Shravan 2022 : श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार वर्षातला पाचवा महिना आहे. महाराष्ट्रात 29 जुलै 2022 पासून मासारंभ होत आहे. श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व वेगळे आहेत. याच निमित्ताने श्रावण महिन्यातील महत्वाचे दिवस कोणते, व्रतवैकल्ये कोणती हे आपण जाणून घेणार आहोत. 


1 ऑगस्ट : नागचतुर्थीचा उपवास (भावाचा उपवास) 


नागचतुर्थीच्या उपवासाला भावाचा उपवास सुद्धा म्हणतात. श्रावणात माहेरवाशी माहेरी येतात. बऱ्याच परंपरेत नाग माहेरवाशीनीचा भाऊ समजतात. नागपंचमीच्या आदल्या दिवशी माहेरवाशीनी भावाच्या नावाने उपवास करतात त्याला नागाचा उपवास म्हणतात. 


1 ऑगस्ट : पहिला श्रावण सोमवार (शिवामूठ तांदूळ)


1 ऑगस्टलाच पहिला श्रावणी सोमवार आहे. श्रावणातले सोमवार हे विशेष महत्वाचे समजले जातात. श्रावणातल्या सोमवारी वेगवेगळ्या धान्यांनी महादेवाची पूजा करायची धार्मिक परंपरा आहे. पहिल्या सोमवारची शिवामूठ तांदूळ आहे. 


2 ऑगस्ट : नागपंचमी.




सोमवार व्यतिरिक्त अगदी दुसऱ्याच दिवशी साजरा केला जाणारा सण म्हणजेच नागपंचमी (Nag Panchami 2022). यंदा नागपंचमीचा सण 2 ऑगस्ट 2022 रोजी आहे. हिंदू धर्मात नागपंचमीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी राज्यात अनेक ठिकाणी प्रतिकात्मक नागाची पूजा करतात. काही भागांत चिखलाचा नागदेवता करतात. तर काही ठिकाणी प्रतिकात्मक फोटोची पूजा करतात. काही ठिकाणी मंदिरात जाऊन पूजा करतात. सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा गावात जिवंत नागाची पूजा करतात. 


2 ऑगस्ट : मंगळागौरी पूजन. 




श्रावण महिन्यात मंगळागौरीला विशेष महत्त्व आहे. या महिन्यातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचे पूजन केले जाते. मंगळागौरीचे व्रत हे पार्वती देवी म्हणजेच गौरीला समर्पित आहे. घरात समृद्धी यावी, उत्तम आरोग्य लाभावं आणि वैवाहिक सुखाच्या आशीर्वादासाठी केले जाते. श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी हे व्रत केले जाते. असे मानले जाते की, विवाहित महिलांसाठी मंगळा गौरी व्रत केल्यास त्यांना शाश्वत सौभाग्य प्राप्त होते आणि त्यांचे दांपत्य जीवन आनंदी होते. 


3 ऑगस्ट : श्रियाळ षष्ठी.


श्रीयाळ षष्ठी हे व्रत श्रावण महिण्यातील षष्ठी तिथीला आचरले जाते. या दिवषी प्रात:काळ किंवा मध्यान्हकाळात या व्रताचे विधीवत पूजन केले जाते. 


3 ऑगस्ट : कल्की जयंती. 


कल्की जयंती हा एक हिंदू सण आहे जो कल्किचा भविष्यातील जन्म साजरा करतो, विष्णूचा अंतिम अवतार, जो कलियुगात जन्मला होता, कलिसह जगाच्या दुष्कृत्यांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी, सत्ययुगात काळाचे चाक वळवतो.


4 ऑगस्ट : गोस्वामी तुलसीदास जयंती.


गोस्वामी तुलसीदास हे भारतातील एक हिंदू संत कवी होते. तुलसीदासांचा जन्म इसवी सन 1497 या वर्षी सध्याच्या उत्तर प्रदेश या राज्यातील चित्रकूट जिल्ह्यातील राजापूर यथे झाला. वाल्मिकी रामायणानंतर गोस्वामी तुलसीदास यांनी लिहिलेले रामचरितमानस अधिक प्रमाण मानले जाते. श्रावण शुद्ध सप्तमीला तुलसीदासांचा जन्म झाला. तुलसीदासांना युगप्रवर्तक हिंदी महाकवी, असे संबोधले जाते.


