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.आदित्य ठाकरे यांनी किती दिवे लावले आहेत आणि त्यांनी मुंबईत लावलेल्या दिव्याची सुद्धा चौकशी होईल. अशी माहिती सत्तार यांनी दिली आहे. 
Tulhapur : सुट्यांमुळे तुळजापूरात श्री तुळजाभवानीच्या दर्शनार्थ भाविकांची गर्दी
दिपावली सुट्यांच्या पार्श्वभूमीवर तिर्थक्षेञ तुळजापूरात श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ भाविकांची प्रचंड गर्दी झाली आहे. श्रीतुळजाभवानी मंदीर पहाटे चार वाजता दर्शनार्थ खुले केले पहाटेपासुन देविदर्शनार्थ भाविकांनी गर्दी केली होती. आज धर्मदर्शनार्थ भाविकांना दोन ते तीन तास लागत होते. भाविकांना भरभर बाहेर काढले जात असल्याने भाविकांना तासोनतास रांगेत थांबुन ही देवीदर्शन घडत होते. खाजगी सुरक्षारक्षक माञ काही भाविकांना निवांत दर्शन घडवत होते. भाविकांचीगैरसोय टाळण्यासाठी मंदीर भाविकांची गर्दी ओसरे पर्यत पहाटे ऐकवाजता दर्शनार्थ खुले करण्याची मागणी भाविकांन मधुन केली जात आहे.

 

 
श्रीरामपूर : विविध मागण्यांसाठी लॅक्टीलीस अँड सनफ्रेश ऍग्रो कर्मचाऱ्यांचे 3 दिवसापासून आंदोलन

दिवाळी बोनस, पगाराच्या मागणीसाठी अनेक कामगारांना कामावरून कमी केल्याच्या निषेधार्थ  गेल्या 3 दिवसापासुन “शिवप्रहार प्रतिष्ठान” संघटनेच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात येत आहे.. श्रीरामपूर तालुक्यातील अग्रगण्य असलेली पूर्वाश्रमीची प्रभात डेअरी आणि आता लॅक्टीलीस अँड सनफ्रेश ऍग्रो असलेल्या कंपनीच्या कामगारांना एन दिवाळी सणात आंदोलन करम्याची वेळ आलीय.. तर प्रशासनाच्या दबावामुळे आंदोलनाची जागा सुद्धा बदलण्याची वेळ कामगारांवर आलीय...

Girish Mahajan : यापुढे वैद्यकीय शिक्षण मराठीतून मिळणार, कोण कोणत्या शाखांचा समावेश?

वैद्यकीय अभ्यासक्रम हिंदीतून उपलब्ध करून देण्याचा मध्य प्रदेश सरकारचा निर्णय ताजा असतानाच आता महाराष्ट्रातही मराठीतून वैद्यकीय शिक्षण घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. एमबीबीएससह आयुर्वेद, होमिओपॅथी, दंतचिकित्सा, नर्सिंग, फिजिओथेरपी यांसारखे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना मराठीतून उपलब्ध करून दिले जाणार आहेत. 2023 च्या शैक्षणिक वर्षांपासून हे अभ्यासक्रम मराठीतून उपलब्ध होतील. विशेष म्हणजे मराठीतून वैद्यकीयचे शिक्षण घेणे बंधनकारक राहणार नाही, ते ऐच्छिक असेल.


अधिक माहितीसाठी येथे हा व्हिडीओ पाहा.


Kolhapur Excise Officer Attack : दारूचे अड्डे उध्वस्त करायला गेलेल्या पोलिसांवर जमावाचा हल्ला
कोल्हापूर जिल्ह्याच्या हातकणंगले तालुक्यातील माणगाववाडी या ठिकाणी सुरू असलेल्या हातभट्टी दारूचे अड्डे उध्वस्त करायला गेलेल्या पोलिसांवर जमावाने हल्ला केला आहे... यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महिला अधिकारी यांच्या हाताला मार बसला आहे... उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी कारवाई करण्यासाठी घटनास्थळी पोहोचताच हातभट्टी बनवणाऱ्या जमावाने काठ्या, दगड आणि चाकूने या पथकावर हल्ला केला... हातकणंगले पोलिसांनी आता एकाला ताब्यात घेतला असून हल्ला करणाऱ्या इतरांची नावे निष्पन्न झाली आहेत...राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून संबंधित जमावावर मोका लावण्या संदर्भात प्रस्ताव देणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक रवींद्र आवळे यांनी दिली आहे
Hingoli Nukasan Pahani : अब्दुल सत्तार यांनी शेतीच्या नुकसानीची पाहणी केली 
हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार हे कालपासून हिंगोली जिल्हा दौऱ्यावर होते रात्री उशिरा त्यांनी नागेशवाडी येथे नुकसानीची पाहणी केली आहे. नागेश वाडी येथील काळुबाई माणिकराव नाईक यांच्या शेताच्या बांधावर जात कृषी विद्यापीठांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्याचबरोबर पंचनामे करण्याचे आदेश मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहेत.
पाडोळी गावात शेतकऱ्याचे जलसमाधी आंदोलन, शेतकऱ्यांनी पाण्यात टाकल्या उड्या
शेतकऱ्यांना हक्काचा 2020 चा पीक विमा मिळावा आणि अतिवृष्टी अनुदान मिळावे या मागणीसाठी शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी आमरण उपोषण आंदोलन सुरु केले असून आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे, आमदार पाटील यांची तब्येत खालवली आहे. त्यांना पाठिंबा म्हणून पाडोळी या गावातील जवळपास 25 शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन सुरु केले आहे. शेतकऱ्यांनी तलावात उड्या घेतल्या आहेत. दिवसेंदिवस हे आंदोलन पेटताना दिसत आहे. जोपर्यंत पैसे मिळणार नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे.
Belgaum Water Issue : दूषित पाणी पिल्याने दोघांचा मृत्यू तर शंभरहून अधिक जण रुग्णालयात दाखल
बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील मुदेनुर गावात शंभरहून अधिक जण दूषित पाणी पिल्याने अत्यवस्थ झाले असून उपचार सुरू असताना दोघांचा मृत्यू झाला आहे. अन्य रुग्णावर रामदुर्ग तालुका इस्पितळात आणि खासगी इस्पितळात उपचार सुरू आहेत. व्हॉईस ओव्हर - बुधवारी सायंकाळी मुदेनुर गावातील काही जणांना उलटी आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला.त्यांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. नंतर रुग्णांची संख्या वाढू लागली.उपचार सुरू असताना एका वृद्धाचा आणि एका वृद्धेचा मृत्यू झाला आहे. बोअरवेलच्या पाण्यात दूषित पाणी मिसळले गेल्यामुळे सदर समस्या उदभवली आहे. पाणी प्यायल्यानंतर लोकांना पोटात दुखणे,उलटी आणि जुलाब सुरू झाले.हळूहळू रुग्णांची संख्या वाढत गेली.अधिक त्रास होत असलेल्या रुग्णांना बागलकोट आणि बेळगाव जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात येत आहे.मृताच्या कुटुंबीयांना सरकारने दहा लाख रु ची मदत जाहीर केली असून गावातील लोकांनी आर ओ पलांटचे पाणी पिण्यासाठी वापरावे.बोअरवेल किंवा विहिरीचे पाणी पिऊ नये असे आवाहन पालकमंत्री गोविंद कार्जोळ यांनी केले आहे.
Girish Mahajan : बच्चू कडू आणि रवी राणांमध्ये आता कोणतेही वाद नाहीत, मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री त्यांची समजूत काढतील : गिरीष महाजन

Girish Mahajan : आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्यात आता कोणतेही वाद नाहीत. परवा त्यांच्यात थोडा शाब्दिक वाद झाला होता. दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बसून त्यांची समजूत काढतील, असं वक्तव्य ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन (Girish Mahajan) यांनी केलं. आता कोणीच कोणावर टीका टिप्पणी करत नाही. याबाबत माझे रवी राणा आणि बच्चू कडू या दोघांशीही बोलणं झालं असल्याचे महाजन यावेळी म्हणाले.


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा.

भंडारा : पवन राजा परकोट किल्ल्यावर दीपोत्सव, 5501 दिव्यांची आरास

भंडारा : महाराष्ट्राच्या पूर्व टोकावर वसलेल्या आणि विदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्ह्यातील पवनी नगरातील ऐतिहासिक पवन राजा परकोट किल्ल्यावर 5501 दिव्यांचा दीपोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. शिवसारथी ग्रुप तर्फे हा दीपोत्सव साजरा करण्यात आला. हा नेत्रदीपक दीपोत्सव बघण्यासाठी शहरासह व परिसरातील गावांमधून नागरिकांनी हजेरी लावली होती. या सोहळ्याच्या माध्यमातून पवनी नगराचा ऐतिहासिक वारसा जपण्याचा प्रयत्न सुरू आहे. शहरातील तरुणांनी घेतलेल्या पुढाकारातून संपूर्ण परकोट किल्ला प्रकाशमय झाला होता. या उत्सवाच्या माध्यमातून पवनी नगरातील ऐतिहासिक पर्यटन वाढावे, हा उद्देश समोर ठेवण्यात आला आहे. 

