Maharashtra News Updates 21 January 2023 : शेतकऱ्यांच्या खात्यावरून परस्पर पैसे उचलल्याप्रकरणी बीड शाखा अधिकाऱ्यांसह लेखपाल आणि तपासणीस निलंबित
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
दिवसभरात काय काय होणार आहे, हे जाणून घेण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते... राजकीय, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रासह इतर क्षेत्रात दिवसभरात काय काय महत्वाच्या घडामोडी घडणार आहेत, याचा थोडक्यात आढावा घेणार आहोत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यातील एका कार्यक्रमात एकाच मंचावर असणार आहेत. दोघांच्या भाषणाकडे पुणेकरांचं लक्ष लागलेय. त्याशिवाय आज वर्षातील पहिलीच शनी अमावस्या आहे. तर मुंबईतील गोखले ब्रिजसाठी पश्चिम रोल्वेवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.. पाहूयात आज दिवसभरात कोणत्या घडामोडी घडणार आहेत....
पुणे – वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 46 वी सर्वसाधारण सभा आज पुण्याजवळील मांजरी इथल्या संस्थेच्या आवारात सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आलीय... या सभेला संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सहकारमंत्री अतुल सावे, विरोधी पक्ष नेते अजित पवार, संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्यासह राज्याच्या साखर उद्योगातील नेते हजेरी लावणार आहेत. यावेळी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटतर्फे 2021 - 2022 या वर्षासाठी सर्वोत्कृष्ट कार्यक्षमतेसाठी दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. राज्याच्या साखर उद्योगात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही मध्यवर्ती संस्था म्हणून काम करते.
वर्षातील पहिली शनी अमावस्या
अहमदनगर - 2023 या वर्षातील पहिली शनी अमावस्या आज आहे. या दिवशी पौष महिन्यातील मौनी अमावस्याही असेल. पौष महिन्यातील शनिवारी अमावस्येचा योग विशेष मानला जातो. अमावस्यामुळं मध्यरात्रीपासूनच भाविक दर्शनासाठी गर्दी करतात.
गोखले ब्रिजसाठी पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक
मुंबई - अंधेरी येथील गोखले ब्रिजच्या पाडकामासाठी पश्चिम रेल्वेवर दोन रात्री मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे... 21 आणि 22 च्या रात्री तसेच 24 आणि 25 च्या मध्यरात्री साडेचार तासांचे हे मेगाब्लॉक असणार आहेत. यामुळे पश्चिम रेल्वे वरील काही लोकल आणि एक्सप्रेस गाड्या या रद्द करण्यात आलेल्या आहेत... तसेच काहींच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आलेला आहे... गोखले ब्रिज काढून त्या जागी लवकरात लवकर नवीन ब्रिज तयार करण्यासाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात येत आहेत.
चिंचवड पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शरद पवारांना भेटणार
पुणे - कसबा पेठ आणि चिंचवड या दोन्ही विधानसभांची पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाही हे आता निश्चित झालय... चिंचवड विधानसभेची निवडणुक लढण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा एकमुखाने निर्णय झाला असून निवडणूक लढवावी यासाठी पिंपरी-चिंचवडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधीकारी शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील यांना सकाळी मांजरी इथे जाऊन भेटणार आहेत...
साने खून प्रकरणातील दोन्ही आरोपींची कोठडी संपणार -
मुंबई - एमबीबीएस 22 वर्षीय विद्यार्थीनी सदिच्छा साने खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना शनिवारी न्यायलायत हजार करणार आहेत... या दोन्ही आरोपीने जबाबात कबुली दिली की त्यांनी साने या मुलीला मारून तिला समुद्रात फेकले आहे... या आरोपीना मुंबई गुन्हे शाखाने अटक करून ते 21 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडीत होते... त्यांची कोठडी संपत असून पोलिस आणखी कोठडीची मागणी करण्याची शक्यता.
ठाणे – मनसे अध्यक्ष राज ठाकरे सकाळी 8 वाजता ठाण्यात येत आहेत... यावेळी ते जैन मंदिराला भेट देणार आहेत.