8 ऑगस्ट : पुत्रदा एकादशी.


हिंदू धर्मग्रंथानुसार, पुत्रदा एकादशी 2022 वर्षातून दोनदा येते. पहिला पुत्रदा एकादशी व्रत पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला ठेवला जातो तर दुसरा पुत्रदा एकादशी व्रत श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला पाळला जातो. श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशीला श्रावण पुत्रदा एकादशी 2022 असे म्हणतात. या व्रतामध्ये भक्त पुत्रप्राप्तीच्या इच्छेने भगवान विष्णूची खऱ्या मनाने आणि भक्तिभावाने पूजा करतात. यावर भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि त्यांना भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्याचे वरदान देतात.


8 ऑगस्ट : श्रावणी सोमवार शिवामूठ (तीळ).


श्रावणातील दुसरा श्रावण सोमवार 8 ऑगस्ट 2022 रोजी येणार आहे. या सोमवारची शिवामूठ तीळ आहे. 


9 ऑगस्ट : मंगळागौर पूजन.


श्रावण महिन्यात मंगळागौरीला विशेष महत्त्व आहे. या महिन्यातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचे पूजन केले जाते. मंगळागौरीचे व्रत हे पार्वती देवी म्हणजेच गौरीला समर्पित आहे. घरात समृद्धी यावी, उत्तम आरोग्य लाभावं आणि वैवाहिक सुखाच्या आशीर्वादासाठी केले जाते. श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी हे व्रत केले जाते. असे मानले जाते की, विवाहित महिलांसाठी मंगळा गौरी व्रत केल्यास त्यांना शाश्वत सौभाग्य प्राप्त होते आणि त्यांचे दांपत्य जीवन आनंदी होते. 


11 ऑगस्ट : नारळी पौर्णिमा.




श्रावण पौर्णिमेचा दिवस हा भारताच्या समुद्रकिनारी राहणारे प्रांत नारळी पौर्णिमा म्हणून साजरा करतात. समुद्र हे वरुणाचे स्थान समजले जाते. वरुण हा पश्चिमेचा दिक्पाल आहे. त्याला या दिवशी श्रीफळ अर्पण करून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची हिंदू प्रथा आहे. समुद्राशी एकरूप झालेल्या आणि जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या कोळी समाजाकडून नारळी पौर्णिमेला समुद्राची पूजा केली जाते.


11 ऑगस्ट : रक्षाबंधन. 




श्रावण पौर्णिमेच्या दिवशी बहुधा राखी पौर्णिमाही असते. या दिवशी बहिणी भावाला राखी बांधतात आणि ओवाळतात. या विधीला रक्षाबंधन म्हणतात. हा मूळ मूळ उत्तरी भारतातला हा सण आता उर्वरित भारतातही पाळला जातो.


12 ऑगस्ट : वरदलक्ष्मी व्रत.


श्रावण महिन्यातील दुसऱ्या शुक्रवारी लक्ष्मीदेवीची उपासना मोठ्या प्रमाणावर केली जाते. या दिवशी घराची साफसफाई केली जाते. पूजेची तयारी केली जाते. वरदलक्ष्मी व्रताचा संकल्प केला जातो. तसेच चौरंग मांडून त्यावर कलश ठेवून वरदलक्ष्मीचे आवाहन करावे. या दिवशी देवीला नैवेद्य दाखवावा. सुवासिनींना वाण द्यावे. तसेच वरदलक्ष्मी कहाणीचे पठण करावे. 


13 ऑगस्ट : आचार्य अत्रे जयंती.


