Loudspeaker Controversy in Maharashtra : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठण करण्याबाबतच्या वक्तव्यानंतरल राज्यभरात हनुमान चालिसा पठणावरुन महाभारत सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना (CM Uddhav Thackeray) आव्हान दिलं आहे. उद्या हनुमान जयंती निमित्त मुख्यमंत्र्यांनी मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचावी, असं रवी राणा यांनी म्हटलं आहे. जर मुख्यमंत्र्यांनी हनुमान चालिसा वाचली नाही, तर मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा वाचणार असल्याचा इशाराही राणा यांनी दिला आहे. 


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 3 मे पर्यंत मशिदीवरचे भोंगे न उतरवल्यास देशभर हनुमान चालिसा वाजवू असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे. मनसेच्या सूरात सूर मिसळत भाजपही हनुमान चालिसा मुद्द्यावरून आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. उद्याच्या हनुमान जयंतीला भाजप नेते मोहित कंबोज लाऊडस्पीकर्सचं वाटप करणार आहेत. त्यांच्याकडे लाऊडस्पीकर्ससाठी 9 हजार अर्ज आले असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे राज ठाकरेंनी भोंग्यांबाबत भूमिका स्पष्ट केल्यानंतर उद्याची हनुमान जयंती राजकीय होणार हे स्पष्ट झालं आहे.


दरम्यान, उद्या म्हणजे, हनुमान जयंतीचं औचित्य साधत पुण्यात राज ठाकरेंच्या हस्ते महाआरती केली जाणार आहे. पुण्यातील खालकर चौक येथील मारुती मंदिरात उद्या राज यांच्या हस्ते आरती केली जाणार आहे. यानिमित्तानं मनसेकडून जोरदार बॅनरबाजी होताना दिसत आहे. मनसेकडून करण्यात येत असलेल्या बॅनर्सवर मनसे प्रमुखांचा हिंदुजननायक असा उल्लेखही करण्यात आला आहे. 


राज्यातील सर्व मशिदीवरचे 3 मे पर्यंत भोंगे उतरवा : राज ठाकरे


"मशिदीवरच्या भोंग्याचा आवाज बेसूर असतो. त्याचा कानांना त्रास होतो त्यामुळे भोंगे उतरवले पाहिजे. आम्ही आमची भूमिका मागे घेणार नाही. त्यामुळे मशिदीवरचे भोंगे उतरवले नाही तर हनुमान चालीसा लावणारचं. 3 मे पर्यंत मशिदीवरचे भोंगे उतरवा. आम्हाला कुठलाही तेढ निर्माण करायचा नाही.", असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


महाराष्ट्रातील भोंगा वाद उत्तर प्रदेशात; अलिगड, कासगंजमध्ये लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा पठण