Maharashtra Breaking News Live Updates : कारस्थानी लोकांनी बाळासाहेबांचं हिंदुत्व गोठवलं; उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर टीका 

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा ब्युरो Last Updated: 09 Oct 2022 06:28 PM
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी सांगितली ही तीन चिन्हं आणि पक्षाची तीन नावं

उद्धव ठाकरे यांनी येत्या निवडणुकीसाठी पक्षाची तीन नावं आणि चिन्हांचे तीन पर्याय दिले आहेत. 


तीन चिन्हं 
1. उगवता सूर्य
2. त्रिशूल
3. मशाल


पक्षाची तीन नावं
1. शिवसेना बाळासाहेब ठाकरे 
2. शिवसेना प्रबोधनकार ठाकरे 
3. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे  

Uddhav Thackeray : मी कुठेही डगमगलो नाही, माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे; उद्धव ठाकरे

मिंधे गटाचा हेतू हा शिवसेनेला संपवण्याचा आहे, पण मी कुठेही डगमगलो नाही. कारण माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

Uddhav Thackeray : कारस्थानी लोकांनी बाळासाहेबांचं हिंदुत्व गोठवलं; उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर टीका 

काही कारस्थानी लोकांनी बाळासाहेबांचे हिंदुत्व गोठवलं असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर केला आहे. निष्ठा ही विकत घेता येत नाही हे परवाच्या मेळाव्यावरुन स्पष्ट झालं असंही ते म्हणाले. 

धुळे : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 44 हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान

धुळे शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे याचा फटका शेतकऱ्यांना बसला असून यामुळे हातात तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचा वातावरण निर्माण झाला आहे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 171 गावातील 44 हजार 538 शेतकऱ्यांना फटका बसला असून जवळपास 44 हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे यात कापूस सोयाबीन मका यासह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढला असून कापूस पूर्णपणे सडून गेल्याने शेतकऱ्यांवर या अतिवृष्टीमुळे संकट ओढावले आहे.शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीची प्रतीक्षा लागली असून त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

धुळे : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 44 हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान

धुळे शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे याचा फटका शेतकऱ्यांना बसला असून यामुळे हातात तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचा वातावरण निर्माण झाला आहे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 171 गावातील 44 हजार 538 शेतकऱ्यांना फटका बसला असून जवळपास 44 हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे यात कापूस सोयाबीन मका यासह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढला असून कापूस पूर्णपणे सडून गेल्याने शेतकऱ्यांवर या अतिवृष्टीमुळे संकट ओढावले आहे.शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीची प्रतीक्षा लागली असून त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

लातूर : कार-ट्रकच्या भीषण अपघात, दोन ठार, चार गंभीर जखमी

तुळजाभवानीचे दर्शन करून हैदराबादकडे निघालेल्या भाविकांची कार आणि लातूकरकडे जाणाऱ्या ट्रकचा समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील वडील आणि मुलगी ही जागीच ठार झाले तर चार गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना लातूरला हलविण्यात आले आहे. ही घटना सकाळी वाघोली पाटीजवळ घडली....

कोकण कन्या, मांडवी एक्सप्रेस आजपासून विजेच्या इंजिनवर

कोकण रेल्वेमार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर हळूहळू पॅसेंजर गाड्या विजेवर चालवण्यास आरंभ झाला आहे. मत्स्यगंधा, नेत्रावतीपाठोपाठ कोकणकन्या आणि मांडवी एक्सप्रेस विजेवर धावणार आहे. प्रदूषणमुक्त आणि वेगवान प्रवासासाठी विजेवर धावणार्‍या इंजिनचा उपयोग होणार आहे.जानेवारी २०२३ पासून कोकणकन्या एक्सप्रेसला सुपरफास्टचा दर्जा देण्यात येणार असल्याने तिच्या प्रवासात काही कालावधीची बचत होणार आहे. या गाडीचा क्रमांक बदलणार आहे. कोकण रेल्वेच्या ७४१ किलोमीटर मार्गाचे शंभर टक्के विद्युतीकरण मार्च महिन्यात पूर्ण झाले होते. आतापर्यंत सर्व गाड्या डिझेल इंजिन जोडून सोडल्या जात होत्या. विद्युतीकरण पूर्ण झाल्यानंतर सुरवातीला मालगाड्या विजेच्या इंजिन लावून चालवण्यात आल्या. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर उर्वरित गाड्या सोडल्या जात आहेत. आतापर्यंत पाच गाड्या विजेवर धावत आहेत.