प्रल्हाद केशव अत्रे ऊर्फ आचार्य अत्रे हे मराठीतील नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, संपादक, चित्रपट निर्माते, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी आणि वक्ते होते. जन्म 13 ऑगस्ट 1898 रोजी झाला. आचार्य अत्रे महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उभ्या राहिलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील प्रमुख नेते होते. 


13 ऑगस्ट : अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी (तारखेप्रमाणे).


अहिल्याबाई होळकर या भारतातील, माळव्याच्या जहागीरदार असलेल्या होळकर घराण्याच्या 'तत्त्वज्ञानी राणी' म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी नर्मदा तीरी, इंदूरच्या दक्षिणेस असलेल्या महेश्वर या ठिकाणी आपली राजधानी हलविली. मल्हाररावांनी त्यांना प्रशासकीय आणि सैन्याच्या कामात पारंगत केलेल होते. त्या आधाराने अहिल्याबाईंनी इ.स. 1766 ते इ.स. 1795, म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत माळव्यावर राज्य केले होते.


15 ऑगस्ट : तिसरा श्रावणी सोमवार (शिवामूठ मूग).


श्रावण महिन्यात सोमवारच्या तिथीला अत्यंत महत्त्व असते. या दिवशी महादेवाची पूजा केली जाते. या सोमवारची शिवामूठ मूग आहे. 


15 ऑगस्ट : पतेती.


पतेती हा पारश्यांचा नववर्ष दिवस होय. मुळात पतेती म्हणजे "पश्चात्तापाचा दिवस". हा आत्मनिरीक्षणाचा दिवस आहे. या दिवशी वर्षभरात झालेल्या चूकांची, गुन्ह्यांची कबुली देऊन हा दिवस पश्चाताप करण्याचा करण्याचा असतो. 


15 ऑगस्ट : स्वातंत्र्य दिन.



स्वातंत्र्य दिन (15 ऑगस्ट) हा भारताचा विशेष महत्त्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून दिनांक 15 ऑगस्ट इ.स. 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका आणि सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.


16 ऑगस्ट : पारशी नववर्ष.


16 ऑगस्ट हा दिवस म्हणजेच पारशी नववर्षाचा पहिला दिवस. हा दिवस नवरोझ म्हणून देखील ओळखला जातो. पारशी समाजाचं नवं वर्ष ही नव्या पारशी वर्षाची/ कॅलेंडरची सुरूवात असते. अग्यारी या त्यांच्या धार्मिकस्थळाला भेट देऊन ते प्रार्थना करतात. एकमेकांना गळाभेट देत, नववर्षाच्या शुभेच्छा देतात. मित्रमैत्रिणींना भेटतात. या निमित्ताने दान करण्याची देखील पद्धत आहे. हा पारशी समाजासाठी मोठा उत्साहाचा दिवस असतो.


18  ऑगस्ट : श्रीकृष्ण जयंती.


श्रावण वद्य अष्टमीला श्रीकृष्ण जन्माष्टमी असे म्हणतात. कारण या दिवशी श्रीकृष्णाचा जन्म झाला. या दिवशी भाविक स्त्रीपुरुष उपवास करतात आणि कृष्ण जन्माचा सोहळा करतात. श्रावण वद्य नवमी या दिवशी बालगोपाल गोपाळकाला किंवा दहीहंडी साजरी करतात.


19 ऑगस्ट : दहीहंडी. 




श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडीचे आयोजन केले जाते. या दिवशी मातीच्या मडक्यात दही, लोणी, मिठाई, फळे इत्यादी भरुन एका उंच ठिकाणी हे मडके टांगले जाते. हंडी फोडण्यासाठी विविध तरुण मंडळी प्रयत्न करतात. दहीहंडी फोडण्यासाठी विविध मंडळातील तरुण एक दुसऱ्याच्या पाठीवर चढून मानवी मनोरा तयार करतात. 


19 ऑगस्ट : कालाष्टमी.