पंढरपूर : ऊस वाहतूक करणारे 15 ते 20 ट्रॅक्टर आंदोलकांनी अडविले

पंढरपूर शहरात ऊस वाहतूक करणारे 15 ते 20 ट्रॅक्टर आंदोलकांनी अडविले. यावेळी आंदोलनातील महिला आंदोलक विश्रांती भुसनर यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न झाल्याने आंदोलक संतप्त, पोलीस घटनास्थळी दाखल

हिंगोली : खुर्चीवरून अब्दुल सत्तार आणि नवघरे यांच्यात शाब्दिक चकमक

कृषीमंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार हिंगोली दौऱ्यावर आहेत. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत स्टेजवर आमदार चंद्रकांत उर्फ राजू नवघरे यांना खुर्ची नसल्यावरून कृषी मंत्री अब्दुल सत्तार आणि आमदार राजू नवघरे यांच्यात शाब्दिक चमकमक झाली.  यावेळी आयोजित बैठकीत राष्ट्रवादीचे आमदार यांना खुर्ची व्यवस्था केली नसल्याने आमदार स्टेजच्या समोर असलेल्या खुर्चीवर बसले होते. उशिरा आल्याने खुर्ची स्टेजवर तुमची खुर्ची ठेवली नसल्याचे बोलत पालक मंत्री यांनी स्टेजवर खुर्ची ठेवायला सांगत आमदार नवघरे यांना स्टेजवर खुर्ची ठेवत खुर्चीवर बसण्यास सांगितले.

राज्यातील उद्योग बाहेर पळवण्यासाठीच सत्तांतर; सुभाष देसाई यांचा गंभीर आरोप

Tata Air Bus Project :  टाटा एअर बसचा प्रकल्प (Tata Air Bus Project) राज्यातून गुजरातमध्ये गेल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. वेदांता-फॉक्सकॉन, बल्क ड्रग्ज पार्क या दोन प्रकल्पानंतर तिसरा प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारवर चहुबाजूने टीका सुरू झाली आहे.


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा.

पालघर : गडचिंचले येथे राहत्या घराला आग

गडचिंचले येथे राहत्या घराला आग लागून दुर्घटना घडली आहे. बापजी बरफ आणि विलास बरफ यांच्या मालकीच्या राहत्या घराला आग  लागली. घरात ठेवलेल्या भाताच्या गंजीला आग लागल्याने घर आगीच्या भक्ष्यस्थानी गेलं. आगीमुळे घरं, भात आणि घरातील साहित्य जळून खाक झालं आहे. चुलीतील निखाऱ्यामुळे घराला आणि भाताच्या गंजीला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं 4 आणि 5 नोव्हेंबरला शिर्डी येथे राज्यस्तरीय अधिवेशन


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं 4 आणि 5 नोव्हेंबरला शिर्डी येथे राज्यस्तरीय अधिवेशन


राष्ट्रवादी मंथन वेध भविष्याचा या दोन दिवशीय अधिवेशनासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि सर्व प्रमूख पदाधिकारी उपस्थित राहणार


अधिवेशनात विविध क्षेत्रातील अभ्यासक, विचारवंत, अभ्यासक विविध विषयांवर मार्गदर्शन करणार

वसई : प्रेयेसीच्या मदतीने पोलिसाकडून विवाहित महिलेवर अत्याचार

वसई : प्रेयेसीच्या मदतीने नालासोपाऱ्यात एका पोलिसाने एका विवाहित महिलेला दारू पाजून बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलीस आणि त्याच्या प्रेयसीच्या विरोधात नालासोपारा पोलीस ठाण्यात भादवी कलम 323, 342, 376, 377, 506 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. राहुल लोंढे असं बलात्काराचा गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव आहे. राहुल लोंढे हा वसई पोलीस ठाण्यात पोलीस नाइक पदावर कार्यरत आहे. 

उल्हासनगर नंतर डोंबिवलीत तरुणांची स्टंटबाजी, रॉकेटचा बॉक्स हातात घेत स्टंट

उल्हासनगरमध्ये एका रहिवासी इमारतीवर मध्यरात्रीच्या सुमारास फटाक्यांचे रॉकेट डागल्याची घटना घडली होती. हा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हे रॉकेट्स थेट नागरिकांच्या घरात जाऊन फुटल्याने नागरिकांमध्ये मोठं भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यानंतर आता आणखी एक व्हिडियो व्हायरल झालाय. या व्हिडियोमध्ये एक तरुण हातात फटाक्यांचे बॉक्स घेऊन स्टंट करताना दिसत आहे. रात्रीच्या वेळचा हा व्हिडिओ डोंबिवली पाथर्लीमधील असल्याचा बोललं जातं आहे. या तरुणाने सुद्धा रॉकेटचा बॉक्स हातात घेत स्टंट केला आहे. 

एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक अचानक रद्द

MSRTC BOD Meeting : एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक अचानक रद्द


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वेळेअभावी बैठक रद्द करण्यात आल्याची सूत्रांची माहिती


बैठकीत एसटी महामंडळ तोट्यातून बाहेर काढण्यासाठी उपाय योजना, कर्मचाऱ्यांच्या पगारासाठीचा पुरेसा निधी, एसटी महामंडळात नव्याने दाखल होणाऱ्या गाड्यांसाठीची अंतिम मंजुरी यावर चर्चा होणार असल्याची माहिती


एसटी महामंडळाची बैठक पुढील आठवड्यात होण्याची शक्यता

Airbus : महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला पळवण्यासाठी सत्तांतर - माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा गंभीर आरोप

महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला पळवण्यासाठी सत्तांतर केल्याचा गंभीर आरोप माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केला आहे.





परतीच्या पावासाने विश्रांती घेतल्यानंतर शेतीच्या कामांना सुरुवात, चिपळूण तालुक्यात भात कापणी सुरु

Ratnagiri News : सध्या कोकणात भात कापणी सुरु आहे. परतीच्या पावासाने विश्रांती घेतल्यानंतर शेतीच्या कामांना सुरुवात झाली आहे. पावसाने उसंत घेतल्याने कापणीचा वेग वाढला आहे. कमरेला आकडी बांधून विळा घेऊन शेतकरी राजा भात कापणीला सज्ज झाला आहे. चिपळूण तालुक्यातही भात कापणी सुरु आहे. यानंतर शेतातच मळणी काढली जाते.

सांगली जिल्ह्यात परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे कृषी विभागाकडून पंचनामे सुरू
परतीच्या पावसाने ऑक्टोबर महिन्यामध्ये धुमाकूळ घातल्याने सांगलीच्या वाळवा तालुक्यात भात, भुईमुंग, सोयाबीन, टोमॅटो, भाजीपाला पिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. याची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पावसाने केलेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कृषी विभागाचे अधिकारी नुकसान झालेल्या शेतात जाऊन पंचनामा करत असल्याचे  चित्र सध्या दिसत आहे. उशिरा का होईना पण पंचनामे सुरू झाल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असून लवकरात लवकर पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
बुलढाणा : घरात झोपलेल्या 70 वर्षीय वृद्धावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला, हल्ल्यात वृद्ध गंभीर जखमी.

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील टेकडी परिसरातील घरात झोपलेल्या 70 वर्षीय वृद्धावर भटक्या कुत्र्यानी हल्ला केल्याने हा वृद्ध गंभीर जखमी झाला आहे. शेगावातील टेकडी परिसरात नगर परिषदेच डम्पिंग ग्राउंड असल्याने या परिसरात शेकडो भटकी कुत्री दिवसभर असतात. आज सकाळी याच परिसरातील 70 वर्षीय वृद्ध आपल्या घरात झोपलेले असताना त्यांच्यावर अचानक 8 ते 10 भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला यात या वृद्धाचा चेहऱ्यावर आणि ओठावर गंभीर जखम झाली आहे. वृद्धाला तात्काळ शेगावच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. परिसरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

समर्थ रामदासांच्या जन्मगावातील ऐतिहासिक मूर्ती चोरी प्रकरण; दोन आरोपींना अटक

समर्थ रामदासांच्या जन्मगावातील राम मंदिरातून ऐतिहासिक मूर्ती ऑगस्ट महिन्यात चोरीला गेल्या होत्या. पोलिसांनी आता कर्नाटक आणि सोलापूरमधून दोन आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणातील आणखी एक आरोपी फाफर आहे. धक्कादायक बाब म्हणजे चोरांनी या ऐतिहासिक मूर्ती 25 हजार रुपयांना विकल्या होत्या. या घटनेचा तपास स्पेशल इन्वेस्टीगेशन टीम अर्थात SIT च्या मार्फत सुरु आहे. पोलीस महसंचालकांच्या सुचनेवरुन या एसआयटीची स्थापना करण्यात आली होती. या चोरीच्या घटनेच्या सखोल तपासासाठी तामिळनाडू पोलिसांच्या एक्स्पर्ट आयडॉल विंगची मदत घेतली जाणार आहे.


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा.


