चिपळूण : मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण नजीकचा परशुराम घाट येत्या 20 एप्रिलपासून परशुराम घाट वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे.  महामार्ग रुंदीकरच्या कामासाठी दुपारी 12 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद असणार आहे. हलक्या वजनाच्या गाड्यांची वाहतूक पर्यायी कळबस्ते मार्गाने  वळवण्यात येणार आहे. तर जड वाहनांची वाहतूक दुपारी 12 ते संध्याकाळी 5 पूर्ण बंद राहणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. 


मुंबई गोवा महामार्ग कोकणच्या नागमोडी वळणाचा. डोंगरदऱ्यातून तयार केलेला हा महामार्ग.  काही वर्षांपूर्वी याच महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात झाली. त्यानंतर अनेक ठिकाणी अडचणी आल्या.  पावसाळ्यात या ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्याने मोठा धोका निर्माण झाला होता. त्यातच आता काही ठिकाणी रस्ता खचू लागल्याने हा मार्ग धोकादायक बनला आहे. त्यामुळे परशुराम घाटाचे पावसाळ्यापुर्वी काम जलद गतीने पुर्ण होण्यासाठी हे प्रयत्न केले जात आहे. 


पावसाळ्यात परशुराम घाटातील दरड कोसळून पाया लगतच्या पेढे गावातील तीन जणांचा मृत्यू झाला होता. तसेच येथील सहा घरांना फटका बसला होता. मात्र अजूनही धोका कायम आहे. या घाटाच्या खालील बाजूला मोठी वस्ती आहे. या घरांसाठी दिवसेंदिवस धोका वाढत चालला आहे. त्यामुळे याप्रश्नी प्रशासनाने वेळीच लक्ष घालून ठोस निर्णय देण्याची मागणी केली जात आहे. या मार्गावरून सतत वाहनांची वर्दळ सुरु असते.  त्यामुळे या भागाकडे वेळीच लक्ष न दिल्यास हा भाग कोसळून दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे. 


संबंधित बातम्या :


अखेर चिपळूण, महाडची गाळाच्या रॉयल्टीतून सुटका; कोकणवासियांना होणार फायदा