Maharashtra News Updates 15 October 2022 : मनसे प्रमुख राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला, राज ठाकरे वर्षा निवासस्थानी दाखल
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू...
आजपासून अंधेरी पूर्व निवडणुकीचा प्रचार सुरू
विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप विरुद्ध उद्धव ठाकरे यांची शिवसेना असा थेट सामना होत आहे.शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा रमेश लटके यांच्या प्रचाराची सुरुवात त्यांच्या निवासस्थानापासून होणार आहे. तर भाजपच्या मुरजी पटेल यांच्या प्रचाराची सुरुवातही आज होणार आहे.
प्राध्यापक साईबाबा यांच्या मुक्ततेविरोधातील याचिकेवर सुनावणी
प्राध्यापक साईबाबा यांच्या सुटकेविरोधात दाखल याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं जी. एन साईबाबाची निर्दोष मुक्तता केली होती. त्याविरोधात राज्य सरकारने दाखल याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक साईबाबा यांची उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. 2010 मध्ये माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून साईबाबा यांना 2013 गडचिरोली पोलीसांनी अटक केली होती.
ज्ञानवापी मशिदीतील शिवलिंग पूजेसंबंधी याचिकेवर सुनावणी
वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीतील शिवलिंगाच्या नियमित पूजेसाठी दाखल याचिकेवर आज वाराणसी कोर्टात सुनावणी होणार आहे.
लातूर जिल्ह्यातील मांजरा धरण 95 टक्के भरलं, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
लातूर शहराला पाणीपुरवठा करणारं मांजरा धरण 95 टक्के भरले आहे. मांजरा धरणाच्या कॅचमेंट एरियामध्ये मागील काही दिवसापासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे धरणात येणारा पाण्याचा जोर वाढलाय. आज कोणत्याही क्षणी मांजरा धरण 100 टक्के भरण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर धरणातून विसर्ग करण्यात येणार आहे. नदीकाठील 152 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन विभागाला सर्व सूचना करण्यात आल्या आहेत.
शिवसेनेच्या विरोधात समता पक्ष न्यायालयात जाणार
शिवसेनेच्या मशाल चिन्हाविरोधात समता पक्ष आज कोर्टात जाणार आहे. मशाल चिन्ह अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरेंना देऊ नये अशी समता पक्षाची मागणी आहे. समता पक्ष समता पक्ष आज दिल्ली हायकोर्टात आपलं म्हणणं मांडणार आहे.
आजही राज्यात पावसाचा अंदाज
महाराष्ट्रातील मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. काल मान्सून उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागातून माघारी परतला आहे. पुढील तीन ते चार दिवसात मान्सून आणखी काही भागातून माघारी फिरेल. मात्र तोपर्यंत उर्वरीत महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. ज्यामुळे कापणीला आलेल्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची उस परिषद
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आज 21 वी ऊस परिषद होणार आहे. महाविकास आघाडीला सोडल्यानंतर स्वाभिमानीची ही पहिलीच ऊस परिषद आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी काय भूमिका घेतात हे पहावं लागेल.
सदावर्ते यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली
गुणरत्न सदावर्ते यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस आणि लव्ह जिहाद या विषयावर चर्चा झाल्याचं समजते.
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दोन तास बैठक, नुकसान भरपाईसंदर्भात लवकरच मोठ्या घोषणेची शक्यता
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दोन तास बैठक, नुकसान भरपाईसंदर्भात लवकरच मोठ्या घोषणेची शक्यता
स्वाभिमानीच्या ऊस परिषदेला रविकांत तुपकर यांची गैरहजेरी
स्वाभिमानीच्या ऊस परिषदेला रविकांत तुपकर यांची गैरहजेरी
स्वाभिमानी पासून रविकांत तुपकर यांनी फारकत घेतल्याची चर्चा
तब्येत बरी नसल्याने उपस्थित राहिलो नाही अशी तुपकरांची एबीपी माझाला माहिती
अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक
अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक
भाजपाच्या वतीने अंधेरी मतदार संघातील प्रत्येक वार्डची आमदारांना जबाबदारी
अंधेरीतील 10 वॉर्डसाठी भाजपचे दहा आमदार मैदानात
पोलिंग बॉइथची जबाबदारी भाजपच्या माजी नगरसेवकांवर
मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नेतृत्वात भाजपचे प्रमुख आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक
बैठकीसाठी मुंबई प्रभारी आमदार अतुल भातकळकर, विधान परिषद गटनेते प्रवीण दरेकर, प्रतोद प्रसाद लाड, आमदार योगेश सागर, मनिषा चौधरी, पराग अळवणी, अमित साटम, कँप्टन तमिल सेलवन, यांच्यासह जिल्हा अध्यक्ष यांची खलबतं
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सत्कार सोहळ्यासाठी रिक्षा रॅली
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भव्य सत्कार सोहळा ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे अध्यक्ष डॉ शंकर पवार यांच्यावतीने 16 ऑक्टोबर 2022 रोजी हायलँड ढोकाळी मैदानात आयोजित करण्यात आले असून दुपारी 3 वाजता चेकनाका कोपरी ते हायलँड मैदान ढोकाळी अशी रिक्षा रॅली काढण्यात येणार आहे, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रिक्षा रॅलीमधून मैदानात पोहोचणार आहे. रॅलीमध्ये 300 रिक्षा, 200 बाईक चा समावेश असणार आहे