 

पालघरमध्ये जनावरांची चोरी करणाऱ्या टोळ्यांचा सुळसुळाट

पालघरच्या उमरोळी परिसरात सध्या जनावरांची चोरी करणाऱ्या टोळ्यांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय . दोन दिवसांत उमरोळी येथील तब्बल दुग्धव्यवसायीनकांच्या सहा जनावरांची चोरी झाल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत . या सहा जनावरांची किंमत जवळपास 1 लाख 55 हजारांच्या घरात असून रात्रीच्या सुमारास होणाऱ्या या जनावरांच्या चोरीच्या घटना सीसीटीव्हीत कैद झाल्या आहेत. या प्रकरणात पालघर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले असून चोरटे आणि जनावर चोरण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गाड्या स्पष्ट दिसत असताना देखील पोलीस प्रशासनाला चोरांना पकडण्यात अपयश येत असल्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय.

जालना मूर्तीचोरी प्रकरणी प्रकरणात पोलिसांना मोठं यश, दोन आरोपींना पोलिसांकडून अटक

जालना जिल्ह्यातील समर्थांच्या देवघरातील मूर्तीचोरी प्रकरणात पोलिसांना मोठं यश, दोन आरोपींना पोलिसांकडून अटक, पोलीस मुख्य आरोपीच्या मागावर


 





रायगड : मुंबई पुणे एक्स्प्रेस मार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास ट्रकने घेतला पेट...

रायगड : मुंबई पुणे एक्स्प्रेस मार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास ट्रकने घेतला पेट...


बोरघाटातील आडोशी बोगद्याजवळ ट्रकने घेतला पेट...


पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकला आग, ट्रकचालक आणि त्याचा सहकारी सुखरूप...


देवदूत यंत्रणा आणि अग्निशमन दलाच्या मदतीने आग विझविण्यात यश..

रत्नागिरी : कोकणात भात कापणीला सुरुवात
सध्या कोकणात भात कापणी सुरू आहे. परतीच्या पावासाने विश्रांती घेतल्यानंतर शेतीच्या  कामांना सुरुवात झाली आहे. पावसाने विसंत घेतल्याने कापणीचा वेग वाढला आहे. कमरेला आकडी बांधून विळा घेऊन शेतकरी राजा भात कापणीला सज्ज झाला आहे. चिपळूण तालुक्यात भात कापणीला सुरवात झाली आहे. शेतात मळणी काढल्या जात आहेत.
हिंगोली : मोठा वाडा आगीत जळून खाक, एक ते दीड कोटी रुपयांचे नुकसान 
हिंगोली जिल्ह्यातील जवळाबाजार येथे एका वाड्याला लक्ष्मीपूजन च्या दिवशी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास आग लागली होती. या आगीमध्ये सोने चांदीचे दागिने सह रोग रक्कम एकूण एक ते दीड कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान या वाड्यामध्ये जवळपास 100 लहान मोठे सदस्य राहत होते. आग लागल्याची लक्षात येताच सर्वांनी घराच्या बाहेर पळ काढल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, परंतु आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाली आहे. तब्बल नऊ तासाच्या प्रतीक्षेनंतर मंगळवारी सकाळी या वाड्यामध्ये लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.
Maharashtra Local Body Elections : नगरपालिका-महापालिका निवडणूक जानेवारीत होणार असल्याचं वृत्त तथ्यहीन, मुख्यमंत्री कार्यालयाचं स्पष्टीकरण

राज्यातील नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या आगामी निवडणुका जानेवारी महिन्यात होणार असल्याचं वृत्त तथ्यहीन असल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री कार्यालयाने (Maharashtra CMO) दिलं आहे. याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटलं की, "नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या आगामी निवडणुका जानेवारी महिन्यात घेण्यात येणार आहेत, असं वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिलं असून त्यात कोणतंही तथ्य नाही. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी सुरु असून अंतिम निकालानंतर राज्य निवडणूक आयोग या निवडणुकांसदर्भात निर्णय घेईल." 


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा.

वातावरणातील बदलामूळे समुद्रातून मासे गायब?
सध्या जिल्ह्यातील मासेमारी व्यवसाय संकटात  सापडत आहे. कारण वातावरणातील बदलाचा परिणाम मोठा झाला आहे. यामुळे मासे  मिळण्याचे प्रमाण अचानक कमी झालं आहे. लाखो मच्छिमार बांधव मासेमारी व्यवसायावर अवलंबून आहेत. डिझेल खर्च साहित्य, कामगार आणि बोटींचा  मेंटेनन्स खर्च वाढत असल्यामुळे रोजचा मासेमारी खर्च वाढत असतो. सध्या मात्र मासे मिळत नसल्यामुळे मासेमारी व्यावसायिकांचे आर्थिक गणिते कोलमडली आहेत.
Nashik Cold Weather : नाशिकमध्ये गुलाबी थंडीची चाहूल