उद्धव ठाकरे संध्याकाळी सहा वाजता संवाद साधणार

#Breaking : उद्धव ठाकरे संध्याकाळी सहा वाजता संवाद साधणार आहेत. सोशल मिडीयाच्या माध्यमातून ते जनतेसी संवाद साधतील. यावेळी ते आपली पुढची भूमिका काय ते सांगणार आहेत.

नाशिक : बसमधील बस अग्नितांडव प्रकरण, मृतांच्या नावात आणि आकडेवारीत घोळ
नाशिकमधील बस अग्नितांडवाच्या घटनेने महाराष्ट्र सुन्न झालाय. बारा प्रवाशांचा होरपळून यात मृत्यू झालाय. मात्र एबीपी माझाच्या पाहणीत एक धक्कादायक बाब समोर आली असून मृतांच्या नावात आणि आकडेवारीत काही घोळ झालाय का? असा प्रश्न आता उपस्थित होतोय. जिल्हा रुग्णालय प्रशासनामार्फत शनिवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीत बारा मृतांपैकी ओळख पटलेल्या 8 जणांची नावे देण्यात आली होती. यामध्ये बुलढाण्यातील लोणार तालुक्यातील विधी गावच्या मुधोळकर कुटुंबातील पार्वती, लक्ष्मीबाई आणि कल्याणी या तिघांचा मृत्यू झाल्याच नमूद करण्यात आलं होतं मात्र पोलीस तपासात प्रत्यक्षात लक्ष्मीबाई नावाच्या कोणीच महिला या जखमी किंवा मृत नाहीत. लक्ष्मीबाई नावा प्रमाणेच आणखी दुसरा घोळ म्हणजे शंकर कुचनकर आणि अजय कुचनकुमार हे दोघे मयत असल्याचं जिल्हा रुग्णालयाच्या यादीत उल्लेख असतांना प्रत्यक्षात मात्र अजय कुचनकुमार या नावाचे कोणीही जखमी किंवा मृत नाहीत. दरम्यान नाशिक जिल्हा शल्य चिकित्सकांनी याबाबत स्पष्टीकरण देत चूक मान्य केली असली तरी मात्र ही नक्कीच गंभीर बाब असून आरोग्य सेवा आयुक्त तुकाराम मुंढे याची दखल घेणार का ?  

 
छत्रपती संभाजी राजेंच्या स्वराज्य संघटनेचे रायगड जिल्ह्यात 100 शाखांचं उदघाटन

छत्रपती संभाजी राजे यांनी स्थापन केलेल्या स्वराज्य संघटनच्या 100 शाखांचे रायगड जिल्ह्यात धुमधडाक्यात उदघाटने करण्यात आली. संभाजी राजे यांनी या शाखांचे उदघाटने केली. पनवेल आणि रायगड जिल्ह्यात स्वराज्य  संघटनेच्या 100 शाखांचा यात समावेश आहे. ‘गांव तिथे स्वराज्य‘ या संकल्पनेला घेवून आपण काम करीत असल्याचे संभाजी राजे यांनी सांगितले. मराठा आंदोलनात मुलांवर दाखल झालेल्या केसेस लवकर परत घ्याव्यात अशी मागणी राजेंनी केली आहे. दरम्यान शिवसेना पक्ष आणि चिन्ह न वापरण्याचा निकाल निवडणूक आयोगाने दिला आहे. यावर राजेंना विचारले असता अधिक न बोलता तो त्यांचा अंतर्गत प्रश्न असल्याचे सांगितले.