भैरव देवाचा जन्म कालाष्टमीच्या दिवशी झाला होता, म्हणून याला भैरव जयंती किंवा काल भैरव अष्टमी असेही म्हणतात. भैरव देव हे शिवाचे रूप मानले जाते. भगवान भैरवाच्या जन्मदिवसाच्या स्मरणार्थ हा उत्सव साजरा केला जातो. भैरव रूप हे भगवान शिवाचे भयानक आणि उग्र रूप आहे. काळ म्हणजे काळ आणि भैरव हे शिवाच्या रूपाचे नाव आहे. प्रत्येक हिंदू चंद्र महिन्यात कृष्ण पक्ष अष्टमी तिथीला कालाष्टमी किंवा काला अष्टमी पाळली जाते. हा प्रसंग भगवान भैरवाला समर्पित आहे. कालभैरवाच्या पूजेसाठी दिवस सर्वात योग्य मानले जातात. वर्षभरात एकूण 12 कालाष्टमी साजरी केल्या जातात. 


19 ऑगस्ट : संत ज्ञानेश्वर महाराज जयंती (तिथीनुसार).


संत ज्ञानेश्वर हे 13 व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवी होते. भागवत संप्रदायाचे प्रवर्तक, योगी आणि तत्त्वज्ञ होते. फक्त 16 वर्षांच्या लहान आयुष्यात त्यांनी ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव यांची रचना केली. संत ज्ञानेश्वरांच्या विचारांमध्ये अद्वैतवादी वेदांत तत्त्वज्ञान आणि भगवान विष्णूचा अवतार असलेल्या विठ्ठलाच्या भक्तीवर आणि योगावर भर देण्यात आला आहे. त्यांच्या वारशाने एकनाथ आणि तुकाराम यांसारख्या संत-कवींना प्रेरणा दिली. ते महाराष्ट्रातील हिंदू धर्मातील वारकरी (विठोबा-कृष्ण) भक्ती परंपरेचे संस्थापक आहेत. संत ज्ञानेश्वरांनी 1296 मध्ये आळंदी येथे समाधी घेतली.


22 ऑगस्ट : सोमवार (शिवामूठ जव)


श्रावणातील चौथा श्रावण सोमवार 22 ऑगस्ट 2022 रोजी येणार आहे. या सोमवारची शिवामूठ जव आहे. 


26 ऑगस्ट : पोळा (श्रावण अमावस्या),  पिठोरी अमावस्या 


श्रावण महिन्यातील अमावास्येला पिठोरी अमावास्या असे नाव आहे. संततीच्या प्राप्तीसाठी सौभाग्यवती स्त्रिया पिठोरी व्रत करतात. याच दिवशी काही ठिकाणी शेतकरी पोळा नावाचा सण साजरा करतात. हा सण बैलांसंबंधी असून, या दिवशी बैलांना शृंगारून त्यांची मिरवणूक काढतात.


आदित्य पूजन : 


श्रावणातील प्रत्येक रविवारी आदित्याची पूजा करुन त्याला खिरीचा नैवेद्य दाखवावा. केवळ श्रावणातील रविवारीच नव्हे, तर वर्षभरातील सर्व रविवारी सूर्यपूजा करावी. नैवेद्य दाखविणे शक्य नसेल तर हरकत नाही. परंतु, कुंकुम, अक्षता, फुले वाहून अर्घ्य द्यावे. भक्तिपूर्वक नमस्कार करावा. दुपारी बारा वाजण्याच्या आधी गायत्रीमंत्राचा यथाशक्ती जप करावा.


श्रावणी सोमवार व्रत : 


श्रावणी सोमवार या संदर्भात ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्न झाल्यानंतर सलग पहिली पाच वर्ष महाराष्ट्रात स्त्रिया हे शिवास्त वाहण्याचे व्रत करतात. ह्या व्रतात श्रावणातील सर्व सोमवारी उपवास करावा. शिवलिंगाची पूजा करून त्यावर प्रत्येक सोमवारी क्रमाने तांदूळ, तीळ, मूग, जवस ह्यापैकी एकेका धान्याची एक मूठ वाहावी. म्हणजे पहिल्या श्रावणी सोमवारी तांदळाची एक मूठ, दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळाची एक मूठ असा हा क्रम असावा. ही मूठ वाहताना ‘नम: शिवाय शान्ताय पंचवक्त्राय शूलिने । शृकङ्गिभृङ्गि-महाकालणयुक्ताय शम्भवे ।। ‘ हा मंत्र म्हणावा. पाच वर्षांनंतर व्रताचे उद्यापन करावे. यथाविधी शिवलिंगाची पूजा करून ब्राह्मणांना तसेच आप्तेष्टांना यथाशक्ती भोजन, भेटवस्तू, दक्षिणा देऊन ह्या व्रताची समाप्ती करावी.