दिवाळी होताच नाशिकमध्ये तापमानाचा पारा खाली घसरत असल्याचं बघायला मिळत असून सध्या नाशिककर गुलाबी थंडी अनुभवतायत. थंडीपासून शरीराचा बचाव करण्यासाठी कोणी उबदार कपडे परिधान करतायत तर कोणी जॉगिंग ट्रॅकवर मित्र मंडळीसमवेत व्यायाम तसेच जॉगिंग करत या गुलाबी थंडीचा आनंद लुटतायत. दिवाळीचा फराळ, गोड धोड पदार्थ खाऊन वाढलेले वजन घटवण्यासाठी अनेक जण जॉगिंग ट्रॅकवर मेहनत घेत असून पहाटेपासूनच सर्वच जॉगिंग ट्रॅकवर हजारो नाशिककर आरोग्याची काळजी घेतांना नजरेस पडतायत. 

कोल्हापूर महापालिकेतील अभियंत्याच्या आईचा रस्त्यावरच्या खड्ड्यात पडून जीव गेला; प्रशासन रस्त्यावर अजून किती जणांचे 'रक्त' सांडणार?

कोल्हापूर शहरातील रस्त्यांनी किती गंभीर परिस्थिती करून ठेवली आहे याचे आणखी एक भीषण उदाहरण समोर आले आहे. कोल्हापूर महानगरपालिकेत कार्यरत असणाऱ्या एका अभियंत्याच्या निष्पाप आईचा आपटेनगर परिसरात रस्त्यावरी गुडघाभर खड्ड्यात पडून जागीच जीव गेला आहे. त्यामुळे कोल्हापूर मनपा प्रशासन अजून किती जणांचे रक्त सांडणार? असा सवाल उपस्थित होत आहे. 


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

Railway Police Twitter Account Hacked :

मुंबई रेल्वे पोलिसांचं ट्विटर अकाऊंट हॅक झालं आहे. रेल्वे पोलीस आयुक्त यांनी ट्वीट करुन याची माहिती दिली. "आमची विनंती आहे की, अपडेट करेपर्यंत कोणत्याही नवीन ट्विटकडे लक्ष देऊ नका. संबंधित एजन्सी अकाऊंट रिसेट करण्याचा प्रयत्न करत आहे," असं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.



वातावरणातील बदलामुळे रत्नागिरीच्या समुद्रातून मासे गायब

Ratnagiri News : सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील मासेमारी व्यवसाय संकटात सापडला आहे. कारण वातावरणातील बदलाचा मोठा परिणाम व्यवसायावर झाला आहे. यामुळे मासे  मिळण्याचे प्रमाण अचानक कमी झालं आहे. लाखो मच्छिमार बांधव मासेमारी व्यवसायावर अवलंबून आहेत. डिझेल खर्च साहित्य, कामगार आणि बोटींचा मेंटेनन्स खर्च वाढत असल्यामुळे रोजचा मासेमारी खर्च वाढत असतो. सध्या मात्र मासे मिळत नसल्यामुळे मासेमारी व्यवसायिकांचे आर्थिक गणित कोलमडलं आहे.

Vegetable Price Hike : भाज्यांचे दर आवाक्याबाहेर, भाजीपाल्यांच्या किंमतीत 20 ते 25 टक्क्यांनी वाढ

आठवड्यापूर्वी झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं आहे. काढणीला आलेल्या भाज्या पूर्णपणे खराब झाल्या. त्यामुळे भाज्यांचे दर देखील कडाडले आहेत. भाज्यांची आवक 25 ते 30 टक्क्यांनी घटल्याचं चित्र आहे. परिणामी, भाजीपालाच्या दरात 20 ते 25 टक्क्यांची वाढ बघायला मिळते आहे. बाजारात भाजीपाल्यांची आवक सुरळीत व्हायला साधारण एक महिन्याचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत सर्वसामान्यांना भाजीपाला चढ्या दराने घ्यावा लागणार आहे. 

