Dhule : खान्देशाचे आराध्य दैवत असणा-या कानुमातेचा उत्सव आज मोठ्या जल्लोषात साजरा होणार आहे. तर, उद्या (सोमवारी) सकाळी वाजत-गाजत कानुमातेच्या विसर्जनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे कुटुंबातील सर्वांना तसेच मित्रमंडळी, नातेवाईकांना एकत्र आणून मोठ्या प्रमाणा साजरा केला जातो. या उत्सवात ना गरीब, ना श्रीमंत असा भेदभाव न करता मानवतेच्या भावनेतून माणुसकी जपली जाते. विशेष म्हणजे अनेक वर्षांचे वैरही कानुमातेच्या साक्षीने नाहीसे होतात असे म्हटले जाते.


अशी असते प्रथा : 


श्रावण महिन्यात नागपंचमीनंतर कानुमातेचा उत्सव साजरा केला जातो. मातेची एक दिवसीय स्थापना करून रात्रभर जागरण केली जाते. आणि दुसऱ्या दिवशी मिरवणूक काढून नदीवर कानुमातेचे विसर्जन केले जाते. कानुमातेच्या उत्सवासाठी बाजारपेठेतून कानुमातेचे मुखवटे आणि सर्व श्रृंगार, पुजा विधीचे साहित्य तसेच सजावटीच्या साहित्यातून रांगोळी काढून कानुमातेची स्थापना करण्यात येते.पूजाविधीनंतर सामूहिक आरती करून पुरणपोळीचा नैवैद्य कानुमातेसमोर ठेवण्यात येतो. यामध्ये मराठी, अहिराणी, हिंदी भाषेतील गाण्यांवर महिला ठेका धरतात. यावेळी ढोल-ताशे, डिजे, पारंपरिक वाद्यावर देखील महिला- पुरूष, लहान बालगोपाळ ठेका धरतात. आणि रात्रभर जागरण करून दुस-या दिवशी सकाळी विधीवत पूजा करून विसर्जन मिरवणूक काढून नदीकिनारी पाण्यात बुडवून देवीचे विसर्जन केले जाते. अशा प्रकारे दोन दिवसांच्या या उत्सवात खान्देशात आनंदमय वातावरण असते. कानुमातेचा उत्सव हा महाराष्ट्रात फक्त खान्देशात साजरा केला जातो. त्यामुळे या उत्सवाला फार महत्त्व आहे.


उत्सवानिमित्त जमतं सारं कुटुंब : 


खान्देशात कानुमातेच्या उत्सवाला अनन्य साधारण महत्त्व आहे. या उत्सवानिमित्त रोट अर्थात पुरणपोळीचा नैवैद्य केला जातो. हा नैवेद्य ग्रहण करण्यासाठी कुटुंबातील सर्व मंडळी एकत्र येतात. या निमित्ताने कुटुंबातील सुखदुःखांची वाटणी केली जाते तसेच बाहेरगावी असलेली मंडळी देखील या उत्सवासाठी घरी येत असल्याने कुटुंबात आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं. 


महत्वाच्या बातम्या :