Pandharpur Ashadhi Wari 2024 : आषाढी यात्रेत यंदा प्रथमच अगदी भंडीशेगावपासून पंढरपूर शहरापर्यंत ठिकठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई केली जाणार आहे. यंदाची आषाढी एकादशी आजपर्यंतच्या आषाढीतील बेस्ट असेल असा विश्वास सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केला. यावर्षी प्रथमच भंडीशेगाव , वाखरी या पालखी मार्गावरील इमारती , झाडांना आकर्षक विद्युत रोषणाई करून लाखो भाविकांचे स्वागत केले जाणार आहे. यानंतर पालखी सोहळे पंढरपुरात पोचल्यावर इसबावी , कॉलेज चौक , चंद्रभागा वाळवंट , भाविकांचे निवासस्थळ असणारे 65 एकरावरील भक्तिसागर अशा विविध ठिकाणी हे आकर्षक विद्युत रोषणाई केली जाणार आहे. यासाठी विविध जागांची पाहणी केली असून पालखी सोहळे येण्यापूर्वी ही विद्युत रोषणाई पूर्ण केली जाणार आहे. 


यापूर्वी केवळ विठ्ठल मंदिरालाच आकर्षक विद्युत रोषणाई केली जात असे. यंदा प्रथमच मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर या संपूर्ण मार्गावर आणि शहरातील भाविकांच्या गर्दीच्या ठिकाणी या विद्युत रोषणाईत भाविकांचे स्वागत केले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी एबीपी माझाला सांगितले. 


आषाढीची कामे 10 जुलैपर्यंत पूर्ण होणार असून ABP माझाने दाखवून दिलेल्या पालखी मार्गावरील सर्व कामे वेगाने पूर्ण केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. यंदा प्रथमच प्रत्येक भाविकाला 1 पाण्याची बाटली आणि मँगो ज्यूसची एक बाटली दिली जाणार आहे. त्यासाठी प्रशासनाने ऑर्डर दिली असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यंदा स्वच्छता आणि आरोग्यावर भर देण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. पंढरपूरकडे येणारे आणि शहरातील 70 रस्त्यांची दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात असल्याचेही सांगितले . भाविकांच्या आरोग्यासाठी यंदा चार ठिकाणी महाआरोग्य शिबीर घेण्यात येणार आहे. 


यात्रेची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री 13 किंवा 14 जुलै रोजी येऊन जाणार असून त्यांच्या येण्याचा फायदा जिल्हा प्रशासनाला होत असल्याचे त्यांनी सांगितले. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पंढरपूर दौऱ्याबाबत अद्याप प्रशासनाला कोणतीही माहिती नसली तरी आम्ही कोणत्याही व्हीआयपी व्यक्तीच्या स्वागतासाठी सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले. कितीही मोठा व्हीआयपी आला तरी त्याचा सर्व प्रोटोकॉल पूर्ण करून त्यांची सोया केली जाईल असेही त्यांनी सांगितले .