रत्नागिरी : संगमेश्वरात चोरट्यांनी ऐन दिवाळीत फोडल्या मंदिरातील दानपेटी 
रत्नागिरी : सर्वत्र दिवाळीचा उत्साह असताना रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरमध्ये मात्र चोरट्यांनी चक्क देवळातील दानपट्टीवरतीच डल्ला मारला. धामापूर सरंद आणि बुरंबाड या गावातील मंदिरात चोरट्यांनी मंदिरातील दानपेटी फोडली आहे. ही चोरी सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली असून सध्या पोलिसांकडून तपास सुरू आहे.
Konkan Refinery : कोकणातील रिफायनरी प्रकल्पासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू उतरणात मैदानात
टाटा एअरबसच्या प्रकल्प आता गुजरातला गेला आहे. पण, त्यानंतर कोकणातील रिफायनरीबाबत सध्या वेगानं घडामोडी घडत आहेत. कारण, कोकणातील रिफायनरी व्हावी यासाठी आता उद्योगमंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण ऊर्फ भैय्या सामंत मैदानात उतरणार आहेत. राजापूर तालुक्यातील बारसू आणि सोलगाव या ठिकाणी सध्या रिफायनरीसाठी चाचपणी सुरू आहे. पण, सध्या मोठ्या प्रमाणातील विरोधामुळे या प्रकल्पाचं सर्व्हेचं काम देखील थांबलं आहे. पण, आता उद्योगमंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू थेट रिफायनरीसाठी मैदानात उतरणार असल्यानं प्रकल्प किती वेगानं पुढं जातो हे देखील पाहावं लागेल. या ठिकाणी असलेला विरोध, लोकांमध्ये प्रकल्पाबाबत असलेली नाराजी याबाबत आता उद्योगमंत्री यांचे बंधूच मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे त्याला किती यश मिळतं हे देखील पुढील काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल. 

 

 
प्रकल्प गुजरातला जात आहेत मात्र मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री बघ्याच्या भूमिकेत, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील
वेदांता,फोक्सकॉन प्रकल्पापाठोपाठ आता नागपुरात येणारा एअरबस प्रकल्पदेखील महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. आमचा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवणार? अशी विचारणा त्यांनी सत्ताधाऱ्यांना केली आहे.  ट्विटच्या माध्यमातून भाष्य करताना ते म्हणाले की, वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पानंतर नागपूरमध्ये होणारा 22 हजार कोटींचा टाटा एअरबस प्रकल्प आज गुजरातला गेला. एकामागून एक मोठे प्रकल्प गुजरातला जात आहेत. महाराष्ट्रातील सध्याचे सरकार दिल्लीसमोर किती हतबल झाले आहे हे यातून स्पष्ट होते. महाराष्ट्रातील सत्तांतर राज्याला वेठीस धरण्यासाठी झाले आहे का? असा प्रश्न सध्या पडत आहे. गुजरात निवडणुकांच्या अनुषंगाने सर्व प्रकल्प गुजरातला नेले जात आहेत आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री मात्र बघ्याच्या भूमिकेत आहे. आमचा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवणार आहात? असे ते म्हणाले.
Buldana : सलग सुट्ट्यांमुळे शेगाव हाऊस फुल्ल
यावर्षी कोरोनानंतर दिवाळीत निर्बंधमुक्त वातावरण असल्याने आणि दिवाळीनंतर आलेल्या सलग सुट्यामुळे सध्या राज्यभरातून भाविकांनी तीर्थक्षेत्राला जाणे पसंत केलेले आहे. शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरातही राज्यासह इतर राज्यातूनही पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. संत गजानन महाराज समाधीच दर्शन घेण्यासाठी गर्दी झाली आहे. दररोज लाखो भाविक शेगावात येत आहेत. 
Kurla Fire : मुंबईतल्या कुर्ल्यातील गोदामांना भीषण आग

मुंबईतल्या कुर्ल्यातील गोदामांना भीषण आग...काही तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश...





Buldhana : बुलढाणा - खामगावातील आठवडी बाजारातील दुकानाला भीषण आग

बुलढाणा - खामगावातील आठवडी बाजारातील दुकानाला भीषण आग.. आगीत नऊ दुकानं जळून खाक... सामानाचं मोठं नुकसान...





पंतप्रधानांचा आज राज्यांच्या गृहमंत्र्यांसोबत चिंतन शिबिर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 10.30 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यांच्या गृहमंत्र्यांच्या चिंतन शिविराला संबोधित करणार आहेत. या चिंतन शिबिराचे आयोजन 27 आणि 28 ऑक्टोबर रोजी सुरजकुंड, हरियाणा येथे करण्यात आले आहे. या चिंतन शिबिरात विविध राज्यांचे गृहसचिव आणि पोलीस महासंचालक (डीजीपी) आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ) आणि केंद्रीय पोलीस संघटना (सीपीओ) यांचे महासंचालकही सहभागी होणार आहेत.

 Kurla Fire: कुर्ल्यात एलबीएस मार्गजवळील गुलाब शहा इस्टेटमधील गोदामाला भीषण आग

 Kurla Fire: कुर्ल्यात एलबीएस मार्ग जवळील गुलाब शहा इस्टेट गोदमांमध्ये भीषण आग लागली आहे.गेल्या दोन तासंपासून अग्निशमन दलाच्या दहा ते पंधरा बंब आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न कर त आहेत.या ठिकाणी शेकडो, कपडे, कम्प्युटर पार्ट, प्लास्टिक साहित्य अशी गोदामे आहेत.यामुळे ही आग वाढत जात आहे.