किरीट सोमय्या यांची पत्रकार परिषद -
मुंबई – भाजप नेते किरीट सोमय्या आज सकाळी 11 वाजता मुंलुंडच्या घरी पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यात ते आणखी एका नेत्याच्या भ्रष्टाचाराचे कागदपत्रे समोर आणणार आहेत. त्यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे.
ब्रिजभुषण सिंह यांची चौकशी -
दिल्ली – भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभुषण सिंह यांच्या विरोधात लावलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी इंडियन ऑलिंम्पिक असोसिएशननं सात सदस्याची चौकशी समिती स्थापन केली आहेय या समितीत मेरी कोम, योगेश्वर दत्त, डोला बॅनर्जी, अलकनंदा अशोक, सहदेव यादव आणि दोन विकील असतील. आजपासून चौकशीला सुरुवात होणार आहे.
दिल्ली – काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल आणि जयराम रमेश सकाळी 11.30 वाजता काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेणार आहेत.
भाजपची विजय संकल्प यात्रा -
बेंगलुरू – येत्या काही महिन्यात निवडणुका होणाऱ्या कर्नाटक राज्यात भाजपची विजय संकल्प यात्रा... भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आज या संकल्प यात्रेला हिरवा झेंडा दाखवतील... विजयपुरा मधून सुरू होणारी ही यात्रा पुर्ण राज्यात फिरेल.
भारत-न्यूझीलंड दुसरा सामना -
रायपुर – न्युझीलंड विरोधात तीन वनडे मॅचच्या सिरीजमधील दुसरी मॅच आज होणार आहे. दुसरा सामना जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. तर बरोबरी करण्यासाठी न्यूझीलंडचा संघ मैदानात उतरले. शुभमन गिल याच्या कामगिरीकडे सरर्वांचं लक्ष असेल.
पुणे - महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आणि हिंद केसरी अभिजीत कटके यांचा विरोधी पक्ष नते अजित पवार आणि पुणे राष्ट्रवादीकडून संध्याकाळी 5 वाजता सत्कार होणार आहे.
पिंपरी - भोसरीत खासगी हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी शरद पवार आणि चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती आहे. सायंकाळी 4 वाजता कार्यक्रम होणार आहे.
मिरजेतील तंतुवाद्यांना जीआय मानांकन मिळणार -
सांगली - ‘तंतुवाद्याचे माहेरघर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिरजेतील तंतुवाद्यांना आता जीआय मानांकन मिळणार आहे. जीआय मानांकन मिळणारा तंतुवाद्य हा देशातील पहिलाच वाद्यप्रकार आहे. यामुळे येथे तयार होणाऱ्या विविध वाद्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःची ओळख मिळणार आहे. येथील वाद्यांची नक्कल आता कोणालाही करता येणार नाही. कॉपीराईटचा हक्क त्यांना प्राप्त होईल. वाद्यांच्या परदेशी निर्यातीला मोठा वाव मिळेल. जीएस म्युझिकल्सचे तंतुवाद्यनिर्माते अलताफ मुल्ला, झाकीर मुल्ला यांनी यासाठी पंतप्रधान कार्यालयापर्यंत पाठपुरावा केला होता.
सांगली - खानापुर गावचे सुपुत्र नायब सुभेदार जयसिंग शंकर भगत लेह लडाख मध्ये शहीद झालेत... त्यांच्यावर त्यांच्या मुळगावी सकाळी 11 वाजता शासकिय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
परभणी - अभाविपचे देवगिरी प्रांताचे 57 वे अधिवेशन परभणीत सुरु आहे... अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे... दुपारी 3 ते 5 दरम्यान भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे आणि 5 वाजता सभा होणार आहे.
नाशिक - प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद... पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत वंचीत बहुजन आघाडीचे रतन बनसोडे याच्या प्रचारार्थ पत्रकार परिषद घेत जाहीरनामा प्रकाशीत करणार आहेत.