चिन्ह गोठवल्याने निष्ठा गोठवता येत नाही : रोहित पवार

शिवसेनेचे चिन्ह गोटवण्याचा निर्णय हा अपेक्षित होता, काही दिवसांपूर्वी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्य केलं होतं की शिवसेना फोडण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले होते, प्लॅनिंग केलं होतं. जर भाजपचा एवढा मोठा नेता असं वक्तव्य करत असेल तर शिवसेना संपवावी असा विचार काही लोकांचा असावा पण आपण चिन्ह गोठवू शकतो. मात्र, आस्था, विचार , निष्ठा गोठवता येत नाही असं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी भाजपवर निशाणा साधला आहे. शिवसेनेचे चिन्ह गोठवल्याने देशात लोकशाही जिवंत आहे का? असा विचार येतो. पण चिन्ह गोठवल्याने शिवसेना संपली असं होतं नाही उलट शिवसैनिक आणखी जोमाने कामाला लागतील असा विश्वासही रोहित पवारांनी व्यक्त केला.

कल्याण : दोघांच्या भांडणात वर्षानुवर्षाची पुण्याई गोठवली गेली : एकनाथ खडसे

दोघांच्या भांडणात वर्षानुवर्षाची पुण्याई गोठवली गेली, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. आयुष्यभर बाळासाहेबांनी जी मेहनत केली आणि ज्या धनुष्यबाणाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली, ज्या धनुष्यबाणाच्या जोरावर या महाराष्ट्रामध्ये अनेक सत्ता केंद्रांवर त्यांनी सत्ता काबीज केली. महाराष्ट्र सरकारमध्ये त्यांचे मुख्यमंत्री झाले आणि ही जी वर्षानुवर्षाची पुण्याई आहे, ती दोघांच्या भांडणांमध्ये गोठवली गेली, मला वाटतं यापेक्षा दुर्दैवी प्रसंग नसावा, वाडवडिलांनी आयुष्यभर कमवलं ते एका मिनिटांमध्ये मुलांनी घालवलं. याला कोण जबाबदार आहे, कोण नाही हे तर निवडणूक आयोगाचा निर्णय आल्यावर समजेल. परंतु तात्पुरता का होईना निवडणूक चिन्ह गोठवणं ही अत्यंत दुखद गोष्ट आहे आणि क्लेशदायक असल्याचे खडसे म्हणाले. शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाबाबत एकनाथ खडसे यांनी ही खंत व्यक्त केली.

