India Weather Monsoon Update : सध्या देशाच्या अनेक भागात मान्सून (monsoon) सक्रिय झाला आहे. या पावसामुळं (Rain) अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. वायव्य आणि लगतच्या पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. दिल्ली, राजस्थान, महाराष्ट्रासह केरळमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 8 ऑगस्टपर्यंत आंध्र प्रदेशसह तेलंगणा, कर्नाटक आणि केरळमध्ये अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 


देशाची राजधानी दिल्लीत शनिवारी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. या पावसामुळं नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान आज दिल्लीत ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्याचबरोबर सोमवारपासून पुढील काही दिवस हवामान निरभ्र राहण्याची शक्यता असून, त्यामुळे तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये चक्राकार वाऱ्यांची शक्यता आहे. उत्तर किनारपट्टीच्या आंध्र प्रदेश आणि लगतच्या पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरावर या वाऱ्याची शक्यता आहे. 


महाराष्ट्रासह हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये पावसाची शक्यता 


पुढच्या 24 तासात कर्नाटक किनारपट्टीसह विदर्भाचा काही भाग, मराठवाडा, कोकण आणि गोवा, दक्षिण राजस्थान, मध्य प्रदेश आणि पूर्व गुजरातमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तेलंगणा, ओडिशा, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये एक किंवा दोन जोरदार सरीसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. छत्तीसगडमधील बस्तर, दंतेवाडा, विजापूर, सुकमा, कोंडागाव, कांकेर, नारायणपूर, धमतरी यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.


तामिळनाडू आणि कर्नाटकात जोरदार पावसाची शक्यता


तामिळनाडूच्या कृष्णागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळं गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. तसेच केरळमध्येही अनेक नद्यांमध्ये पाण्याचा जोरदार प्रवाह आहे. राज्यातील कोट्टायम, इडुक्की, एर्नाकुलम यांसारख्या जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि पुरामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. कर्नाटकातील संततधार पाऊस लोकांसाठी आपत्ती ठरला आहे. राज्यात 1 जूनपासून सुरु असलेल्या पावसानं अनेक जिल्ह्यांना झोडपून काढले आहे. गेल्या दोन महिन्यांत राज्यात 40 हून अधिक लोकांना पुरामुळं जीव गमवावा लागला आहे. पाण्याच्या जोरदार प्रवाहात शेकडो घरे जमीनदोस्त झाली आहेत. सुमारे चार हजार हेक्टरमधील पिके नष्ट झाली आहेत. ग्रामीण भागातील रस्त्यांची मोठी दुर्दशा झाली आहे.


कोण कोणत्या राज्यात पावसाचा अंदाज


मध्य प्रदेशात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. इंदौर, भोपाळसह अनेक भागात पावसामुळं पाणी साचलं आहे. त्यामुळं लोकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. गुजरात, राजस्थान, दिल्ली, हरियाणाचा काही भाग, वायव्य उत्तर प्रदेश, उर्वरित ईशान्य भारत, केरळ आणि लक्षद्वीपमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत पूर्व राजस्थानमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेशचा किनारी भाग, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


महत्त्वाच्या बातम्या: