पालघर :  वाडा मनोर (Wada Manor)  राज्य महामार्ग सध्या प्रवासासाठी धोकादायक बनला असून या महामार्गावर पिंजाळ आणि देहर जा नदीवरील पुलांचे मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून हे पूल पूर्ण खड्डेमय झाले आहेत.  त्यामुळे प्रवाशांना या पुलांवरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. या पुलावरून वाहन चालक आणि प्रवाशांना जीवघेणा (Palghar News) प्रवास करावा लागत आहे. सोमवारी पुलावरून स्कुटी वरून प्रवास करत असताना एक शिक्षिका  थेट खड्ड्यात पडली. गेल्या अनेक दिवस हा रस्ता मोठ्या प्रमाणात धोकादायक बनला असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महामार्ग प्रशासन निद्रावस्थेत असल्याचं चित्र दिसून येत आहे. एबीपी माझाने काल या विषयाची बातमी प्रसारित केल्यानंतर आज प्रशासनाला जाग आली असून या पुलावरील धोकादायक खड्डे बुजवायला सुरुवात केली आहे. 


 सावित्री नदीवरील पुलाच्या झालेल्या दुर्घटनेनंतर सरकारला जागा आली आणि सरकारने राज्यातील नद्यांवरील  पूलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटला सुरुवात केली . मात्र या सगळ्याचा काहीच वर्षात सरकारला विसर पडलेला पाहायला मिळाला. पालघर जिल्ह्यात प्रमुख मार्गांवर नद्यांवरील असलेल्या पूलांची सध्या दयनीय अवस्था झालेली पाहायला मिळते . 


एबीपी माझाच्या बातमीनंतर खड्डे बुजवण्यात सुरुवात 


मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला पर्यायी मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनोर वाडा भिवंडी या राज्य महामार्गावरील पिंजाळ आणि दहेर्जे या दोन्ही नद्यांवरील पूलांची दयनीय अवस्था झाली आहे. सध्या ही पूलं जीर्ण अवस्थेत असून या पूलांवरील असलेल्या खड्ड्यांमुळे अपघातांना आमंत्रण दिल जात आहे .सोमवारी देखील पिंजाळ नदीवरील पूलावर एक महिला बाईक स्वार खड्ड्यात पडून अपघात घडला मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही . मात्र असं असलं तरीसुद्धा हा पूल सध्या वाहतुकीसाठी धोकादायक बनल्याची बातमी एबीपी माझाने प्रसारीत केली आणि आज खड्डे बुजवण्यात सुरुवात झाली. 


अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी हे दोन्ही पूल सध्या धोकादायक


मनोरवाडा भिवंडी हा महत्त्वाचा महामार्ग असून या महामार्गावर सध्या मोठ्या प्रमाणावर रहदारी पाहायला मिळते . गुजरातकडून येणारी अवजड वाहन याच मार्गाने पुढे नवी मुंबई वाशी पुणे या भागात जात असून अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी हे दोन्ही पूल सध्या धोकादायक झाले आहेत . याचा नाहक त्रास वाहन चालक , प्रवाशी ,आणि स्थानिक नागरिकांना सहन करावा लागतोय .या पुलांच्ची सद्या दुरवस्था झाली असून कधीही दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे . त्यामुळे सरकार पुन्हा एकदा सावित्री नदीवरील पूलाच्या दुर्घटनेसारख्या दुर्घटनेची वाट पाहतय का असा सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जातोय.


हे ही वाचा :


भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त