Washim Cyber Crime : रेड बस बुकिंगच्या नावाने प्रवाशांची फसवणूक, बनावट नंबर वापरून ट्रॅव्हल्सचा वापर.
नागपूर पुणे प्रवाशी वाहतूक करणाऱ्या ज्योतिबा ट्रॅव्हल्स पुण्यासाठी जात असताना कारंजा येथील हॉटेलवर ट्रॅव्हल्सच्या बनावट नंबर असल्याचं लक्षात येत असल्याचा शंका काही प्रवाशांना आली आणि नंबरमध्ये  काही बदल केल्याचे सुज्ञ नागरिकांच्या लक्षात आले. याची माहिती वाशिम पोलिसांना दिल्यानंतर लगेच पोलिसांनी शेलू बाजार येथे या गाडीला थांबून नंबर बदलल्यासंबंधी विचारपूस केली. तेव्हा वाहक आणि चालक यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच गाडीची मूळ कागदपत्र संबंधित अधिकाऱ्यांना दाखवण्यात आले नाही. त्यामुळे या ट्रॅव्हल्सला मंगरूळपीर पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आले. या ट्रॅव्हल्समध्ये असलेल्या प्रवाशांना पोलीस कर्मचाऱ्यांच्या आणि अधिकाऱ्याच्या मदतीने इतर ट्रॅव्हल्समध्ये पुढील प्रवासाकरिता बसवून देण्यात आले.
Wardha Murder : ट्रक चालकाची हत्या करत आरोपने चोरला ट्रक
तळेगाव येथे शुक्रवारच्या मध्यरात्री नागरिक गाढ झोपेत असतांना येथील प्रसिद्ध सत्याग्रही घाटाच्या परीसरात मात्र खुनाचा थरार घडलाय, धक्कादायक म्हणजे मारेकरी हत्या करूनच थांबले नाही तर खून केल्यावर ज्या ट्रक चालकाचा खून केला आणि ट्रकच चोरून नेल्याची दुर्दैवी आणी तितकीच भयानक घटना घडली आहे. या घटनेने जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे..चक्रधरसिंह रामसजीवनसिंह असं मृत चालकाचं नाव आहे. आरोपी सुनिल गामा भारव्दाज रा. वलनी खदान सावनेर जि. नागपूर ह्याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.. तर विकास उर्फ ईसरार शेख रा.ह.मु. कारंजा (घा) जि. वर्धा याच्या शोधात पोलीस आहेत.
नंदुरबार : आश्रम शाळेतील अधिक्षेकचा विनयभंग करणारा शिक्षण अधिकारी निलंबित
नंदुरबार आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची सहल काढण्यात आली होती. या सहली दरम्यान नंदुरबार आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात कार्यालयात कार्यालयात शिक्षण विस्तार अधिकारी असलेल्या राजेंद्र मुसळे यांनी प्रवासादरम्यान शहादा तालुक्यातील एका आश्रम शाळेवर कार्यारत असलेल्या महिला वस्तीगृह अधिक्षिकेचा विनयभंग केल्याची खळबळजनक  घटना घडली होती. याप्रकरणी पीडित महिलेने पोलीस स्टेशनला शहादा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी आरोपी शिक्षण विस्तार अधिकारी मुसळे यांना अटक करून न्यायालयात हजर केलं होतं. त्याला न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. मात्र आदिवासी विकास विभागाच्या वतीने या अधिकाऱ्याची विभागीय चौकशीही करण्यात येऊन त्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नंदुरबार आदिवासी विकास विभागाच्या चौकशीत मुसळे प्रथम दर्शनी दोषी असल्याचे दिसून येत असल्याचा अहवाल दिला होता. त्यानंतर अप्पर आयुक्त यांनी त्यांना निलंबित केलं आहे.
Wardha : सिंदी रेल्वे स्थानकावर आजपासून जबलपूर एक्सप्रेस चा थांबा
सिंदी रेल्वे येथे जबलपूर-अमरावती-जबलपूर  एक्सप्रेसचा थांबा आजपासून सुरू झाला आहे. आज सायंकाळी रेल्वेगाडी स्थानकावर आल्यावर ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत सिंदीवासियांनी रेल्वेचे स्वागत केले आहे. यावेळी खासदार रामदास तडस आणि आमदार समीर कुणावार यांच्यासह मोठ्या संख्येने सिंदिवासी उपस्थित होते.
विरोधी पक्षनेते अजित पवार बारामती दौऱ्यावर

विरोधी पक्ष नेते अजित पवार हे आज बारामती दौऱ्यावर असून तालुक्यातील सोमेश्वरनगर परिसरातील विविध विकास कामांचे उद्घाटन भूमिपूजन पवार यांच्या हस्ते होत आहेत. वाघाळवाडी येथील बालाजी मशरूम त्यानंतर आता सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या संकुलातील विविध कॉलेज तसेच मुलींच्या गर्ल्स हॉस्टेलच्या इमारतीचे उद्घाटन विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. तर 11 वाजता श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना आणि दुपारी अडीच वाजता माळेगाव सहकारी साखर कारखाना यांच्या गळीत हंगामाचा शुभारंभ देखील पवार यांच्या हस्ते आज होणार आहे. यावेळी अजित पवार शेतकरी मेळाव्यात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