मंगळागौरी पूजन. 


श्रावण महिन्यात मंगळागौरीला विशेष महत्त्व आहे. या महिन्यातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचे पूजन केले जाते. मंगळागौरीचे व्रत हे पार्वती देवी म्हणजेच गौरीला समर्पित आहे. घरात समृद्धी यावी, उत्तम आरोग्य लाभावं आणि वैवाहिक सुखाच्या आशीर्वादासाठी केले जाते. श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी हे व्रत केले जाते. असे मानले जाते की, विवाहित महिलांसाठी मंगळा गौरी व्रत केल्यास त्यांना शाश्वत सौभाग्य प्राप्त होते आणि त्यांचे दांपत्य जीवन आनंदी होते. 


बृहस्पती पूजन :


श्रावणातील प्रत्येक बुधवारी बुधाची आणि गुरुवारी बृहस्पतीची म्हणजे गुरुची पूजा केली जाते ह्या व्रतासाठी बुध आणि गुरुचे चित्र घेऊन किंवा बालस्ती रेखाटून त्याची पूजा करून शेवटी दही-भाताचा नैवेद्य दाखवावा. हे व्रत सात वर्षे केले जाते. 


जरा-जिवंतिक पूजन :


श्रावणात दर शुक्रवारी जरा-जिवंतिका पूजन केले जाते. जरा ही मूळची राक्षसी होती. ती मगध देशात असे. मगध नरेश वृद्धाला शरीराचे दोन वेगवेगळे भाग असलेला मुलगा झाला. तो जन्मताच त्याला नगराबाहेर फेकून देण्यात आले. त्यावेळी ह्या जरा राक्षसीने ती दोन शकले एकत्र जुळविली आणि त्या अर्भकाला जीवदान दिले. म्हणून ते बालक ‘जरासंध’ ह्मा नावाने ओळखले जाऊ लागले. पुढे मगध देशात जरा राक्षसीचा महोत्सव केला जाऊ लागला. लोक तिला अनेक मुलांची आई समजू लागले. घरोघरी तिची पूजा होऊ लागली. महाराष्ट्रात अशीच जिवतीची पूजा श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी केली जाते. त्यासाठी आजूबाजूला बरीच लहान मुले असलेला जिवंतिका म्हणजे जिवतीचे चित्र भिंतीवर लावले जाते अथवा गंधाने काढले जाते. असे चित्र काढून मग तिची पूजा करावी. ह्या पूजेसाठी दूर्वा, फुले, आघाड्याची पाने असणे आवश्यक मानले आहे. ह्मा तिन्हींची माळ करून ती जिवतीला घालावी. पुरणा-वरणाचा नैवेद्य दाखवावा. मग पूजेला बोलाविलेल्या स्त्रियांना हळदकुंकू देऊन जेवू घालावे.


अश्वत्थ मारूती पूजन :


श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्र्वत्थाची पूजा करण्याची प्रथा आहे. दुधामध्ये बेलाचे पान घालून ते दूध पिंपळाच्या मुळात घालावे. त्यामुळे त्या दुधाचा सुगंध पिंपळाला मिळतो. पिंपळाची पूजा करणे म्हणजे विष्णूपूजा करणे असे मानले जाते. पिंपळाच्या खाली मारुती असल्यास त्याचीही पूजा करण्याची प्रथा आहे. तसेच मारुती नसल्यास पिंपळाची आणि मारुतीची अशा वेगवेगळ्या पूजादेखील केल्या जातात. 


महत्वाच्या बातम्या :