 





Sujay Vikhe-Patil : मंत्री असताना त्यांनी महाराष्ट्र कधी पाहिलाच नाही, सुजय विखेंचा ठाकरेंवर निशाणा

ज्या महाराष्ट्राचे आपण मुख्यमंत्री होतो तो महाराष्ट्र दिसतो कसा हे पाहण्यासाठी ठाकरे सध्या राज्याचा दौरा करत आहे. पद गेल्यानंतर महाराष्ट्राची स्थिती पाहायला त्यांना वेळ मिळाला आहे. मात्र, मंत्री असताना त्यांनी महाराष्ट्र कधी पाहिलाच नाही अशी टीका भाजप खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe-Patil) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर केली. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना निवांत वेळ दिला असल्याचेही विखे पाटील यावेळी म्हणाले.


सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा.

पार्श्वभूमी

 ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो.


पंतप्रधान मोदी आज राज्यांच्या गृहमंत्र्यांच्या चिंतन शिबिरात सहभागी होणार 


पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 10.30 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यांच्या गृहमंत्र्यांच्या चिंतन शिविराला संबोधित करणार आहेत. या चिंतन शिबिराचे आयोजन 27 आणि 28 ऑक्टोबर रोजी सुरजकुंड, हरियाणा येथे करण्यात आले आहे. या चिंतन शिबिरात विविध राज्यांचे गृहसचिव आणि पोलीस महासंचालक (डीजीपी) आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ) आणि केंद्रीय पोलीस संघटना (सीपीओ) यांचे महासंचालकही सहभागी होणार आहेत.


मुख्यमंत्री शिंदे आज महाबळेश्वरात




 



आज दुपारनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाबळेश्वरात असणार आहे. ते आज महाबळेश्वरमध्ये मुक्काम करणार आहेत. तसेच ते संध्याकाळी पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. 


दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी 


सत्येंद्र जैन यांनी जामीन अर्जावर लवकर सुनावणी घेण्याची मागणी केली आहे. राऊस एव्हेन्यू कोर्टाने सत्येंद्र जैन यांच्या जामिनावर आज दुपारी 2 वाजता सुनावणी घेणार असल्याचे सांगितले आहे. सत्येंद्र जैन यांच्या जामीन अर्जावर 31 ऑक्टोबरला सुनावणी होणार होती.


एसटी महामंडळाच्या संचालक मंडळांची 302 वी बैठक आज पार पडणार


एसटी महामंडळाच्या संचालक मंडळांची 302 वी बैठक आज पार पडणार आहे. एसटीला 4 हजार गाड्यांसोबतच महागाई भत्ता आणि उत्पन्नाचे आर्थिक स्त्रोत निर्माण करण्यावर एसटीचा भर असेल. आणखी काय काय एसटीच्या पदरी पडतं? मुख्यमंत्री काय देतात हे बघणं महत्त्वाचं असेल.


एनएचएआयच्या कंपनीची लिस्टिंग, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राहणार उपस्थित 


नॅशनल हायवे इन्फ्रा ट्रस्ट या एनएचएआयची उपकंपनी असलेल्या कंपनीचे लिस्टिंग पार पडणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री व्ही.के. सिंह यांची देखील उपस्थिती असेल. बीएसई, सकाळी 8 : 30 वाजता 


मुंबईत यूएनएससी दहशतवाद विरोधी समितीची आजपासून दोन दिवसीय बैठक


संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवादविरोधी समितीची दोन दिवसीय बैठक आजपासून मुंबईत सुरू होत आहे. तर 29 ऑक्टोबर रोजी दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीत दहशतवाद्यांकडून होत असलेल्या इंटरनेटचा वापर, नवीन पेमेंट सिस्टीम आणि ड्रोनचा सामना करण्याच्या पद्धतींवर चर्चा होणार आहे.


गिरीश महाजन आज धुळ्यात 


राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे आज धुळ्यात येत असून त्यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहे. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर प्रथमच ही बैठक होणार आहे. यामुळे अनेक विषयांच्या कारणावरून ही बैठक वादळी होण्याची शक्यता आहे.


आरोग्यमंत्री तानाजी सावंत आज अहमदनगर दौऱ्यावर


राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे आजअहमदनगर दौऱ्यावर आहेत. चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे स्मारक येथे ते अभिवादन करणार आहेत. त्यानंतर ते भाजप नेते राम शिंदे यांच्या घरी सदिच्छा भेट देणार आहेत.


आजपासून छठ पर्व सुरु
चार दिवसीय छठ उत्सव आजपासून सुरू होणार आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.