नंदुरबार : अचानक आरोग्य केंद्र आणि रुग्णालयांची तपासणी, 63 कर्मचारी आणि 13 वैद्यकीय अधिकारी आढळले गैरहजर
नंदुरबार जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील वैद्यकीय सेवा देणाऱ्या रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांची अचानक तपासणी करण्यात आली या तपासणीत तब्बल 63 कर्मचारी आणि 13 अधिकारी गैरहजर असल्याचे दिसून आले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या वतीने आठ पथके तयार करून 35 ठिकाणी तपासणी करण्यात आली .यात हे वास्तव समोर आले. तुकाराम मुंढे यांनी राज्याच्या आरोग्य सचिव पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अचानक तपासणीसाठी पथके तयार करण्याची निर्देश दिले होते त्यानुसार जिल्ह्यात पथके तयार करून अचानक करण्यात आलेल्या तपासणी हे वास्तव समोर आले आहे तर दुसरीकडे तपासणी करून काय साध्य होणार आहे अगोदर जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरावीत अशी मागणी कर्मचारी संघटनेने केली आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने अचानक तपासणी मोहीम सुरू झाल्याने दांडी बहाद्दर कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे जिल्ह्यात दुर्गम भागात आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या या मोहिमेचा मोठा फायदा होईल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. दिवसभर या तपासणी मोहिमेसंदर्भात कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा रंगल्याचे चित्र दिसून येत आहे.
बहुचर्चित ठरलेल्या महिला न्यायाधीशांची अखेर मुंबईत बदली
वर्धा : वर्ध्याच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयातील न्यायाधीश मोनिका आरलंड यांची 7 ऑक्टोंबरच्या आदेशानुसार मुंबई येथे बदली करण्यात आली आहे. वर्धा वकील संघाच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना निवेदन सादर करण्यात आलं होतं त्यामुळे हा विषय बहूचर्चित ठरला होता. बदलीसांदर्भात लेखी सूचना वर्धा येथील जिल्हा आणि सत्र न्यायालय प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महिला न्यायाधीश मोनिका आरलंड यांनी त्यांच्या वर्धा येथील कर्तव्यकाळात न्यायदानाचे काम करताना अनेक महत्त्वपूर्ण निकाल दिलेत. असे असले तरी त्यांच्या कार्यप्रणालीवर ठपका ठेवत वर्धाच्या वकील संघाने त्यांच्याविरुद्ध कार्यवाहीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना निवेदन दिल्याने हा चर्चेचा विषय ठरला.
शिवसेना नेते अनिल देसाई दिल्लीहून लाईव्ह

निवडणूक आयोगाचा निकाल अनाकलनीय आणि अनपेक्षित - शिवसेना नेते अनिल देसाई दिल्लीहून लाईव्ह





Nashik Bus Accident Update : नाशिक बस दुर्घटनेप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल, ट्रकचालकास अटक

Nashik Bus Fire : नाशिक शहरातील औरंगाबाद (Nashik Bus Accident) रोडवरील मिरची हॉटेलजवळ शनिवारी भीषण अपघात झाला. या अपघातात लक्झरी बसने पेट घेतल्यात त्यामध्ये होरपळून 12 जणांचा मृत्यू झाला. या अपघात प्रकरणी आडगाव पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून ट्रक चालकाला शनिवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे.  


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा.

विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या हस्ते कारखान्याचा गळीत शुभारंभ

मालेगाव सहकारी साखर कारखान्याची नुकतीच सर्वसाधारण वार्षिक सभा संपन्न झाली. आज याच कारखान्याचा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या हस्ते गळीत शुभारंभ होणार आहे. कारखान्याने आवाजी मतदानाने दहा गावातील सभासदांना सामावून घेण्याचा विषय मंजूर केला. यामुळे भाजपाच्या विरोधी गटाने याला तीव्र विरोध केला आहे. त्यामुळे आज होणाऱ्या गळीत शुभारंभाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Hingoli MSEB : वीज कनेक्शन तोडायला गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्याला जबर मारहाण 
बिल न भरल्याने विद्युत जोडणी तोडण्यासाठी गेलेल्या अभियंता आणि महावितरण कर्मचाऱ्याला औंढा नागनाथ शहरात रॉडने जबर मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. औंढा नागनाथ शहरात असलेल्या एका चहा नाश्ता हॉटेलचे एकूण 8 हजार रुपये वीज बिल थकीत होते  बिलाची मागणी करण्यासाठी महावितरणकडून तगादा लावण्यात आला होता, परंतु बिल भरले जात नव्हते अखेल काल महावितरणचे अभियंता आणि महावितरण कर्मचारी बिल न भरल्याने विद्युत कनेक्शन तोडणीसाठी गेले असता विद्युत जोडणी का तोडत आहेत या रागातून कैलास पाचमासे त्यांची पत्नी आणि मुलाने अभियंता आणि महावितरण कर्मचाऱ्याला रॉडच्या सहाय्याने जोरदार मारहाण केली आहे यात अभियंता निरज रणवीर यांच्या तक्रारीवरून औंढा नागनाथ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Ahmednagar Train Cancel : नगर रेल्वे स्थानकातून जाणाऱ्या 10 रेल्वे गाडया रद्द
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागांतर्गत असलेल्या दौंड-मनमाड रेल्वे दुहेरी मार्गाचे काम हाती घेण्यात आल्याने 18 ऑक्टोबरपर्यंत नगर स्थानकातून पुढे जाणाऱ्या आणि येणाऱ्या 10 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. काही रेल्वे मार्ग बदलण्यात आले आहेत.

 
Gujrat Sabarmati Hub : साबरमती स्टेशनवर होणार मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट हब
गुजरातमधील साबरमती स्टेशनला आता नवीन ओळख प्राप्त होणार आहे. या ठिकाणी बुलेट ट्रेन स्टेशन तर असेलच पण भारतात कुठेही नसलेले मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट हब देखील उभारण्यात आले आहे. या हब मधून एकच वेळी बुलेट ट्रेन, मेट्रो, रेल्वेचे 2 स्टेशन आणि बससाठी बी आर टी एस कडे जाता येईल. सोबत शॉपिंग आणि वेगवेगळ्या मेन्यूचा आस्वाद देखील घेता येईल. 
अकोला : क्रूझरची दुचाकीला धडक, एक ठार, दोघे गंभीर जखमी
अकोला येथे दुचाकीवर देवी विसर्जनासाठी जात असताना क्रूझर वाहनाची धड़क लागल्याने भीषण अपघात झालाय, या अपघातात एक जण ठार, तर दोन जण जखमी झाले आहेत. जखमींना अकोल्यातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, अपघातात मित्राचा मृत्यू झाला याची बातमी समजतात त्याच्या साथीदारांनी घटनास्थळ गाठले. अन् अपघाताला कारणीभूत ठरलेल्या क्रूझर वाहनाला पेटवून दिले.  आज शनिवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास अकोला-अकोट मार्गावरील वल्लभनगर गावाजवळ ही घटना घडली. 
Palghar : आश्रम शाळेतील विद्यार्थिनीचा मृत्यू
डहाणू आदिवासी विकास प्रकल्पा अंतर्गत तलासरी तालुक्यातील उधवा कासपाडा येथील शासकीय आश्रम शाळेत सहावीत शिकणाऱ्या मिताली सुरेश चौधरी या 13 वर्षीय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मिताली चौधरी ही चिमुकली विद्यार्थीनी उधवा केवडीपाडा येथील रहिवासी असून ती या आश्रम शाळेत निवासी विद्यार्थिनी म्हणून राहत होती. 5 ऑक्टोबर रोजी पहाटे पाच वाजताच्या सुमारास मितालीची तब्येत अचानक बिघडल्याने तिला उधवा आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र तिची प्रकृती खालावल्याने तिला खानवेल येथील जिल्हा रुग्णालयात नेत असतानाच तिचा रस्त्यात रुग्णवाहिकेतच दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून मितालीच्या मृत्यूने आदिवासी विकास प्रकल्पांचा भोंगळ कारभार आणि ग्रामीण भागात असलेली आरोग्य व्यवस्थेची दुरावस्था पुन्हा एकदा समोर आली आहे.
PM Modi Gujrat Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून गुजरात दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत.  9 ऑक्टोबर रोजी, संध्याकाळी 5:30 वाजता, पंतप्रधानांच्या हस्ते मेहसाणामधील मोढेरा येथे अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी होणार आहे. त्यानंतर मोधेश्वरी माता मंदिर येथे संध्याकाळी 6:45वाजता  देवीचे दर्शन घेऊन पूजा अर्चना करतील.  त्यानंतर साडे सात वाजता सूर्य मंदिराला भेट देतील.