महंत शाम चैतन्य महाराज पत्रकार परिषद
जळगाव - येत्या पंचवीस ते तीस जानेवारी दरम्यान जामनेर तालुक्यात गोड्री येथे हिंदू गोर बंजारा समाज कुंभ मेळावा आयोजित करण्यात आला आहे... या मेळाव्यावर बंजारा समाजामधील काही संघटना आणि नेत्यांनी आक्षेप घेतला आहे... आज आयोजन समिती मधील महंत शाम चैतन्य महाराज हे पत्रकार परिषद घेणार आहे... मंत्री गिरीश महाजनही या ठिकाणी दुपारी 12 वाजता पाहणी करणार आहेत
सहावं अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन
धुळे - खानदेश साहित्य संघ महाराष्ट्र राज्य धुळे आयोजित सहावं अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन आजपासून दोन दिवस होणार आहे.. या साहित्य संमेलनाचं उद्घाटन होणार असून सकाळी साडेआठ वाजता ग्रंथदिंडी निघणार आहे... अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनाचे मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून या कार्यक्रमाला इटली येथील हेडलबर्ग युनिव्हर्सिटी मधील खानदेश साहित्य संस्कृतीच्या अभ्यासक अलीचे डिफ्लोरियान यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
Beed: शेतकऱ्यांच्या खात्यावरून परस्पर पैसे उचलल्याप्रकरणी शाखा अधिकाऱ्यांसह लेखपाल आणि तपासणीस निलंबित
बीड जिल्ह्यातील चौसाळा येथील डीसीसी बँकेतून 12 शेतकऱ्यांच्या खात्यावरून परस्पर पैसे उचलणाऱ्या शाखा अधिकारी, लेखपाल आणि तपासणीस या तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळाला होता आणि याच शेतकऱ्यांच्या खात्यावरून प्रत्येकी 50 हजार रुपये या कर्मचाऱ्यांनी संगनमत करून परस्पर उचलले होते. या प्रकरणी बीडच्या जिल्हा उपनिबंधकांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर या तीन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
पालघर : डॉक्टर मारहाण प्रकरणी पालघरच्या मनसे ग्रामीण जिल्हा अध्यक्षाला अटक
शिवाजीनगर स्थानकात कामामुळे 22 जानेवारीला गाड्या रद्द होणार
पुणे विभागातील शिवाजीनगर स्थानकावर ट्रॅफिक ब्लॉक घेऊन विविध तांत्रिक कामे करण्यात येणार असून, त्यामुळे रविवार, 22 जानेवारी रोजी गाडी क्रमांक 11007/11008 पुणे-मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेस रद्द राहणार आहे.
पीक विम्याच्या मुद्द्यावरुन हिंगोली जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, गोरेगाव-जिंतूर महामार्गावर जाळपोळ
Swabhimani Shetkari Sanghatana : पीक विम्याच्या मुद्द्यावरुन हिंगोली जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. पिक विमा परतावा मिळावा यासाठी जिल्ह्यातील गोरेगाव इथे उपोषण सुरू आहे. आज चौथा दिवस असूनही प्रशासनाने अद्याप या उपोषणाची दखल घेतली नाही. उपोषणकर्त्यांची तब्येत खालावत चालल्यामुळं संतप्त शेतकऱ्यांनी आज सकाळी गोरेगाव-जिंतूर महामार्गावर जाळपोळ केली. टायर पेटवून देत शेतकऱ्यांनी प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.
साखर कारखान्यांनी इथेनॉलसह CNG हायड्रोजन उत्पादनाचा विचार करावा, शरद पवारांचा कारखानदारांना सल्ला
Sharad Pawar : भविष्यात साखर कारखान्यांना (Sugar factory) सक्षम होण्यासाठी साखरे व्यतिरीक्त इतर उपपदार्थावर लक्ष केंद्रीत करावं लागणार असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं. सध्या देशात साखरेचं (Sugar) मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत आहे. मागणीपेक्षा जास्त साखर उत्पादीत केली जात आहे. त्यामुळं साखरेला किफायतीश दर मिळत नाही, याचा आर्थिक ताण साखर कारखान्यांना सहन करावा लागतो असेही पवार म्हणाले. कारखान्यांनी सीएनजी आणि हायड्रोजन उत्पादनाचा विचार करावा, असा सल्ला शरद पवारांनी साखर कारखानदारांना दिला.