पार्श्वभूमी

 ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो.


दोन्ही गटाकडून बैठकीचं आयोजन - 
निवडणूक आयोगानं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं तसेच शिवसेना नाव वापरण्यावरही निर्बंध लावण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्णायानंतर दोन्ही गटाकडून बैठकीचं आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पुढील रणनीतीवर चर्चा होणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णायानंतर उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर  दुपारी साडेबारा वाजता मातोश्रीवर बैठक बोलवली आहे. तर रविवारी वर्षा बंगल्यावर शिंदे गटाची संध्याकाळी सात वाजता बैठक होणार आहे. बैठकीला सर्व महत्वाचे नेते हजर राहणार आहेत. दरम्यान, सोमवारी दोन्ही गटाला पक्ष चिन्ह आणि नावाचा निर्णय होणार आहे.


कोजागरी पौर्णिमा -
आज कोजागरी पौर्णिमा आहे. त्यानिमित्त खान्देश कुलस्वामिनी श्री एकविरा देवी मंदिरात 56 भोग लावण्यात येणार आहे. तसेच मंदिर परिसरात दिवे लावण्यात येणार आहे. अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागरी पौर्णिमा (Kojagari Purnima 2022) म्हणतात. कोजागरी पौर्णिमेलाच काही ठिकाणी कोजागिरी पौर्णिमा (Kojagiri Purnima) तर काही लोक कोजागर पौर्णिमा (Kojagar Purnima) असे म्हणतात. कोजागरी पौर्णिमा शरद पौर्णिमा, आश्विन पौर्णिमा किंवा कौमुदी पौर्णिमा अशा वेगवेगळ्या नावांनी देखील ओळखली जाते. या दिवशी कोजागरी पौर्णिमा 9 ऑक्टोबर रोजी साजरी केली जाणार आहे. 


ईद-ए-मिलाद - 
आज देशभरा ईद-ए-मिलाद सण साजरा केला जाणार आहे. प्रेषित मोहम्मद यांच्या जन्मदिवसाच्या स्मरणार्थ ईद-ए-मिलाद साजरा केला जातो. याला मिलाद ऊन नबी असेही म्हटले जात आहे. 


सात मृतदेहाची ओळख पटली -
नाशिक येथील बस दुर्घटनेतील सात मृतदेहाची ओळख पटलेली आहे. अजूनही काही मृतांची ओळख पटलेली नाही, आज काही मृतांचे नातेवाईक नाशिकमध्ये येणार आहेत. त्याशिवाय विरोधीपक्ष नेते अजित पवार नाशिकमध्ये येण्याची शक्यता आहे.  


अजित पवार बारामती दौऱ्यावर -
विरोधी पक्षनेते अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर असणार आहेत. बारामती तालुक्यातील सोमेश्वर नगर येथे विविध ठिकाणी उद्घाटन अजित पवारांच्या हस्ते होईल. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या 61 व्या गळीत हंगामाचे मोळी पूजन अजित पवारांच्या हस्ते होणार आहे. तसेच हंगाम शुभारंभ निमित्ताने अजित पवार शेतकरी मेळावा घेणार आहेत. 


कास महोत्सव शेवटचा दिवस - 
आज कास महोत्सवाचा शेवटचा दिवस आहे. शंभूराज देसाई आणि उदयनराजे एकत्र कास महोत्सव येथे जाणार आहेत. 


जगदंबा देवीचा "शांती उत्सव" -
आजपासून खामगाव शहरात आराध्य दैवत असलेल्या जगदंबा देवीचा "शांती उत्सव" सुरू होत आहे, संपूर्ण भारतात नवरात्री नंतर कोजागिरी पौर्णिमा ते पुढील दहा दिवस हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. कोरोना नंतरच्या दोन वर्षांच्या कालखंडानंतर हा उत्सव साजरा करण्यात येत आहे. देवीची स्थापना झाल्यावर हा उत्सव 20 ऑक्टोबर पर्यंत सुरू असेल.. परिसरात हा उत्सव "मोठी देवी उत्सव " म्हणून प्रसिद्ध आहे.


माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा 66 गळीत हंगाम, अजित पवारांची उपस्थिती  - 


माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या 66 गळीत हंगामाचे मोळी पूजन अजित पवारांच्या हस्ते होणार आहे. 30 सप्टेंबर रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या हद्दीतील 10 गावे माळेगाव सहकारी साखर कारखान्याला जोडण्याचा निर्णय आवाजी मतदानाने संचालक मंडळाने घेतला आहे. या निर्णयाला सभासदांनी कडाडून विरोध केला होता. मागील वर्षी अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला होता. अनेक सभासदांचा ऊस कारखान्याला जायला उशीर झाला.. त्यामुळे ही नवीन 10 गावे जोडू नका असे सभासदांनी सांगितले तरी देखील आवाजी मतदानाने संचालक मंडळाने निर्णय घेऊन सभा गुंडाळली होती. वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळ पाहायला मिळाला होता.. या 10 गावांचा फायदा कारखनायच्या निवडणुकीत करून घेण्यासाठी हा घाट घातल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.  मोळी पूजनाच्यावेळी अजित पवार काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे. विरोधी पक्ष नेत्याने लोकशाही जिवंत ठेवावी यासाठी जनमत लक्षात घेऊन पुढील निर्णय घ्यावा असे आवाहन मीडियाच्या माध्यमातून माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजन तावरे यांनी केलं आहे. त्यामुळे अजित पवारांच्या उद्याच्या सभेकडे सभासदाचे लक्ष लागले आहे.


शिवाजीराव पंडित यांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा..


माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांच्या 85 शिवाय वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा साजरा होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाला रावसाहेब दानवे पाटील, श्रीनिवास पाटील धनंजय मुंडे आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित असतील हा कार्यक्रम गेवराई शहरातील आर बी अट्टल महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये सकाळी 11 वाजता होईल. 


अमित ठाकरे नांदेड दौऱ्यावर -
राज ठाकरे यांचे सुपुत्र व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे आज नांदेड जिल्हा दौऱ्यावर. महासंपर्क अभियानातून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची पुनर्बांधणी करण्यासाठी अमित ठाकरे यांचा दौरा.


 पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून गुजरात दौऱ्यावर -


पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत.  9 ऑक्टोबर रोजी, संध्याकाळी 5:30 वाजता, पंतप्रधानांच्या हस्ते मेहसाणामधील मोढेरा येथे अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी होणार आहे. त्यानंतर मोधेश्वरी माता मंदिर येथे संध्याकाळी 6:45वाजता  देवीचे दर्शन घेऊन पूजा अर्चना करतील.  त्यानंतर साडे सात वाजता सूर्य मंदिराला भेट देतील.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.